प्रा.सौ. संगीता ठोंबरे यांच्या माघारीचा फायदा नेमका कुणाला; मुंदडा का साठे?
केज विधानसभा मतदारसंघ सध्या प्रचाराने ढवळून निघत आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या नमिता मुंदडा राशपचे पृथ्वीराज साठे आणि मनसेचे रमेश गालफाडे हे प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत. आणि मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्याचाही आता मतदार मोठ्या प्रमाणावर तर्क लावू लागले आहेत.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये तिकीट वाटपाच्या अगोदरच चार महिन्यांपासून अगदी डझनभर इच्छुक उमेदवार संपर्क दौरे करत होते. आणि यामध्ये पृथ्वीराज साठे, डॉक्टर अंजली घाडगे आणि माजी आमदार संगीता ठोंबरे हे तिघे राशपचे तिकीट मिळवण्यासाठी एकमेकांचे स्पर्धक होते.
माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जो काही संपर्क दौरा सुरु केला होता त्यामध्ये त्या तिकीट मिळो अथवा न मिळो, कुणाचा पाठिंबा असेल किंवा नसेल पण मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच असं ठामपणे सांगत होत्या. त्यामुळे माध्यमांनीही संगीता ठोंबरे यांना उमेदवार म्हणून गृहीत धरले होते. एवढेच नव्हे तर उमेदवारी अर्ज दाखल करताना संगीता ठोंबरे यांनी इतर दोन उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली होती, आणि यामध्ये बहुतांश समर्थक हे भाजपा विचाराचे दिसून येत होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ठाम असलेल्या संगीता ठोंबरे यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि सर्वांना आश्चर्य वाटून घ्यायला भाग पाडले. एवढेच नव्हे तर त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राशप चे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र त्यानंतर आता मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क लढवल्या जात आहेत.
एक तर संगीता ठोंबरे ह्या आमदार झाल्या त्या भाजपकडून अर्थातच सर्व मतदार हे भाजप विचाराचे होते. त्यामुळे त्या अपक्ष लढवणार असे म्हणत होत्या.
त्यावेळीही त्यातीलच मतदार त्यांच्या पाठीमागे होते. मात्र त्यांनी अचानक अर्ज मागे घेतला आणि तुतारीला पाठिंबा जाहीर केला, लोक विचारात पडले की शेवटपर्यंत ताई लढणारच यावर ठाम होत्या आणि आता थेट त्यांनी तुतारीला पाठिंबा दिला तर आता आपण काय करायचे ? मग संगीता ठोंबरे यांचा ग्रह असाही झाला असेल की मी जो निर्णय घेईल तोच निर्णय मतदारांचाही असेल. मात्र नेत्याने एका दिवसामध्ये वेगळा निर्णय घेतला म्हणजे त्यांचे समर्थकही तोच निर्णय मान्य करतील असे दिवस आता राहिलेले नाहीत. एक तर त्या निवडणूक लढवायच्या म्हणत होत्या त्यावेळी भाजपामध्ये जे नाराज मतदार आहेत ते स्वतः त्या उभा राहणार होत्या म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. मात्र स्वतः रणांगणातून बाहेर पडून दुसऱ्याला मतदान करा असं म्हणणं हे आता मतदारांना पचलेले दिसत नाही. मग नेमकं असं काय घडलं की एवढ्या ठामपणे त्या निवडणूक लढवणार होत्या आणि अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला ? हे प्रश्नही आता विधानसभा मतदारसंघांमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे संगीता ठोंबरे यांना त्या स्वतः असताना जे मतदार त्यांच्या पाठीमागे राहणार होते ते त्यांनी पक्ष प्रवेश केलेल्या उमेदवाराला मतदान करतील का ? हा चिंतनाचा विषय आहे.