नाव – चिन्ह महत्वाचे नाही; जिद्द महत्वाची!


मधुकर भावे
शिवसेनेकडील शिवधनुष्य गेले. निशाणी गेली…. पक्षाचे नावही गेले. आता सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय येईल, ते कोणाला ठावे, असे म्हणायचे. फूट पडलेली शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना यांचे नेते निवडणूक आयोगाकडे याआधीच पोहोचले होते. संकेताप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यायला नको होता. पण या जर- तर च्या गोष्टी. निवडणूक़ आयोग काय निर्णय देणार, हे सगळ्यांनाच माहिती होते. उद्धव ठाकरे गटाने जेव्हा निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली तेव्हा निर्णय विरोधात जाणार, हे ठाकरे गट सोडून, सगळ्यांकडून व्यक्त होत होते.
सध्याच्या अनेक यंत्रणा सरकारला अनुकूल आहेत. त्यात निवडणूक आयोग आघाडीवर आहे. असे सांगतात की, सध्याचे निवडणूक आयुक्त श्री. सुशील चंद्रा हे भारतीय प्रशासन सेवेतील नाहीत. (आय. ए. एस.- भा. प्र. से) नाहीत. आतापर्यंतचे सर्व निवडणूक आयुक्त भारतीय प्रशासन सेवेतील होते. सुशीलचंद्रा हे यू. पी. एस. सी. च्या १९८० च्या बॅचच्या महसूल विभागाचे आहेत. त्यांची नेमणूक झाली तेव्हा ते लक्षात आले की, आता हे आयुक्त महाशय शासनाचे एक भाग होतील. त्याची प्रचिती येणे नैसर्गिक आहे. भारतीय निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा भाग नाही. स्वायत्त आहे. राज्य घटनेच्या ३२४ कलमान्वये या निवडणूक आयोगाला स्वतंत्र व्यवस्थेचा दर्जा दिलेला आहे.
देशातील सर्व निवडणुकांचे अधिकार या आयुक्तांना आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक ठरवणे… यंत्रणा तयार करणे… उमेदवारांचे निकाल लागताना आलेल्या हरकती ऐकणे, त्यावर निर्णय देणे ही सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने पूर्ण करायची आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये जात-धर्म सर्व प्रकारचा वापर खुलेपणाने झाला. निवडणूक आयोगाने त्यावर सक्त देखरेख करायची असते. पण तसे घडलेले नाही. या सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे गृहित धरून चालायला हवे की, आपल्या बाजूने निर्णय येणार नाहीत.
यापूर्वी दोन पक्षांचे वाद जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेले तेव्हा अनेकांची चिन्हे गोठवली गेली. एकाच पक्षाच्या नावाकरिता कधी काँग्रेस (एस) कधी काँग्रेस (आर) अशी तुकडे करून नावे मिळाली. आताच्या िनर्णयानंतर शिवसेनेला नाव-िनशाणी सगळेच काही गमवावे लागलेले आहे. राजकारणात एकदा पिछेहाट सुरू झाली की, ती सर्वबाजूंनी होते. घरात किंवा राजकारणात काही दिवस फिरतात. ते आपले नसतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी आयुष्यात कधीच घडत नाही. घरातही नाही… बाहेरही नाही… राजकारणात तर अजिबात नाही. त्यामुळे ठाकरे सरकार पडले त्याच दिवशी हे स्पष्ट झाले की, फुटलेले आमदार हे पूर्णपणे भाजपाच्या आहारी आहेत. त्यांच्या पक्षाचे नाव कोणतेही असले तरी, आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरले तरी, भाजपाच्या लेखी शिंदे आणि त्यांचा पक्षही त्यांची उपशाखा आहे. आज ना उद्या निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला हा पक्ष भाजपामध्ये विलीनही होऊ शकतो.
