महाराष्ट्र

परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रुजवायची आहे; पंकजा मुंडे

राजकारणात माझा कोणा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला आहे. राम, अर्जुनासारख्या प्रवृत्ती समाजाचं भलं करत असतात, धर्माची स्थापना करत असतात. याऊलट रावण अहंकारी होता, अगदी तसंच राजकारणात जेव्हा सत्तेला अहंकाराची बाधा होते तेव्हा गर्वाचं घर खाली होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ विकासच नाही तर परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं. तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे, त्यासाठी आता तुम्हीच मला दत्तक घ्या, गावोगावी विकासाची लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं.

१४ कोटींच्या पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन

घाटनांदुर, सोमनवाडी, निरपना व बागझरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शनिवारी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, हिंदूलाल काकडे, संजय गिराम, जीवनराव किर्दत, बिभीषण गिते, बंडू चाटे, घाटनांदुरचे सरपंच महेश गारठे, दत्ता जाधव, लतीफभाई कुरेशी, सोमनवाडीच्या सरपंच यमुनाबाई सोनवणे, बागझरीचे सरपंच विनोद लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

गुणी मतदार संघाला अवगुणी करण्याची काहिंनी सुपारी घेतलीय

आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, परळी फार गुणी मतदारसंघ होता पण त्याला अवगुणी करण्याची सुपारी काहींनी घेतलीय. मी आमदार असताना गावोगावच्या विकासाला सुरवात केली ती आजही सुरू आहे. आपण लोकनेते मुंडे साहेबांसारखा नेता देशाला दिला, त्यांचेवर जीवापाड प्रेम केलं, ते कर्ज माझेवर आहे, आपली सेवा करणं, महिलांना सुरक्षा, सन्मान देणं माझं कर्तव्य आहे. राजकारणात हार जीत असतेच, माझ्या पराभवाची जेवढी चर्चा झाली, तेवढी त्यांच्या विजयाची झाली नाही. आता मी नसण्याची किंमत लोकांना कळायला लागलीयं. मंत्री असताना मी खऱ्या पालकत्वाची भूमिका निभावली. आरोग्य केंद्रापासून ते स्मशानभूमी पर्यंत प्रत्येक गावाला न मागता निधी दिला. ते माझं कामच होतं. पण केवळ विकासच नाही तर चांगली संस्कृती रूजवून मतदारसंघाला पूर्वीसारखे दिवस आणायचेत असं पंकजाताई म्हणाल्या.

कामं केली पण कधी श्रेय घेतलं नाही

मंत्री असताना एकेका गावाला पाच पाच कोटीचा निधी दिला, पण कधी श्रेय घेतलं नाही की नारळ फोडायला आले नाही. गुत्तेदार कोण आहे हे ही कधी जाणून घेतले नाही. निधी देताना पक्ष, जात धर्म पाहिला नाही, सर्वाना समान निधी दिला. मात्र मध्यंतरीच्या अडीच तीन वर्षांत राष्ट्रवादीकडे सत्ता होती त्यांनी तर काहीच केलं नाही पण मी आणलेल्या निधीचेच नारळ ते फोडत होते. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, जलजीवन मिशनची कामे ही आम्ही मंजूर करून आणलेली असताना त्याचं श्रेय घेण्यासाठी मात्र ते पुढे येत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

खडयातून तांदूळ काढतेयं..

खरं तर तांदळातून खडे काढायचे असतात पण राजकारणात सध्या मी खडयातून तांदूळ काढण्याचे काम करत आहे, चांगला चांगला माणूस निवडत आहे जेणे करून आपली चांगली सेवा मला करता येईल. मी स्वतःचा स्वार्थ किंवा घरं भरण्यासाठी राजकारणात आले नाही, मला तुमचं हित बघायचयं. मुंडे साहेबांनी तुमच्यासाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचयं. आपल्या सेवेतून माझ्या पित्याचं ऋण फेडायच आहे. माझ्या माय माऊलीच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी मी इथं आले आहे. आता विकास थांबणार नाही, कुठलीही अडचण येऊ देणार नाही फक्त आपली साथ व आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताई यांनी यावेळी केलं.

लेकीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांची दिवाळी ; जेसीबीने फुलांची उधळण

कार्यक्रमाच्या निमित्ताने अंबाजोगाई तालुक्यातील गावांमध्ये जाताना रस्त्यात धर्मापूरी, कुसळवाडी, बाभळगाव, निरपना, बागझरी, सोमनवाडी येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी जेसीबीने फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत-गाजत अतिशय उत्साह आणि जल्लोषात जोरदार स्वागत केलं. प्रत्येक गावात यानिमित्ताने दिवाळीच साजरी झाली. या स्वागतानं आणि गावकऱ्यांच्या या प्रेमानं आपण भारावून गेलो असे पंकजाताई म्हणाल्या. कार्यक्रमास ठिक ठिकाणी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker