ठळक बातम्या

नांदेडच्या सांस्कृतिक सुवर्ण युगाचा वाटाड्या; प्रभाकर कानडखेडकर !

गाईड नावाच्या उच्चारासरशी आपल्या डोळ्यासमोर येतो तो देवानंदचा अजरामर सिनेमा ‘गाईड’. इतिहासात मग्न प्रकांड पंडीताचा क्षणीक वाटाड्या होत आपल्या लोभस व्यक्तिमत्वाच्या फूंकरीने थिजलेल्या त्याच्या पत्नीच्या – रोझीच्या कलागुणांवर जमलेली जळमटे दूर सारुन तिच्यात आत्मविश्र्वास फुलवीत एका प्रतिभाशाली नर्तकीचे दर्शन जगास घडवितो. दुष्कृत्याने भरलेला आपला भूतकाळ विसरुन निर्जल ओसाड प्रदेशात पर्जन्य वर्षावासाठी आत्मक्लेष करीत अर्जव करणारा, आणि ते सत्यात ऊतरल्यावर सामान्याच्या नजरेत संतपदला पोंहचलेला ‘गाईड’ राजू.
अर्धवट, अपरिचित कुठल्याशा ऐतिहासिक स्थळी गेलो, की आपणास प्रकर्षाने उणीव भासते ती एका माहितगार वाटाड्याची. इतिहासाच्या पुस्तकाची पाने पलटावीत तसे त्या स्थळाची इत्यंभूत माहिती देत आपणास अलगदपणे काळाआड दडलेल्या एका वेगळ्या दुनियेची सफ़र घडवून आणणार्‍या व्यक्तिची. गाईडची. नांदेडच्या गत सुवर्ण काळात घेऊन जाणारा आपला वाटाड्याही तेवढाच विश्र्वासाहर्य हवा! नांदेड नगरीतील गत पन्नास वर्षातील सांस्कृतिक क्षेत्रातील बहुतांश घटनांचे साक्षीदार आणि त्यापूर्वीच्या तेवढ्याच काळाची इत्यंभूत माहिती असणारी व्यक्ती म्हणून प्रभाकरराव कानडखेडकराचे नाव सर्वमुखी आहे.
शहरातील जुने प्राच्यविद्याकेंद्र सिध्दनाथपुरी आणि अधुनिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे ज्ञानकेंद्र प्रतिभा निकेतन हि दोन्ही केंद्रे गोदाकाठी वसलेल्या जुन्या नांदेडात. ह्या भागातील वास्तव्यामुळे त्यांचा जवळून असलेला संबध. मधमाशाचे मोहळ असल्यागत कधी काळी शहरातील मातब्बरांचे वास्तव्य असणारा भाग होळी. पूर्वपार वास्तव्य तिथेच असल्यामुळे बालपणापासून तेथील पिढिजात सरदेशपांडे, डोईफोडे, सरसर, देशमुख, टोके,आडे आदी घराण्यांशी असलेला घनिष्ठ परिचय. वि.द.सर्जे, प्र.तु. शास्त्री, ल.प्र. पांडे, नरहर कुरुंदकर आदी गुरुजनांचा दाट मायेचा स्नेह होता. शहरातील शिक्षणाचे अधुनिक ज्ञानकेंद्र पीपल्स कॉलेजात परक्या मुलकातून शहरात नव्याने दाखल झालेल्या शेवाळकर, शिरवाडकर, गाडगीळ आदी प्राध्यापकाशीही तेवढीच जवळीक असलेले हे व्यक्तिमत्व. उच्च शिक्षीत राम नारायण काबरा, कमलकिशोर कदम हे राजकारणी असोत की जुन्या पिढीतील शामराव ‘बाबा’ बोधनकर. पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांना ‘दादा’ संबोधत त्यांची सदैव साथ करीत विष्णूकवीच्या मठाच्या जिर्णोध्दराची त्यांची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी माहूरवासिनीच्या दरबारात संगीतसेवेचा, ‘माझी रेणूका माऊली’ ह्या अार्जवाचा आग्रह ऊषा मंगेशकराकडे धरणारे प्रभाकरराव. ‘अरण्य’ हेच आपले नीजधाम मानणार्‍या मारोती चित्तमपल्लीच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या पालखीचे भोईत्व पत्करणारे कानडखेडकर. ज्या निष्ठेनी ते कुरुंदकर गुरुजी सोबत होते त्याच स्नेहभावानी त्यांनी वैदर्भीय राम शेवाळकराचीही सोबत केली. प.पू. रामानंद स्वामीजी समोर नतमस्तक होणारा ‘प्रभाकर’ पुढे तेवढ्याच आदराने गोविंदभाईशी कानगोष्टीही करीता झाला. ध्वनीवर्धकाची गरज नसल्यागत खड्या, स्पष्ट आवाजात बोलणारे कानडखेडकर हे शेवाळकर, मंगेशकर, बोधनकर , डोईफोडे, आमटे, इ. कुटुंबातील एक सदस्य असल्यागत मृदू स्वरात त्यांच्याशी संवाद साधतात तेव्हा खरंतर ते अण्णासाहेब गुंजकाराचे शिष्यत्व पत्करुन नाथराव नेरलकरासारखे पट्टीचे गायकही होऊ शकले असते ह्याची खात्री पटते.
कांहीकाळ पीपल्स कॉलेजमध्ये रमलेले प्रासादिक मधाळ भाषेत मांडणी करणारे वाचस्पती राम शेवाळकर, तर आपल्या वैचारीक मांडणीच्या आड येणार्‍यांची भिडभाड न ठेवता सडेतोड मांडणी करणारे नरहर कुरुंदकर आणि मार्क्सच्या मांडणीनुसार शब्दातूनही ओल न जाणवू देणारे डॉ.स.रा.गाडगीळ यांच्या खाजगीत प्रभाकररावाचा शिरकाव कसा? शहरातील सर्वच आणि बाहेरगावहून येणार्‍या बहुतांश नामवंत, प्रतिभावंत, कलावंताच्या खाजगीत वावर असण्याइतपत प्रभाकररावाचा त्यांच्यांशी स्नेह जुळतो कसा हे मला पडलेल कोडं. आज विस्मृतीत गेलेल्या प्रतिभा नाट्य मंदिर, कलामंदिर येथील प्रत्येक सांस्कतिक कार्यक्रमाच्या अायोजनात ‘गना’ अंबेकराप्रमाणे हिरीरीने सहभागी होणारे. त्याच ऊत्साहाने विद्यापीठ नामांतराच्या रणधुमाळीत ‘एसेम’ जोशीना काळे झेंडे दाखविण्याच्या कार्यक्रमातही सहभाग घेणारे. आणि तो सल मनी बाळगत पुढे कुरुंदकरांचा दुस्वास करणार्‍या पुण्याच्या समाजवादी नेत्यांना खडे बोल सुनावणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून कर्तव्य पार पाडणारे प्रभाकर कानडखेडकर.
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे ज्या तन्मयतेने शिवकालीन दृश आपल्या नजरेसमोर साकारतात. जणू ती दृशे वर्तमानातील असल्यागत आपणही त्या प्रसंगाने भारावून जातो. तद्वतच प्रभाकरराव कानडखेडकर ह्या नंदिग्राम नगरीच्या सुवर्णकाळातील कितीतरी घटना, प्रसंगाची ‘व्हर्च्युअल दुनिया’ आपल्यासमोर साकारतात. जेवढा काळ आपण त्यांचे बोट धरुन असतो तेवढा काळ त्यांच्या समावेत भूतकाळातील त्याप्रसंगी प्रत्यक्ष हजर असल्याची अनुभूती आपणास मिळते, त्याकाळची सफ़र आपण अनुभवत असतो. आपली तंद्री भंग पावली कि आपण जमिनीवर अन प्रभाकरराव मात्र एकाद्या पुराण पुरुषासारखे, अक्षय वरदान लाभलेल्या सप्त चिरंजीवासारखे भूतकाळ आणि वर्तमानात लिलया विहरत असतात.

लेखक : लक्ष्मण संगेवार.
मोबा. ९३२५६२१०५०

लक्ष्मण संगेवार हे नांदेड जिल्ह्यातील रोहा येथील मुळ रहिवासी आहेत. गेले अनेक वर्षांपासून ते नांदेड येथेच स्थायिक झाले आहेत, तेंव्हा ते आता नांदेडवासीच झाले आहेत.
लक्ष्मण संगेवार हे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक आणि लेखन क्षेत्राशी संबंधित आहेत. विविध गोष्टींवर, घटनांवर स्पष्ट आणि अभ्यासपुर्ण लिहीणे हा त्यांचा स्वभाव आहे. नांदेड येथील कै. नरहर कुरुंदकर स्मारक, रेडक्रॉस रक्तपेढी, लॉरेन्स नेत्र रुग्णालय, नांदेड मर्चंट बॅंक, केमिस्ट असोसिएशन आणि नांदेड सांस्कृतिक मंच या संस्थांनी ते निगडीत आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker