महाराष्ट्र

प्रा. डॉ. शरद हेबाळकर यांना अत्यंत सन्मानाचा श्रीदासगणू पुरस्कार जाहीर

१ लाख २५ हजार रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन होणार सन्मान


ज्येष्ठ इतिहास संशोधक-अभ्यासक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुर्णवेळ कार्यकर्ते माजी राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. शरद हेबाळकर यांना प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु करण्यात आलेला अत्यंत सन्मानाचा श्रीदासगणू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १ लाख २५ हजार रोख रु., स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

पू. स्वामी वरदानंद यांच्या प्रेरणेने सुरु झाला “श्रीदासगणू” पुरस्कार


प.पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या “श्रीदासगणू” पुरस्काराचे यंदा २६ वे वर्ष असून धर्मकार्य, देशकार्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांनी घेतलेल्या निस्पृह कष्टाची, केलेल्या नि:स्वार्थ त्यागाची दखल घ्यावी व त्यांचे महनीय कार्य समाजापुढे यावे, या हेतूने श्रीदासगणू महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीराधादामोदर प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा हा पुरस्कार डॉ. शरदराव हेबाळकर यांना जाहीर होतो आहे.

पंढरपुर येथील जन्म; बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार!


डॉ. शरद पांडुरंग हेबाळकर यांचा जन्म दि. २१/०९/१९४३ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे झाला असून एम.ए. (इतिहास) असे शिक्षण झाले आहे. ‘प्राचीन बंदरांचा इतिहास’ या विषयात त्यांनी पी.एच.डी. केली आहे. बालवयापासून त्यांच्यावर संघाचे संस्कार झाले असून १९६६ ते १९७० या दरम्यान त्यांनी नाशिक जिल्ह्यात संघ प्रचारक म्हणून काम केलेले आहे. आणिबाणीच्या काळात त्यांनी २१ महिने कारावास भोगला आहे. १९७८ ते १९८० या दरम्यान संघकार्यासाठी त्यांनी नैरोबी, केनिया, युगांडा, टांझानिया, झाम्बिया या व अन्य आफ्रिकन देशात वास्तव्य केले आहे. २००३ मध्ये अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या इतिहास व पुरातत्व विभागाच्या प्रमुख पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’ याचे २००३ ते २००६ या काळात त्यांनी ‘दक्षिण भारत संघटन मंत्री’ तर २००६ ते २०१५ या काळात ‘राष्ट्रीय महासचिव’ म्हणून काम केलेले आहे.

इतिहास संकलनासाठी भारत भ्रमण तर देश विदेशात ही प्रवास!


इतिहास संकलनाच्या कार्यासाठी भारतातील सर्व प्रांतांचा त्यांनी अनेकदा प्रवास केला असून या कामासाठी ३७ परदेशांतून त्यांनी भ्रमण केले आहे. आपल्या देशातील एक ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेली तथापि सध्या लुप्त झालेली ‘सरस्वती नदी’ हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय असून तिच्या शोध कार्यासाठी त्यांनी अनेकवेळा हिमालयाचा प्रवास केला आहे. ‘ऋग्वेदिक सरस्वती नदीचा शोध’ या प्रकल्पांतर्गत देशविदेशात त्यांनी १०० हून अधिक चर्चसत्रांचे आयोजन केलेले आहे.

“भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार” या विषयावर ४०० पेक्षा अधिक व्याख्याने!


‘भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार’ या विषयावर त्यांनी आजतागायत देशविदेशात केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी व इंग्रजी भाषेतून ४०० पेक्षा अधिक अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत. अन्य प्रबोधनात्मक विषयांवरहि त्यांनी पुण्यातील वसंत व्यख्यानमाले सारख्या नामांकित ठिकाणी देशभरातून असंख्य व्याख्याने दिली आहेत.
वाणीवर जेव्हढे प्रभुत्व आहे तितकेच त्यांचे लेखणी वरहि प्रभुत्व आहे. “भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार” या त्यांच्या पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या गेल्या असून या पुस्तकाचे हिंदी, गुजराथी, उरिया, तेलगू व कन्नड या भाषांतूनहि प्रकाशन झालेले आहे. “कृण्वंतो विश्वमार्यम्” या हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रकाशित झालेल्या ग्रंथास पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची प्रस्तावना लाभली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतून त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘इतिहास दर्पण’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे संपादन त्यांनी केलेले आहे. भारतीय अनुसंधान परिषद या संस्थेच्या संस्थापक कार्यवाह या पदाचे दायित्व त्यांनी यशस्वीपणे सांभाळले असून या अंतर्गत ‘अनुसंधान पत्रिका’ या इंग्रजी रिसर्च जर्नलच्या २६ अंकांचे संपादन त्यांनी केलेले आहे. यासवें त्यांचे ५० हून अधिक शोध निबंध प्रकाशित झाले असून अनेकानेक नियतकालिकांतून त्यांचे आजतागायत सातत्याने लिखाण सुरु असते.

गाढे अभ्यासक; हाडांचे प्रचारक

भारतीय संस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक व हाडाच्या प्रसारक असलेल्या अशा या विद्वान, व्यासंगी व्यक्तिमत्वाची यंदाच्या श्रीदासगणू पुरस्कारासाठी निवड करताना प्रतिष्ठानला विशेष आनंद होतो आहे.
श्रीदासगणू महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, कार्तिक वद्य त्रयोदशीला (दि.११/१२/२०२३, सोमवार, रोजी) “दामोदराश्रम” पंढरपूर येथे दुपारी ०४ ते ०६ या वेळात या पुरस्काराच्या प्रदानाचा कार्यक्रम होणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल व रोख रक्कम रु. १,२५,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ.शरद हेबाळकर यांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker