बीड जिल्ह्यातील नगर परिषदांना रमाई आवास योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्या; आ. मुंदडा यांची मागणी


बीड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींना रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील व्यक्तींना घरकुल योजना / रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत मधील एकुण १२७९ लाभार्थ्यांची निवड करुन प्रस्ताव मंजुर करून संदर्भीय आदेशान्वये जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय घरकुल निर्माण समिती ( नागरी क्षेत्र) बीड यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
परंतु अद्याप रोजीपर्यंत शासनाकडून समाजकल्याण कार्यालयास निधी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत यांना निधी वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे सदरील घरकुल योजना रखडली असून लाभार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील रमाई आवास योजना (शहरी) साठी त्वरित निधी उपलब्ध करून देणेबाबतची मागणी उपजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बीड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तरी बीड जिल्ह्यातील सदर योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे घरकुल बांधकामासाठी पैसे खर्च करुन बांधकाम परवानेही काढले आहेत. निधी न मिळाल्याने आज सदर लाभार्थी चिंतातूर आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील संदर्भीय आदेशान्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त रमाई आवास योजना (शहरी) साठी त्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.