अंबाजोगाई शहरांमध्ये गेली अनेक वर्षांपासून निसर्गप्रेमी मित्रांचा एक गट सक्रिय आहे. भल्या पहाटे उठून शहराजवळील निसर्गाच्या सानिध्यात जावून आढळून येणाऱ्या विविध पक्षी, फुलपाखरे आणि निसर्गाच्या विहंगम सौंदर्याची चित्रे काढणे, ती जतन करणे, विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी ती पाठवणे व शक्य असेल तेथे स्वखर्चाने या चित्रांची प्रदर्शनीय भरवणे असे उपक्रम ही मंडळी “विहंगम भोवताल” या बॅनरखाली आयोजित करतात.
आपापल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनेक नामवंत डॉक्टर, व्यावसायिक हौशी छायाचित्रकारांचा या ग्रुप मध्ये समावेश आहे. या “विहंगम भोवताल” ग्रुपच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह परिसरात आपल्या कॅमेऱ्यातुन टिपलेल्या विविध प्रजातींच्या वेगवेगळ्या पक्षांची चित्रप्रदर्शनी भरवली आहे. ही चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी शहरातील पक्षीमित्रांनी गर्दी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्या आणि प्रख्यात -हदयरोगतज्ञ डॉ. शुभदा लोहिया आणि अभिजित लोहिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,”आकाशात विहरता येण्याचे आकर्षण आपल्या सर्वांनाच असते. आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्यांना पाहिले की मन आपोआप ‘स्वच्छंदी’ बनते. पक्ष्यांचे हे ‘स्वच्छंदी’ जीवन अनुभवताना आम्ही पक्षी मित्र पक्ष्यांमधील विविधता पाहून थक्क झालो. त्यांच्यातील ही विविधता आपल्या सर्वांपर्यंत फोटोच्या माध्यमाने पोहोचवण्याचा हा प्रयत्न.
पक्ष्यांच्या विविध जाती-प्रजाती आहेत. त्यापैकी अंबाजोगाई परिसरात साधारण २४० प्रकारचे पक्षी आढळतात. पक्षी जीवन निरखताना आपोआप ‘भोवताल’चा परिसर न्याहाळला जातो. त्यातूनच फुलांची मैत्री करणाऱ्या फुलपाखरांचेही दर्शन होत होते. या फुलपाखरांच्याही आपल्याकडे बऱ्याच प्रजाती आढळतात याची प्रचिती आली.
फुलपाखरांच्या सर्व प्रजातींची नोंद करण्यात आम्ही जरी अजून यशस्वी झालो नसलो तरी देखील काही फुलपाखरे ही आपल्या भेटीसाठी या प्रदर्शनीत चित्ररुपाने मुद्दाम ठेवली आहेत.
आमच्या या गटाने तिसावे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित केले होते. तसेच या गटाने एक पुस्तिका छापली आहे ज्यामध्ये साधारण १७४ पक्ष्यांचे फोटो व थोडक्यात माहिती आहे. या गटातील सर्वजण नेहमी अंबाजोगाईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जात असतात व त्यावेळी सापडलेल्या पक्ष्यांची नोंद करून ठेवतात. ही नोंद इ बर्ड या जागतिक ऍप वर सुद्धा अपलोड करतात. त्यामुळे सर्व पक्ष्यांबद्दल ची यादी सहज उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांबद्दलची देखील माहिती या ॲपवर सहज उपलब्ध होऊ शकते.
वेळोवेळी वृक्षारोपण करण्यावर या गटाचा भर असतो. हे पक्षी मित्र एखादा जखमी पक्षी सापडला तर वनविभागाच्या मदतीने त्या पक्षाची निगा राखतात व त्याचे पुनर्वसन करतात.
२००६ पासून अविष्कार पक्षीमित्र शिबिर आयोजित करण्यात येत असून त्यातून पुढे एकमेकांच्या ओळखीने हा गट तयार झाला आणि तेंव्हापासून हा गट आज ही सक्रिय आहे. या गटामध्ये प्रामुख्याने प्रा. अभिजित लोहिया, डॉ. शुभदा लोहिया, मुन्ना सोमाणी, डॉ. अविनाश मुंडे, शंतनु सोमवंशी, डॉ. अजिंक्य भिसे, निरज गौड़, सुशांत सोमवंशी या मंडळींचा समावेश आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह निमित्ताने यावर्षी २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय समारोहात या निसर्गप्रेमींना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या पक्षी आणि फुलपाखरांचे चित्र प्रदर्शनी मध्ये फुलपाखरांच्या फोटोंची भर घातली आहे. हे वेगळे वैशिष्ट्य आहे. एकूण १९ फुलपाखरांचे फोटो लावण्यात आले असून आपल्या परिसरातील साधारण तीस एक प्रकारच्या फुलपाखरांची ओळख नोंदविण्यात आली आहे. ही चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी शहरातील पक्षीमित्रांनी मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.