बीड बॅंक घोटाळा अखेर पोलीस तपास सुरू; अन्यायग्रस्त महिलेचा अखेर नोंदवला जबाब !


बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेतून मयत व्यक्तीच्या खात्यावरील पैसे बँक कर्मचा-यांशी संगनमत करून परस्पर हडप केल्या प्रकरणाचा तपास अखेर सुरू झाला आहे. या प्रकरणातील मयत व्यक्तीच्या पत्नीचा जबाब रविवारी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक चाटे यांनी नोंदविला आहे. माझ्या पतीच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढणे हा गुन्हा असून हे कृत्य करणारे बँक कर्मचारी आणि संबंधित घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत व्यक्तीची पत्नी परिमाळा यांनी आपल्या जबाबात केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येल्डा, ता. अंबाजोगाई येथील रहिवासी भाऊसाहेब दामू चामनर यांचे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेत खाते आहे. त्यांचा खाते क्रमांक 000411002011470 असा आहे. या खात्यावर भाऊसाहेब चामनर यांनी मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी काही रक्कम ठेवली. दुर्दैवाने भाऊसाहेब चामनर यांचे 16 मार्च 2016 रोजी अकस्मिक निधन झाले.
पतीच्या अकस्मिक झालेल्या निधनाचा धक्का त्यांची पत्नी परिमाळा भाऊसाहेब चामनर यांना बसला. या दुःखातून सावरल्यानंतर परिमाळा या आपल्या पतीच्या नावे जमा असलेल्या रकमेबद्दल चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ परत पाठविण्यात आले. तोंडी मागणी करून, अर्ज करूनही बँक कर्मचारी माहिती देत नाहीत असे पाहिल्यानंतर हवालदिल झालेल्या परिमाळा यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. तरीही बँकेच्या निगरगट्ट अधिकारी, कर्मचारी यांनी माहिती दिली नाही. अखेर वकीलामार्फत जाऊन त्यांनी पतीच्या नावाचे बँक स्टेटमेंट मिळविले तेव्हा त्यांच्या पतीच्या नावावरील रक्कम परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले. तेव्हा त्यांना कमालीचा धक्का बसला. आपल्या पतीच्या निधनानंतर एकुलत्या एका मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी ठेवलेली रक्कम अशी गायब झाल्याने त्या कमालीच्या हवालदिल झाल्या. अखेर त्यांनी याबाबत न्याय मिळविण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक चाटे यांनी परिमाळा यांना बोलावून सविस्तर जबाब नोंदवून घेतला आहे.
मयत व्यक्तीच्या नावावरील पैसे काढण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे. या प्रकरणात मयत व्यक्तीच्या नावावर पैसे काढण्यासाठी नेमके कोणती पद्धत अवलंबली, त्याच्यासाठी कोणत्या कागदपत्रांचा आधार घेतला आणि या प्रकरणात कोणकोण गुंतलेले आहेत, याबाबत तपास करावा. दोषी व्यक्तींना कारवाई करावी, अशी मागणी परिमाळा यांनी आपल्या जबाबात केली.