महाराष्ट्र
नगरसेवक विजय जोगदंड खुन प्रकरणातील ५आरोपींची र्निदोष मुक्तता
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230118_201446-300x171.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230118_201446-300x171.jpg)
अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल
जिल्हाभरात गाजलेल्या नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड खून प्रकरणातील सहा पैकी पाच आरोपींची अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, एक आरोपी खुनाच्या घटनेनंतर पासून अद्यापही फरार आहे. या खटल्याकडे संपूर्ण अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले होते.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई नगर परिषदेतील तत्कालीन नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड ( वय ३४, रा. परळी वेस) यांचा दि. १८ जानेवारी २०१९ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास खून करण्यात आला होता. याप्रकरणी विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन याच्या फिर्यादीनुसार राज उर्फ रांजन्या भगवान जोगदंड, मनोज उर्फ मन्या भगवान जोगदंड, विजय भगवान जोगदंड, अर्जुन भगवान जोगदंड, मालू भगवान जोगदंड आणि करण भगवान जोगदंड या सहा भावांनी त्याच्यावर हल्ला केला होता. यावेळी भावाला मारहाण होत असल्याने सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या विजय यांच्यावर वरील आरोपींनी तलवार, गुप्ती आणि कोयत्याचे वार करून खून केला. सदर फिर्यादीवरून सहाही आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांनी सहापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले होते. तर, राज जोगदंड हा अद्यापही पोलिसांना सापडून शकलेला नाही. पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी पाचही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230118_201421-250x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230118_201421-250x300.jpg)
सदर प्रकरणात अर्जुन, मालू आणि करण जोगदंड या आरोपींच्या वतीने अॅड. विक्रम खंदारे तर विजय, मनोज जोगदंड यांच्या वतीने अॅड. अशोक कवडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. किर्दंत, अॅड. चव्हाण यांनी सहकार्य केले. योगायोग म्हणजे चार वर्षापूर्वी १८ जानेवारी २०१९ झालेल्या या खून प्रकरणाचा निकाल बरोबर चार वर्षांनी म्हणजे १८ जानेवारी २०२३ रोजी लागला.