त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. शैलजा बरुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0180-300x101.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0180-300x101.jpg)
बोधी घाट परीवाराने घेतला पुढाकार!
येथील बोधिघाट परिवाराच्या वतीने अंबाजोगाईत त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व देविदास भाऊ सोनवणे लिखित प्रबोधनपर भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मान्यवरांची उपस्थिती
अंबाजोगाई शहरातील बोधिघाट परिवाराच्या वतीने मंगळवार, दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीने “बुध्दभुमी”, बोधिघाट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ढगे हे होते. तर उदघाटक म्हणून अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे आणि प्रमुख व्याख्याता म्हणून प्रा.डॉ.शैलजा बरूरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंत लोमटे, सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना आडसुळे, सुचिता सोनवणे हे मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
बाबासाहेबांचे जीवन घडविण्यात रमाईंचा मोठा वाटा; डॉ. राहुल धाकडे
प्रारंभी जयंतीनिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमला सुरूवात करण्यात आली. यावेळी उदघाटक म्हणून बोलताना अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे हे म्हणाले की, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची 125 वी जयंती आपण आज साजरी करीत आहोत, महामानव बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात माता रमाई या संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांचे जीवन घडविण्यात रमाईंचा मोठा वाटा होता. माता रमाईंनी समाजासाठी केलेला त्याग हा अनमोल आहे, त्यांनी केलेल्या त्यागाची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे कार्य, चळवळीतील योगदान हे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई कायमच संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. सद्यस्थितीत त्यांचे कार्याचा विसर नव्या पिढीने पडू देऊ नये असे प्रतिपादन डॉ.धाकडे यांनी केले. प्रमुख व्याख्याता प्रा.डॉ.शैलजाताई बरूरे यांनी सांगितले की,
माता रमाईच्या त्यागामुळे महिलांचे जीवनच बदलून गेले; प्रा.डॉ. सौ. शैलजा बरुरे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0179-300x88.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230209-WA0179-300x88.jpg)
माता रमाई यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दुःख, गरिबी सहन करून त्यावर मात केली. महामानव बाबासाहेबांपर्यंत दुःखाची झळ ही पोहचू दिली नाही. आपल्या संसारात माता रमाई या एक आदर्श पत्नी, सून आणि माता होत्या, महामानवाच्या आयुष्यातील सर्वच भूमिका या त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात. कधी साधी तक्रार नाही, की कुठे ही त्याची वाच्यता केली नाही. अथांग दुःखाचे कधी ही भांडवल केले नाही. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण माता रमाईत होते. रमाईंनी बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग घेत मोठ्या प्रमाणात महिलांना या चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले. संघटित केले. रमाईंच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच पार बदलून गेले आहे. अशा आदर्श, त्यागमयी रमाईंच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून दरवर्षी त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होण्याकरिता आपण सर्वांनी मिळून पुढाकार घ्यावा असे आवाहन व्याख्याता प्रा.डॉ.बरूरे यांनी उपस्थित जनतेला केले.
जयंतीनिमित्त दरवर्षी करणार विविध कार्यक्रमांचे आयोजन; भगवान ढगे
अध्यक्षीय समारोप करताना भगवानराव ढगे म्हणाले की, शैक्षणिक आणि पर्यायाने सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी बौद्ध धम्माची भूमिका ही कायमच महत्त्वाची राहिलेली आहे, यासाठी पुढील काळात बोधिघाट परिवारातील सर्वांना सोबत घेऊन बोधिघाट स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करून, विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच बोधिघाट परिवाराच्या वतीने धम्म उपासकांसाठी “बुद्धभूमी” येथे नुकतीच बुद्धमूर्ती बसविण्यात आली आहे. अशी माहिती भगवानराव ढगे यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी केले प्रयत्न
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अनंत कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अतुल ढगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीचे आयोजक माऊली मांदळे, राजु मोरे, महादेव पौळे, संघपाल जगताप, बाबाजी मांदळे, अतुल ढगे आणि बोधिघाट परिवार, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. तर यावेळेस सुलोचना जोगदंड, गंगाबाई पौळे, सविता ढगे, राधाबाई मांदळे, कलुबाई जगताप, वंदनाताई , अश्विनी शिंदे, श्रीशैला मोरे, जयनंदा इंगळे, सुनिता जोगदंड, लक्ष्मीबाई सोनवणे, केरूबाई शिनगारे, देवानंद जोगदंड, बाबासाहेब सरवदे, अनंत तरकसे, विलास घोलप, संतोष मस्के, दामोदर सोनवणे, बब्रुवान पौळे, योगेश मोरे, धनराज सोनवणे, संघर्ष बडे, धम्मपाल इंगळे यांच्यासह बोधिघाट परिवारातील जेष्ठ नागरिक, महिला, युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.