त्रिदली माजी सैनिक पतसंस्थेचे कार्य इतर पतसंस्थांना मार्गदर्शक ठरावे; आ. नमिता मुंदडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_140244.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_140244.jpg)
अंबाजोगाई येथील माजी सैनिकांनी माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुरु केलेल्या त्रिदल माजी सैनिक पतसंस्थेचे गेले २० वर्षापासुन चे कार्य अत्यंत उत्तम पध्दतीने चालु असुन हे काम इतर पतसंस्थांना मार्गदर्शक ठरावे असे मत आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.
आंबेजोगाई येथील त्रिदल माजी सैनिक पतसंस्थेच्या २१ व्या सर्वसाधारण सभेचे येथील खंदारे मंगल कार्यालय मध्ये आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन ग्यानदेव शेप तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कर्नल बाबासाहेब लुगडे, सहकार अधिकारी पोतंगले, अंबाजोगाई न. प. चे माजी उपनगराध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप सांगळे, जेष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ, माध्यम न्युज चॅनल चे संपादक सुदर्शन रापतवार, दैनिक वार्ता चे संपादक परमेश्वर गीत्ते, आनंद लोमटे संजय गंभीरे, सेना मेडल सेवानिवृत्त मेजर नंदकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वडमारे, पतसंस्थेचे सर्व संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220918-WA0222.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220918-WA0222.jpg)
आपल्या विस्तारीत भाषणात आ. नमिता मुंदडा पुढे म्हणाल्या की, त्रिदली माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना मागील २० वर्षापुर्वी झाली असून या संस्थेचे स्थापनेपासून आत्ता पर्यंत चे काम अतिशय समाधान कारक आणि इतर पतसंस्थांनी आर्दश घ्यावा असे आहे. या पतसंस्थेच्या वृद्धीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासनही यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी दिले. यावेळी वीर माता, वीर पत्नी आणि शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवलेल्या माजी सैनिकांच्या मुलांचा भेटवस्तु देवून पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सेवा निवृत्त कर्नल बाबासाहेब लुगडे यांनी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणा-या शासकीय सवलतींची माहिती देवून या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. दिपक कटारे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना मी माजी सैनिकांचा मुलगा असल्याचा मला अभिमान असून माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या प्रकृतीकडे सातत्याने लक्ष देवून उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून कधीही आजाराकडे दुर्लक्ष करु नका ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या असे आवाहन केले. तर सहकार अधिकारी पोतंगले यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_140331.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_140331.jpg)
या कार्यक्रमात प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी या पतसंस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या प्रगतीचे आपण साक्षीदार असून कसल्याही प्रकारच्या वादात न सापडता पतसंस्थेच्या सभासदांच्या हितासाठी ही संस्था काम करते याचा आपणास सार्थ अभिमान असून या पतसंस्थेच्या उतृकर्षासाठी आपल्या सदैव सदिच्छा असतील असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपाध्यक्ष कमलाकर मलवाडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या प्रगतीचा आलेख सभासदांसमोर ठेवला. पण संस्थेचे अध्यक्ष ग्यानदेवशेप यांनी अहवाल सादर करुन सभासदांसमोर ठेवलेल्या सर्व ठरावास टाळ्यांच्या गजरात संमती मिळवली.
या कार्यक्रमात पतसंस्थेला सदैव सहकार्य करणारे सुभाष शेटे, राजाभाऊ शेप, बालासाहेब शेप, पंचायत समिती चे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर मलवाड, शेपवाडीचे ग्रामसेवक चोपडे आणि इतरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष कमलाकर मलवाड यांनी केले तर आभार ज्येष्ठ सभासद चनई येथील पोलीस पाटील शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास पतसंस्थेचे सर्व सभासद त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.