बिंदुसरा ओहरफ्लो; मांजरात फक्त ५२ टक्के तर माजलगाव धरणात ८० टक्के पाणीसाठा!
जिल्ह्यातील १४३ प्रकल्पात ७० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_143120.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_143120.jpg)
यावर्षी पावसाने बीड जिल्ह्यातील तशी नाराजीच दाखवली आहे. बीड लातुर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांचा पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पावसाळ्याच्या सरतेशेवटी फक्त ५२ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरण नुकतेच ओहरफ्लो झाले असून जायकवाडी प्रकल्पातुन सोडण्यात आलेल्या निसर्गातील पाण्यावर माजलगाव धरणाची भरण्याकडे आगेकुचसुरु आहे. प्राप्त माहितीनुसार माजलगाव धरण ८० टक्क्याच्या जवळपास भरले आहे.
जिल्ह्यातील १४३ प्रकल्पात ६६ टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याची नोंद आहे. आता मोठ्या पावसाची सर्व नक्षत्रे संपली असुन सर्व भिस्त ऑक्टोबर मध्ये सुरु होणा-या परतीच्या पावसावर आहे.
यावर्षी बीड जिल्ह्यात जरा उशीरानेच हजेरी लावली. पेरणी पुरता पावूस कसाबसा झाला, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, बिजांकुर वर येवून लागले तोच शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदील झाला. शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाचा झटका सहन करीत पीके कशीबशी तग धरुन उभे राहण्याचा प्रयत्न करु लागली आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_144008.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_144008.jpg)
तर पावसाने दडी मारल्यामुळे पीके करुन पिवळी पडुन लागली. पावूस लांबल्यामुळे डोंगर विभागात असलेल्या शेतीतील पीके हातची गेली तर काळ्या रानातील पीकांच्या उत्पादनांवर यांचा परीणाम झाला. या सर्व संकटांवर मात करीत पीके आज उभी आहेत. कुठे सोयाबीन च्या शेंगांची झाडे लगडली आहेत तर कुठे झाडांना लागलेल्या शेंगा शोधाव्या लागत आहेत.
यावर्षी अत्यंत अपु-या आणि वेळेवर न पडलेल्या पावसाचे हे सर्व परिणाम पहावयास मिळत आहेत. यावर्षी पडलेल्या अपु-या पावसाचा परीणाम हा जिल्ह्यातील मोठे धरणे आणि सर्व सिंचन तलावावर झाला आहे. बीड, लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आजपर्यंत फक्त ५२ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे मांजरा धरण अजून अर्धे ही भरले नाही. २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आज फक्त १३८.३९६ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. मांजरा धरणाची पाणी पातळी ही ६४२.३७ मीटर एवढी आहे. आज धरणात फक्त ६३९.९६ मीटर ऊंचीचा पाणी साठा जमा आहे. म्हणजे जवळपास तीन मीटर उंच पाण्याची चादर या पाण्यावर जमा झाली तरच मांजरा धरण भरु शकणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_144530.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_144530.jpg)
मांजरा धरणा व्यतिरिक्त असलेल्या बीड येथील बिंदुसरा धरण नुकतेच ओहरफ्लो झाले आहे तर माजलगाव धरण जायकवाडी धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आधाराने ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला बिंदुसरा धरणात फक्त ६६ टक्के तर माजलगाव प्रकल्पात ७४ टक्के पाणीसाठा असल्याच्या नोंदी होत्या. मात्र या आठवड्यात बिंदुसरा धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हे धरण आता ओव्हरफ्लो झाले आहे.
बीड जिल्ह्यातील एकुण प्रकल्पां पैकी ७ मध्यम आणि ३७ लघु असे एकुण ४४ प्रकल्प ओहरफ्लो झाल्याची नोंद सिंचन विभागाकडे आहे. याशिवाय ३ लघु प्रकल्पात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे तर १ मोठा, २ मध्यम व १३ लघु अशा १६ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पामध्ये अजूनही २५ ते ५० टक्के पाणी साठा जमा झाला आहे तर २ लघु व १६ मध्यम अशा १८ प्रकल्पात प्रकल्पात २५ टक्केपेक्षा कमी पाणी साठा उपलब्ध आहे. तर २ मध्यम व ३४ लघु अशा एकुण ३६ प्रकल्पातील पाणी साठा अजूनही जोत्याच्या खालीच आहे. एकुणच जिल्ह्यातील १४३ प्रकल्पात फक्त ६६ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.