महाराष्ट्र

पंकज कुमावत अंबाजोगाईचे नवे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख

बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन विभागात सर्व प्रथम केज येथे डीवायएसपी म्हणून रुजू झालेले प्रशिक्षणार्थी आयपीएस पंकज कुमावत यांनी आता अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्यातील १० प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस प्रशासनाने नुकतेच काढले असून या यादीत पंकज कुमावत आता स्वतंत्र रीत्या अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पंकज कुमावत यांच्या अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा आदेश स्वीकारण्याचे आदेश निघाले असले तरी सध्या अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळणा-या कविता नेरकर यांच्या इतरत्र बदलीचे आदेश अद्याप पर्यंत तरी निघाले नसल्याचे समजते.
अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाचा पदभार पंकज कुमावत स्विकारणार असल्याचे समजताच अंबाजोगाई आणि परिसरातील सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर नंबरदोन चे व्यवसाय करणाऱ्या वर्गामध्ये घबराट निर्माण झाली असल्याचे दिसून येते आहे.
तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात केज येथे डीवायएसपी म्हणून रुजू झालेल्या पंकज कुमावत यांनी आपल्या उत्तम कार्यपद्धती मुळे जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून एक आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. केज डिवायएसपी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आजपर्यंतच्या कालावधीत त्यांनी नंबर दोन चे व्यवसाय करणा-या विरोधात केलेल्या दबंग कार्यवाही चे जिल्हाभरातील जनतेने स्वागत केले आहे.

कोण आहेत पंकज कुमावत?

घरी गुंठाभर जमिन नाही. आजोबा गवंडी कामाबरोबरच लोकांची शेती वाट्याने करत. पुढे आई – वडिल देखील टेलरींगचे काम करत. मात्र, आई-वडिलांचे कष्ट आणि पुण्य फळाले आणि तिन्ही मुलांनी यशोशिखर गाठले. पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणावे असे दोन मुले आयपीएस आणि एक मुलगा डॉक्टर झाला. भाग्यवान आई वडिलांचेही पांग या पुत्रांनी फेडले आहेत. हा प्रेरणादायी प्रवास आहे अंबाजोगाई येथे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणा-या पंकज कुमावत यांचा.
जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब, नाट्य कलामंदीराच्या नावाखाली सुरू असलेला अवैध वेश्याव्यवसाय उद्धस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा, क्लब, बायोडिझेल अशा धडाकेबाज कारवायांनी पंकज कुमावत चर्चेत आले आहेत.
यासर्व धडाकेबाज कारवायांसह त्यांचा व्यक्तीगत जीवनाचा प्रवासही खडतर आणि प्रेरणादायी आहे. राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी असलेल्या राजेश्वरी व सुभाष कुमावत दाम्पत्याच्या चार मुलांपैकी पंकज कुमावत थोरले आहेत. त्यांचा धाकटा भाऊ अमित देखील आयपीएस (भारतीय पोलिस सेवा IPS), तर संजय डॉक्टर होऊन शल्यविशारद तज्ज्ञ (एमबीबीएस, एमएस) आहेत. त्यांना एक विवाहित बहिण आहे.

२०१४ मध्ये आयआयटी मधुन पुर्ण केली अभियांत्रिकीची पदवी

स्कॉलर स्टुडंट, आयआयटीमधून अभियंता कुमावत कुटूंबातील चार भावंडांपैकी थोरले असलेले पंकज शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी होते. २२ डिसेंबर १९९२ ला जन्मलेल्या पंकज कुमावत यांनी २००७ साली दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळविले. २००९ साली १२ वी विज्ञान परीक्षेत त्यांनी ८९.६० टक्के गुण मिळविले. गणित विषयात रुची असलेल्या पंकज कुमावत यांनी दिल्ली आयआयटीमधून अभियांत्रिकीची डिग्री मिळविली. २०१४ साली आयआयटीमधील (IIT) अभियांत्रिकीची पदवी हाती असलेल्या पंकज कुमावत यांच्यासमोर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी लाल गालिचे अंथरले. त्यांनी नोएडास्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस ऍनालिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली. कंपनीने त्यांना १० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरविल्या. त्या ठिकाणी त्यांनी दोन वर्षे नोकरी ही केली होती.

दोन वर्षे केली अलिशान नौकरी

नोकरीबहुराष्ट्रीय कंपनीत बिझनेस ऍनालिस्ट म्हणून नोकरी करणाऱ्या पंकज कुमावत यांना दहा लाख रुपयांचे पॅकेज, अलिशान गाडी आणि बंगल्यासह अनेक सुविधा होत्या. नोएडासारख्या ठिकाणी शहरी लाईफ जगण्यासाठी सगळ्या बाबी त्यांच्या हाती होत्या. परंतु, सामान्यांशी कनेक्टीव्हिटी नव्हती. भारतीय प्रशासन सेवा किंवा भारतीय पोलिस सेवेत गेले तर सामान्यांसाठी काही तरी करता येते, समाज बदलता येतो, घडविता येतो, असा विचार कायम त्यांच्या मनात घोळायचा. म्हणून त्यांनी अलिशान जीवनपद्धती सोडून परीक्षेच्या तयारीसाठी २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

२०१८ चे आयपीएस अधिकारी

शिकवणी नाही, सेल्फ स्टडी अन॒ दुसऱ्याच प्रयत्नात यश२०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यांनी दिल्लीत तयारी सुरु केली. त्यांनी कुठलीही शिकवणी लावली नाही. सेल्फ स्टडी करतानाच पहिल्यांदा २०१७ साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेतही त्यांना यश मिळाल्याने ते मुलाखतीपर्यंतही पोचले. मात्र, निवड यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. पुढे २०१८ सालच्या परीक्षेत त्यांना ४२३ वा रँक मिळाला. त्यांना भारतीय पोलिस सेवेतील महाराष्ट्र केडर मिळाले. त्यांनी ट्रेनिंग देखील सुरु केली. नंतरही त्यांनी पुन्हा एकदा भारतीय प्रशासन सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना पुन्हा एकदा भारतीय पोलिस सेवेचेच केडर मिळाले. त्यांच्या पत्नी लांची प्रजापत या एलएलएम आहेत.

माध्यम न्यूज नेटवर्क च्या शुभेच्छा…!


भारतीय पोलीस सेवेत आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झालेल्या पंकज कुमावत यांचा पोलीस दलातील सेवेत दाखल झाल्यापासून आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. केज येथे डीवायएसपी म्हणून यशस्वी कारकीर्द पुर्ण केल्यानंतर अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सुरु होणा-या पंकज कुमावत यांच्या उत्तम कारकिर्दीस माध्यम न्यूज नेटवर्क च्या खुप खुप शुभेच्छा…!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker