महाराष्ट्र

“बिनपटाची चौकट” च्या नायिका इंदुमती जोंधळे!

२७ नोव्हेंबर २२.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या चार पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार सौ‌. इंदुमती महावीर जोंधळे यांना देण्यात येणार होता. आता या पुरस्कारासाठी इंदुमती (नानी) येणार म्हणजे कर्मधर्मसंयोगाने महावीर भाई (नाना) येणारे गृहीत धरुनच मी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या संतोष पॅलेसची रुम गाठली.
रुम च्या बंद दरवाज्यावर मी ठकठक केली. रुमचा दरवाजा उघडला गेला. महिला महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापिका आणि इंदुमती जोंधळे अशा तिघी रुममध्ये उपस्थित होत्या. नानी कार्यक्रमास जाण्यापुर्वीची तयारी करण्यात व्यस्त होत्या. माझ्या हातातील बुके पाहुण कोणी तरी आपल्याला भेटायला आले आहे याचा अंदाज त्यांनी बांधला. दोन्ही हात जोडून नमस्कार करीत मी माझा परिचय करून दिला आणि थेट महावीर भाई कुठे आहेत असा प्रश्न विचारला. नानींना हा प्रश्न तसा अनपेक्षित असावा. त्या थोड्या गोंधळुन गेल्या. नंतर मी विस्ताराने लोकमत मधील माझ्या प्रवासातील महावीर भाईं यांचे असलेले योगदान आणि त्यांनी केलेल्या पत्रकारितेतील मार्गदर्शनावर बराच बोललो, मग नाशी थोड्या मनमोकळेपणाने बालू लागल्या.
माझ्या हातातील पुष्पगुच्छांकडे बघत त्या म्हणाल्या, “हा कशासाठी? मला मिळालेल्या पुरस्कारासाठी, की मी करणार असलेल्या भाषणाला शुभेच्छा देण्यासाठी?” मी म्हणालो “या दोन्ही साठी निश्चित नाही! तुम्ही आज पर्यंत महावीर भाईंना ज्या व्यवस्थितपणे सांभाळले आहे, त्यासाठी!” नानी दिलखुलास हसल्या.

“बिनपटाची चौकट” या पुस्तकातील नायिकेची पात्र वठवलेल्या इंदुमति जोंधळे मोकळे पणाने बोलु लागल्या. महावीर भाईंच्या लिखाणाबद्दल त्या भरभरुन बोलत होत्या. “गवतात उगवलेली अक्षर” या महावीर भाईंनी लिहिलेल्या आत्मचरित्र आणि त्यांच्या अनेक पुस्तकांवर आमच्या दिलखुलास गप्पा झाल्या. महावीर भाईंना भेटण्यासाठी आवश्य या असं निमंत्रण ही या निमित्ताने ईंदुताईंनी दिलं.


इंदुमती जोंधळे यांच आजोळ अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावचं! रंगनाथ ढोले हे त्यांचे मामा. रंगनाथरावांच घर म्हणजे पिढीजात ब्राह्मण कुटुंबातील एक सुसंस्कारीत घर! रंगनाथराव आपली बायको दोन बहिणी आणि मुलांसह रहात असत.
साहेबराव जाधव हे रंगनाथरावांचे मित्र . दोघं ही स्वातंत्र लढ्यातील चळवळीत भुमिगत होवून लढलेले. केंव्हातरी रंगनाथराव ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले, पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
आणि इथूनच इंदुमति जोंधळे यांच्या”बिनपटाची चौकट” चा प्रवास सुरु झाला.


“बिनपटाची चौकट” हे आत्मकथन इंदुमती जोंधळे यांच्या जीवन प्रवासाचं पुस्तक आहे. लहानपणीच आई बापाचं छत्र हरवलेल्या एका अनाथ मुलीच्या आयुष्याची ही कहाणी आहे.
या “बिनपटाची चौकट” मध्ये इंदुमती जोंधळे यांनी रेखाटलेले बालपण आणि भोगवटे जितके मनाला अस्वस्थ करतात, तितकीच अस्वस्थता वाढत्या वयातील घटनांमधुन अनुभवयास मिळत नाही. या आत्मचरित्रात इंदुमती जोंधळे यांनी वाढते वय, भावंडांशी होणारी ताटातुट, भेटीची ओढ, अपार कष्ट करण्याची मानसिक व शारीरिक सिद्धता, माणसाच्या बिभुक्षीत नजरा, चारित्र्यालाच आव्हान देणारे प्रसंग, आयुष्याला ख-या अर्थाने वळण देणारी माणसं, त्यांच्या संबंधी व्यक्त केलेली अपार कृतज्ञता, आयुष्यामध्ये आलेले उर:स्फोट व्हावा असे अनेक प्रसंग यांची मांडणी कुठेही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत शांत संयमी पध्दतीने केली आहे.
“बिननपटाची चौकट” हे प्रवाही भाषा, अर्थपूर्ण निवेदन, अभिनिवेश मुक्तता, दुखा:चे उदात्तीकरण न करण्याची अनिवार्यता आणि जगण्याची उत्कटता सरळ साधेपणाने मांडलेले आत्मचरित्र आहे.


अत्यंत वाचनप्रिय असलेल्या या पुस्तकाची अनुबंध प्रकाशनाने १० वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित केली आहे. या आत्मचरित्राच्या इंग्रजी, तेलगु, गुजराती या भाषेत अनुवाद झाला असून सध्या हिंदी आणि कन्नड भाषेत अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. या सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या चार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
शिवाय या आत्मचरित्रावर डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, केशव मेश्राम, शकुंतला मुळेय, विन्या खडपेकर आणि अन्य जणांनी लिहिलेल्या लेखांचे “बिनपटाची चौकट; समिक्षा आणि रसास्वाद” हे प्राचार्य डी.डी.मगदुम यांनी संपादित केलेलं पुस्तक ही प्रकाशित करण्यात आले आहे.
आत्मचरित्र लिखाणात एक नवा मापदंड निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या “बिनपटाची चौकट” या पुस्तकातील नायिकेशी या निमित्ताने मुक्त संवाद साधता आला.

खरं तर महावीर भाई यांच्या भेटीच्या ओढीने मी संतोष पॅलेस वय गेलो होतो ‌ महावीर भाईंची भेट न झाल्याची खंत आहेच! पण इंदुमति जोंधळे यांची भेट झाल्याचा आनंद ही निश्चितच आहे!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker