प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठीची सर्व तयारी पूर्ण; पाच लाख भाविक दर्शनासाठी येणार; राजेश देशमुख


देशातील बारा ज्योतिलिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. महाशिवरात्र पर्वानिमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यासोबतच पूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगरानीत ठेवण्यात येत आहे. सुमारे 5 लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. अशी माहिती वैद्यनाथ देवस्थान चे सतीश राजेश देशमुख यांनी “माध्यम” शी बोलतांना दिली.
पाच लाख भाविक दर्शनासाठी येणार


मंदिर प्रशासनाकडून अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली असून सुमारे 5 लाख भाविक वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी परळीत येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान कमिटीने दर्शनार्थीसाठी स्त्री-पुरूष व पास धारक अशा तीन स्वतंत्र रांगा ठेवल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला असून नागमोडी वळण पद्धतीने दर्शनार्थी भाविकांसाठी बॅरीकेटस् उभे करून रांगा लावल्या जाणार आहेत.


१०० सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर
मंदिर परिसरात 100 वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती देवस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान नेहमीप्रमाणेच मुख्य प्रवेशद्वारात दर्शन रांगेगेतील भाविकांची तपासणी करून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. कॅमेरा, मोबाईल, हॅण्डबॅग किंवा पिशवी असे कोणतेही साहित्य मंदिराच्या आत घेवून जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शनिवार दि. 18 रोजी महाशिवरात्र असून आदल्या दिवशी ( दि. 17 ) पासूनच रात्री 12 वाजल्यानंतर महाशिवरात्री निमित्त दर्शनार्थी भाविकांची गर्दी सुरू होते. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा रात्रीपासूनच कार्यान्वीत केल्या जाणार आहेत. सुमारे 5 लाख भाविक महाशिवरात्री निमित्त श्रीं चे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


देवस्थानच्या विश्वस्तांची तयारी पुर्ण; देशमुख
वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक येणार असून या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणेच दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या आहेत. पास धारकांसाठी स्वतंत्र रांग असून मंदिर परिसरात बँकेच्या काऊंटरवरून भाविकांना पास उपलब्ध करून घेता येतील. आम्ही देवस्थानच्या वतिने भाविकांना दर्शन रांगेत थंड पाणी उपलब्ध करून देणार आहोत. शंभरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर नजर राहणार असून स्थानिक पोलिस व खाजगी सुरक्षा यंत्रणा यांची सुलभ दर्शनासाठी मदत घेतली जाणार आहे. शेवटच्या भाविकांना जास्तीत जास्त अर्ध्या तासात दर्शन घेवून परत जाता येईल अशी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
- राजेश देशमुख
(सचिव, वैद्यनाथ देवस्थान)


३०० हुन अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी!
भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होवू नये, संपूर्ण व्यवस्था सुरळीत व सुरक्षित पार पाडली जावी या दृष्टीकोनातून पोलिसांच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्तठेवण्यात येणार आहे. 20 पोलीस अधिकारी, 150 महिला व पुरुष कर्मचारी, 100 होमगार्ड, एक दंगल नियंत्रण पथक (25 कर्मचारी), डीबी पथक, शहर वाहतूक पथक, अग्निशमन पथक सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. दरम्यान भाविकांनी दर्शनाला जातांना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.