अंबाजोगाई येथील प्रख्यात साहित्यिक, कवी बालाजी सुतार यांना मदत वेल्फेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी साहित्यसेवेसाठी दिला ‘प्रतिभा गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बालाजी सुतार यांचे मराठी साहित्य विश्वातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रामदास फुटाणे आणि किशोर कदम यांची उपस्थिती
अंबाजोगाई येथील चतुरस्त्र आणि जाज्वल्य समाजभान असणारे प्रतिभावंत लेखक बालाजी सुतार यांना जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार ७ जून २०२५ रोजी पुणे येथील पत्रकार भवनात दुपारी २ वाजता प्रख्यात ज्येष्ठ सिनेनिर्माते दिग्दर्शक भाष्य कवी रामदास फुटाणे आणि प्रख्यात सिनेअभिनेते तथा लोकप्रिय कवी किशोर कदम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
१०००० रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र
यापूर्वी सदर पुरस्कार प्रसिद्ध आणि ज्येष्ठ गझलकार श्री. म. भा. चव्हाण आणि श्री. चंद्रशेखर सानेकर ह्यांना प्रदान करण्यात आला आहे. यापुरस्काराचे स्वरूप रू. १०००० रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
लेखक आणि कवी हे समाजाला योग्य ती सम्यक वैचारिक दिशा प्रदान करीत असल्यामुळे साहित्यसेवा ही देखील समाजसेवा आहे असे आम्ही मानतो.
मराठी लेखक कवी श्रीमंत व्हावेत ही इच्छा
तसेच मराठी लेखक/कवी हे श्रीमंत झाले पाहिजेत अशी आमची धारणा आहे. त्यामुळे मदत ट्रस्टची स्थापना झाल्यापासून आम्ही सातत्याने लेखक, कवी आणि समीक्षक यांना सन्मानजनक रकमेच्या पुरस्कारांनी गौरवण्याची परंपरा टिकवली आहे. कवी/लेखकाचे पोटदेखील अर्थार्जनावरच चालत असल्यामुळे केवळ सन्मानचिन्ह आणि शाल एव्हढ्यावर पुरस्कारांचा देखलेपणा न करता मोठ्या रकमांचे पुरस्कार आणि बक्षीसे आम्ही सतत प्रदान करीत आहोत. तसेच कविता स्पर्धा आणि कवीसंमेलन आयोजित करून साहित्यसेवा म्हणून साहित्यिकांना दरवर्षी अर्थार्जनासह योग्य तो मानसन्मान आम्ही प्रदान करतो.
बंडखोरपणा, निडर वृत्तीचा लेखक/कवी
या वर्षीचे आमच्या ‘प्रतिभा गौरव’ पुरस्काराचे विजेते श्री. बालाजी सुतार हे प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेतच पण आजकाल कवी/लेखकांमधे अभावानेच आढळणारा बंडखोरपणा आणि निडर वृत्ती हा त्यांचा स्थायी भाव आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याकाळ या तीनही काळातील अनिष्ट गोष्टी, चुकीच्या परंपरा आणि समाजासाठी संभाव्य फसव्या गोष्टी यावर ते कठोर प्रहार करतात आणि काय चूक आणि काय बरोबर हे न सांगता माजघरात दडण्याचा आजकालच्या लेखक/कवींचा लालची भित्रेपणा न स्विकारता जिथे चूक आहे तिथे थेट शासन/समाज/व्यवधाने आणि विवेकशून्य कळप अंगावर घेतात. एव्हढेच नव्हे तर सामान्य माणसांच्या अंगावरचे अन्यायाचे/फसवणुकीचे वळ लपवण्यासाठी लुटारू तसेच जुलमी व्यवस्थेने पांघरलेली झूल भिरकावून देऊन त्या दुःखावर आणि अन्यायावर नेमके बोट ठेवतात. ते दूर करण्यासाठी आपल्या लिखाणातून संजीवनी प्रदान करतात. बंडखोर स्वभावाला आणि लिखाणाला दर्जेदार विनोदाची तसेच उपहासाची धारदार जोड असल्यामुळे त्यांचे लिखाण धारदार, कमालीचे प्रभावी आणि लोकप्रिय ठरते.
गावकथा या नाविण्यपूर्ण प्रयोगाने झाले लोकप्रिय
दोन दशकांच्या सांध्यांवरच्या नोंदी हा कथासंग्रह असो वा गावकथा हे नाटक असो वा उत्तरार्ध ही दीर्घकथा असो समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून समाजाला नवीन दृष्टी लेखनातून प्रदान करणारे अत्यंत प्रतिभाशाली लेखक/कवी श्री. बालाजी सुतार हे आजच्या पिढीतील लेखक कवी आहेत.
अनेक मान्यवरांनी केले अभिनंदन!
सदरील पत्रकार जाहीर करण्यात आल्या नंतर बालाजी सुतार यांचे ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ तिवारी, अमर हबीब, दगडू लोमटे, प्रा. दासू वैद्य, अभिजित जोंधळे, सुदर्शन रापतवार, प्रा. शैलजा बरुरे, गोरख शेंद्रे, प्राचार्य कमलाकर कांबळे व इतरांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.