ठळक बातम्या

धम्म प्रशिक्षण शिबीरे परिवर्तनाचे सशक्त माध्यम!

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाच्या निरनिराळ्या संकल्पना पुढे येत होत्या. जातीप्रधान राष्ट्र, हिन्दूप्रधान राष्ट्र, साम्यवादी किंवा समाजवादी राष्ट्र, लोकशाहीवादी राष्ट्र इ. शेवटी लोकशाही राष्ट्राची संकल्पना मान्य करण्यात येऊन तिला संविधानामध्ये मुर्तरूप देण्यात आले. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात मोठे योगदान होते हे कोणीही मान्य केल्याशिवाय राहणार नाही. असे असले तरी आज पुन्हा नव्याने स्वातंत्र्याच्य पंचाहत्तर वर्षानंतरदेखील ‘हिन्दू राष्ट्र’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ‘बहुजन राष्ट्र’ ही संकल्पना काही बहुजन विचारवंत मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांची राष्ट्र कल्पना कोणती ? याचा विचार करणे आवश्यक आहे. तर बाबासाहेबांची राष्ट्र कल्पना आहे प्रबुद्ध भारताची. प्रबुद्ध राष्ट्राची. बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला तो जातीविहीन आणि नीतीमान समाजाच्या निर्मितीसाठी. आणि अशा जातीविहीन समाजाचे सूत्र त्यांना गवसले ते मात्र बुद्धाच्या धम्मामधून. कारण बुद्धाचा धम्म हा प्रतिक्रियेतून उगम पावला नसून तो प्रबुद्ध मनाच्या सृजकतेमधून उगम पावला आहे. बाबासाहेबांचे धर्मांतर सुद्धा प्रतिक्रियात्मक नसून ती बोधिसत्त्वाची सृजकता आहे. म्हणूनच त्यांना नवा जन्म झाल्याचा आनंद व्यक्त करता आला.

लोकशाही समाजाचे वैशिष्ट्य हे की, तो समाज जातीविहीन असतो. अशा जातीविहीन लोकशाही समाजामध्येच व्यक्ती हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो, त्याला समतेची वागणूक मिळत असते व त्याला बंधुत्वाचे आचरण करण्याची मोकळीक असते. याचा अर्थ असा की जातीविहीन समाज निर्माण करण्यासाठी जातीविहीन मन निर्माण झाले पाहिजे. जातीविहीन मनाच्या व्यक्तीमुळे जातीविहीन समाज व जातीविहीन समाजामुळेच जातीविहीन राष्ट्राची उभारणी करणे शक्य होत असते. त्यामुळेच लोकशाही टिकाव धरू शकते. असा हा दीर्घ प्रवास आहे. बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताचे हेच चित्र होते. त्यांच्या प्रबुद्ध राष्ट्राचे हेच स्वप्न होते. म्हणूनच धर्मांतरानंतर ते म्हणाले होते, मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचा आहे” ते या अर्थाने.

येथे खरा प्रश्न निर्माण होतो की, जातीविहीन व्यक्ती, प्रबुद्ध व्यक्ती तयार करण्यासाठी आपले काय प्रयत्न सुरू आहेत ? या प्रश्नाचे निश्चितच सकारात्मक उत्तर असे की त्रिरत्न बौद्ध महासंघ या दिशेने गेल्या पंचेचाळीस वर्षापासून प्रयत्नरत आहे. हे धम्म प्रसाराच्या अनेक माध्यमांपैकी एक प्रमुख व प्रभावी माध्यम आहे. जसे कुशल धर्माच्या आचरणाने अकुशल धर्म लोप पावतो, तसेच बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या धम्मक्रांतीच्या तत्त्वामुळे अकुशल अशी जात कल्पना मनातून नष्ट होऊ शकते व व्यक्ती प्रबुद्ध बनू शकतो. जात ही मनाची निर्मिती असल्यामुळे तिला नष्ट करण्यासाठी मनाला प्रशिक्षित करण्याची सुद्धा गरज आहे. धम्म प्रशिक्षणशिबिराच्या माध्यमातून असे प्रशिक्षण देण्याचे कार्य गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अव्याहतपणे सुरू असल्याचे आपल्या निदर्शनात येते.
अनेक प्रशिक्षणाच्या शिबीर केन्द्रात नेमकी काय व्यवस्था असते… तेथे कोणते प्रशिक्षण दिले जाते… जातीविहीन समाजासाठी कोणते प्रयत्न केले जातात. प्रबुद्ध भारताच्या दिशेने आपली वाटचाल कशी सुरू आहे… काया वाचा व मनाची त्रिविध शुद्धता करण्यासाठी,सम्यक संघटित ध्येय प्राप्तीची चळवळ करण्यासाठी ध्यानासारखे माध्यम कसे उपयोगाचे आहे.आणि यातून आपण आपल्या आदर्श महामानव यांनी केलेल्या लोककल्याणकारी चळवळीचा योग्य अभ्यास करून आपला आध्यात्मिक सामाजिक आर्थिक सर्वांगीण विकास कसा करू शकतो, स्वतः सह नवसृजनशील समाज बांधवांची सामूहिक बांधणी करता येणं या सर्व बाबी सर्वसामान्य जणास कळाव्यात, आणि त्यांना सुद्धा या प्रशिक्षण प्रकल्पात सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी, वाचकांत अधिक उत्सुकता निर्माण व्हावी, मनाला प्रशिक्षित करणं म्हणजे काय असावे? असाही मूलभूत प्रश्न विचारला जावा, प्रत्येकाची किमान ज्याची त्याचे स्वतःशीतरी अंतर्मनात चर्चा व्हावी याकरिता हे लिहिले आहे.

व्यक्ती मिळून समाज बनतो व समाजामुळे राष्ट्र बनते. म्हणून सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी व्यक्तीमध्ये बदल घडणे आवश्यक आहे. अशा बदललेल्या व्यक्तींच्या समाजालाच बाबासाहेबांनी नवसमाज म्हटले आहे. अशा नवसमाजामधूनच प्रबुद्ध साकार होणार आहे. ‘मी भारत बौद्धमय करीन’ या बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेचे मर्म तेव्हाच आपणाला कळून येईल.

धम्मजीवन समृद्धीविषयक प्रशिक्षण शिबिरे कोणतीही संस्था आयोजित करत असतील ती सर्वच प्रशिक्षणे सृजनशील समाजएकसंघ करणारे उद्देशाचेच असतात. त्यातून आपले मन प्रशिक्षित केले जाते, प्रत्येकाने एक खरा व्यक्ती बनून एकत्रित येऊन नवसमाज बळकटीकरणाचा हा जवळचा आणि सोपा राजमार्ग पत्करणे आवश्यक ठरते.अशा धम्म चळवळीच सम्यक परिवर्तन घडवून आणू शकतात तसेच धम्म शिबिराच्या माध्यमातूनच प्रशिक्षित असा प्रबुद्ध मन घडलेला व्यक्ती देश समूहास मिळू शकतो.

दीपक भालेराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रखर अनुयायी असून डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलेल्या दम्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास आणि विश्वास आहे. धम्म संस्कारांत रक्षित चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो. माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे जिल्हा परीषद शाळेत सहशिक्षक आहेत. दिपक भालेराव यांचा संपर्क क्र. ९४२३७४४६८४ आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker