बचाव कार्यात मृत झालेल्या जवानाच्या कुटुंबियास माजलगावकर करणार ३५ लाखांची भरीव मदत!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210751.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210751.jpg)
माजलगाव येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथून आलेल्या आपत्कालीन मदत पथकातील राजशेखर मोरे यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. या घटनेने व्यथीत झालेल्या माजलगावकरांनी राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या मदत फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या मदत फेरीत एका दिवसात २५ लाखांची भरीव मदत जमा झाली. यात आणखी १० लाखांची भर टाकण्यात येवून मयत राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना ३५ लाख रुपयांची भरीव मदत करण्याचा निर्णय माजलगाव करांनी घेतला असून लवकरच ही मदत कोल्हापुर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात येणार आहे.
आपल्या गावी आलेल्या जवानाचा असा मृत्यू व्हावा ही बाब माजलगावकरांच्या जिव्हारी लागली. राजशेखर यांच्या मृत्युमुळे व्यतीत झालेल्या माजलगाव करांनी राजशेखर यांच्या नातेवाईकांना भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच बुधवारी काढण्यात आलेल्या मदत फेरीत एका दिवसात राजशेखर मोरे यांच्या कुटुंबियांसाठी 25 लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे. यातील सुमारे पावणे सात लाख रूपये कुटुंबियांच्या खात्यावर जमाही करण्यात आले.
माजलगाव धरणात पोहताना तेथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर आपत्कालीन पथकाचे सदस्य माजलगावला गेले होते. परंतू यातील राजशेखर यांचा मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी परिस्थिती बेताची असून त्यांना लहान मुले असल्याने माजलगावकरांनी निर्धार करत बुधवारी मदतफेरी काढली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210808.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210808.jpg)
दिवसभरात सुमारे 25 लाख रूपये संकलित झाले आहेत. आणखी 10 लाख रूपये गोळा करून ते सर्व पैसे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
एनडीआरएफ शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या कुटूंबियास. आ. सोळंके यांच्या कडुन 1 लक्ष, जयसिंग सोळंके यांच्या कडुन 1 लक्ष, लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.सा.का. कडुन 2 लक्ष 51 हजार, सुंदरराव सोळंके महाविद्यालय कडुन 51 हजार असे पाच लक्ष रू.ची आर्थिक मदत, रमेश आडसकर यांच्या कडुन ५१ हजार रुपये मदतीसह शहरातील अनेक मान्यवरांनी आपली भरीव मदत देवून या मदत फेरीत आपला मोठा वाटा उचलला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210736.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220921_210736.jpg)