बाळासाहेबांचा फोटा वापरून या पक्षाने आपली प्रतिमा उभी केली असली तरी, आणि भाजपासोबत युती केली असली तरी, बाळासाहेब ठाकरे भाजपाला कमळाबाई म्हणायचे… कधी म्हणायचे… शिवसेनेची भाजपाबरोबर युती होती तेव्हाही म्हणायचे… भाजपाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाचे उमेदवार भैरोसिंह शेखावत यांना अनधिकृतपणे उभे केले तेव्हा, भाजपाच्या सोबत युती केलेल्या बाळासाहेबांनी जाहीर करून टाकले की, भैरोसिंह वैगेरे काही नाही… भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना मते देणार नाही. आमची सगळी मते काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना देणार. त्याप्रमाणे त्यांनी मते दिली. भाजपासोबत राहूनही बाळासाहेब त्यांना हवे तेव्हा तडकावून बोलत होते. त्यांना हवा असलेला निर्णय अंमलात आणत होते. आता ज्यांना ‘शिवसेना पक्ष’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ मिळाला असला तरी… बाळासाहेबांजवळ जे धैर्य होते ते धैर्य भाजपाबाबत हे नेते दाखवू शकणार नाहीत. हा मुख्य फरक आहे. त्यामुळे त्यांना फोटोसाठी बाळासाहेब वापरायचे आहेत…. आनंद दिघेसाहेबही वापरायचे आहेत. आणि भाजपाला ते सगळे सोयीचे आहे. त्यात त्यांचे काहीही नुकसान नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या बाजूने िनर्णय झाला यात फार काही धक्कादायक नाही. आता त्यामुळे शिंदेगटात जल्लोष होईल… आजच्या राजकारणात रोजच्या पानभर जाहीराती… जल्लोषाचे फोटो.. यावरच राजकारण करता येत असल्यामुळे प्रत्यक्ष सामान्य माणसांच्या प्रश्नाची चर्चा नसली तरी दिवस पुढे सरकतच आहे. त्यामुळे जाहीरातीवर राजकारण करता येते. आणि जल्लोषावर दिवस संपून जातो. असे आजचे सोपे राजकारण झालेले आहे.
आता प्रश्न शिंदे गटाचा नसून उद्धव ठाकरे यांचा आहे.
एकेकाळी काँग्रेसविरोधात असलेले उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशच्या लढाईच्या वेळी इंदिरा गांधीच्या धैर्याचे आणि शौर्याचे अभिनंदन केले होते. तसे तर त्यावेळचे जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’, ‘रणचंडिका’ अशा विशेषणांनी गौरवले होतेच… या इंदिरा गांधी जेव्हा जनता पक्षाच्या विरोधात होत्या त्यावेळी एकाकीच होत्या. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. त्यांच्यासोबत जाणे म्हणजे तुरुंगात जाणे, अशी भीती होती. आज त्याच्या दसपट दहशत आहे. तेव्हा रस्त्यावर विरोध करता येत होता. त्यावेळी इंिदरांजीच्या सोबत महाराष्ट्रात जवाहरलाल दर्डा, जांबुवंतराव धोटे, बॅरिस्टर अंतुले, नाशिकराव तिरपुडे, रामराव अिदक असे मोजके नेते होते. इंदिराजींच्या पक्षाला त्यावेळी एकदा ‘गाय-वासरू’ हे चिन्ह घेवून लढावे लागले होते. नंतर त्यांचे तेही चिन्ह गेले आणि निवडणूक आयोगाच्या चिन्हांच्या खोलीतील कोपऱ्यात पडलेला दुर्लक्षित झालेला एक ‘हात’ वसंत साठे यांना दिसला. त्यावेळी त्यांना इंदिराजींना ‘हात हे प्रभावी चिन्ह होईल’, अशी कल्पना दिली. आणि काय चमत्कार झाला, हे लोकांनी पाहिले. इंदिरा काँग्रेसच्या विरोधात सभा घेणाऱ्यांनी व्यासपीठावर आल्यावर सोयीप्रमाणे उजवा हात हवेत फिरवला तेव्हा त्यांच्या लक्षात आले…. ‘अरे हे चिन्ह इंदिराजी यांचे आहे.’ त्या चिन्हाचा प्रचार विरोधी पक्षांनीच जास्त केला. मुद्दा असा आहे की, चिन्ह महत्त्वाचे नाही. जिद्द महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्या पक्षातून १९८० साली बॅ. अंतुले साहेबांनी ५० आमदारांना सत्ताधारी बाकावर घेतले. त्यात गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले असे दिग्गज होते. शरद पवार साहेबांजवळ पाच आमदार राहिले. १९८५ साली पवारसाहेबांनी पुन्हा नवे ५० आमदार निवडून आणले. त्यांच्या निवडणूक चिन्हाचाही वाद झालाच होता. त्यांनी ‘गजराचे घड्याळ’ घेतले आणि बघता बघता ते निवडणूक चिन्ह लोकांच्या मनात ठसले. त्यामुळे निशाणी गेली… चिन्ह गेले… नाव गेले… त्यांनी फार फरक पडत नाही. जिद्द गेली तर सगळा फरक पडेल… त्यामुळे राजकारणात चढ-उतार असणार, हे लक्षात ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात.
