दमदार… दिलदार… मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


पत्रकार आणि राजकारणी यांचे अनेक वर्षे चांगले संबंध राहतातच असे नाही असे अलिकडे बोलले जाते. पण खरी मैत्री जेथे निर्माण होते तेथील संबंध दिर्घकाळ टिकून रहातात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. राजकिशोर मोदी आणि माझ्या मैत्रीच्या बाबतीत असेच कांहीसे कांही.
राजकिशोर मोदी आणि माझी मैत्री आमच्या आयुष्याचे करीयर सुरु करण्यापासूनची! महाविद्दालयीन शिक्षण शिकत असतांना वर्गातील सीआर ते महाराष्ट्र राज्य कापूस पणण महासंघाच्या उपाध्यक्ष होईपर्यंतच्या मोदी यांच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. महाविद्दालयीन शिक्षण घेत असतांना महाविद्यालय आणि विद्दापीठ प्रतिनिधीच्या निवडणुकीपासून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात करुन नगर सेवक, नगराध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष संघटनेचे अध्यक्षपद, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद, अखुल भारतीय नगराध्यक्ष संघटनेच्या संचालक मंडळापासून ते महाराष्ट्र राज्य कापूस पणण महासंघाच्या उपाध्यक्षपदा पर्यंतचा मोदी यांचा राजकीय प्रवास थक्क करुन सोडणारा आहे.
अत्यंत अल्पसंख्यांक समाजात जन्म घेवून फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतांना स्वतः ची ओळख निर्माण करीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्वतः ची ओळख निर्माण करण्यात, विधान परीषदेच्या उमेदवारीसाठी दोन वेळा नांव चर्चेत आणण्यात मोदी यशस्वी झाले ते केवळ पक्षसाठी आजपर्यंत केलेल्या प्रमाणिक कामामुळेच!
नगर परीषदेच्या माध्यमातून मिळत गेलेल्या प्रत्येक संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न मोदी यांनी आपल्या राजकीय आयुष्यात केला. अत्यंत कमी वयात नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवून शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करतांनाच शहर विकासासोबत स्वतःची राजकीय कमान ऊंच ठेवण्यात मोदी यशस्वी झाले.
पद्मसिंह पाटलांच्या तलमीत तयार झालेल्या राजकिशोर मोदी यांनी काँग्रेस पक्षाची जुळलेली नाळ आजपर्यंत तरी कधीही तुटू दिली नाही. पक्ष निष्ठा दर्शवत अनेक राजकीय नेत्याशी अगदी निकटचे संबंध निर्माण करीत गेली वीस वर्षे अंबाजोगाई नगरपरीषदेवरील सत्ता सतत आपल्या ताब्यात ठेवण्यात मोदी आजपर्यंत यशस्वी ठरले आहेत.
सत्तासंघर्षात पराकोटीचा संघर्ष करतांना निर्माण झालेल्या मतभेदाला त्यांनी कधी ही वैयक्तिक पातळीचे स्वरुप येवू दिले नाही. राजकारण आणि मैत्री यात ही कधी गल्लत होवू दिली नाही. राजकारण फक्त निवडणुकीपुरते हे सुत्र जपत त्यांनी मैत्रीच्या नात्याला कधीही राजकारणाचा स्पर्श होवू दिला नाही. एकदा मित्र मानला की स्वतः हुन मित्रत्वाचे संबंध न तोडणारा एक दिलदार… दमदार मित्र! अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या या मित्राला वाढदिवसाच्या दमदार शुभेच्छा…!