बीड जिल्ह्यातील दोन शिक्षकांना केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव!
बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके अशी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत.
5 सप्टेंबर रोजी दरवर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. विद्यार्थिप्रिय, गुणवत्ता आणि शिस्तबद्ध कार्य या आधारावर शिक्षकांची निवड केली जाते. प्रत्येक राज्यातून एका शिक्षकाची राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड केली जाते.
मात्र यावर्षी दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे दोन्ही शिक्षक बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत हे विशेष. गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील शिक्षक शशिकांत कुलथे आणि आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील शिक्षक सोमनाथ वाळके यांची राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड झाली आहे.
राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांनी हा पुरस्कार पटकवल्याने बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे.