उद्धवसाहेब तुमच्या काही चुका झाल्या… मुख्यमंत्री असताना झाल्या. कोरोना होता हे मान्य. पण तुम्ही एवढे कोंडून घेतलेत…. की, तुमच्या पक्षाचे आमदारच तुटले. शिवाय संजय राऊत, अनिल परब, डाव्या- उजव्या हाताला कायम. त्यांना मातोश्रीची दारे खुली. बाकी आमदारांना बंद… कोरोनाची भीती शरद पवार साहेबांनाही होती… पण त्यांच्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात त्यांनी खुर्च्यांचे अंतर दहा फुटांवर ठेवले. भेटणाऱ्यांची गर्दी तिच होती… राजकारण करताना घरात बसून चालत नाही. आणि आता तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राजकारण होणारच नाही. त्यामुळे धनुष्यबाण गेला म्हणून वैधव्य आले, असे समजण्याचे कारण नाही. तुमच्या हातात मशाल अजूनआहे… मशाल हे धनुष्य बाणाहून प्रभावी चिन्ह आहे. ते ही चिन्ह काढून घेतले तर जे मिळेल ते चिन्ह घेवून उभे रहा… आज तुम्हाला सांगतो, तुम्ही+ काँग्रेस+ राष्ट्रवादी हे जर इमानदारीने एकत्र राहिले तर ‘चिन्ह’ हा विषय महत्त्वाचा नाही. लोकांचे प्रश्न वाऱ्यावर पडलेले आहेत. जाहिरातीने सरकारं चालत नसतात. पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री यांनी कितीही सांगितले तरी महाराष्ट्रात एकट्या भाजपाला बहुमत मिळणे शक्य नाही. मुंबईत त्यांचा प्रभाव आहे… ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा प्रभाव राहिल… पण, मुंबई- ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही.
लोकं महागाईने, बेरोजगारीने आताच्या घाणेरड्या राजकारणाने उबगलेले आहेत… तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र रहा… तुमच्या जोडीला आता वंचित आघाडी आलेली आहे. या वंचित आघाडीची चांगली ताकद आहे. त्याचा फायदा होईल. शिवाय तुमच्या तिघांच्या सोबत नसलेले पण भाजपाविरोधात असलेले, असंख्य पुरोगामी विचारांचे छोटे-मोठे कार्यकर्ते ही मोठी ताकद आहे. या सगळ्यांना बरोबर घ्या. भाजपाच्या विरोधात महाराष्ट्रात ६० टक्के मते पडली आहेत, हे लक्षात ठेवा. मग काय फरक पडतो बघा… ग्रामीण भाग रखरखाट झालेला आहे… भाजपाची सगळी शक्ती मध्यमवर्गावर आहे. शहरावर आहे. त्यांच्या सगळ्या योजना शहरांतकरिता आहेत. तरी सगळी शहरं त्यांची असणार नाहीत.
हा महाराष्ट्र आहे. सगळे पूर्वग्रह सोडून द्या. जर, प्रामाणिकपणे एकत्र झालात तर चिन्ह, निशाण हे विषय दुय्यम आहेत. दुर्दम्य इच्छशक्ती आणि लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची तयारी, हेच दोन विषय यश मिळवून देतील. आणखीन एक लक्षात घ्या… देशातील न्यायालये अजूनही रामशास्त्रीबाण्याची आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रचूडसाहेब यांची निवेदने वाचल्यावर हा न्यायस्तंभ मजबूत आहे, याची खात्री पटते. पण, असेही गृहीत धरून चाला की, प्रतिकूल तेच घडेल. समजा, न्यायालयाचाही निर्णय विरोधात गेला तरी, लढायची जिद्द ठेवावीच लागेल. आणि तीच कोणत्याही पक्षाला तारून नेईल. फक्त लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरा. वृत्तपत्रांच्या चौथ्या स्तंभालाही अआता सरकारी आधार लागतो आहे. किंवा त्यावरच ती उभी आहेत. त्यामुळेही फरक पडणार नाही. पूर्वी काही नेते खोटे बोलायचे… माध्यमे त्यांना उघडी पाडायची…. आता माध्यमेच अनेक गोष्टी खोट्या सांगतात… नियत बदलली की, असे होते. त्यालाही महत्त्व देवू नका. एका मित्राने दोन ओळी पाठवल्या… तो म्हणाला, आजची वृत्तपत्रे पाहिल्यावर असे वाटून जाते की….
‘शब्द अपना अर्थ खो चुके हैं…’
हम कितने व्यर्थ हो चुके हैं…
आणि म्हणून आता वृत्तपत्रे लोकांच्याबरोबर राहतील, याची खात्री नाही. पूर्वी राजहंस होते… आता ते कुठे असणार… याच मित्राने पाठवलेल्या चार ओळी छान आहेत… त्याचाच आधार घेवून पुढे लढाई लढावी लागणार आहे.
राजहंस लयास गेले…
उरली आता कबुतरे…
पुतळयापेक्षाही हल्ली
मोठे झाले चबुतरे…
सध्या एवढेच…
मधुकर भावे, 📞9892033458…..