महाराष्ट्र

तांदुळजा येथील सरदार नाईक बावणे गढीचे मराठवाडा मुक्तीसंग्रामात योगदान

मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष : भाग २

मराठवाडा मुक्तीलढा’ हा मराठवाड्यातील जनतेच्या शौर्याची ‘गौरवगाथा’ आहे. तमाम मराठवाड्यातील जनतेच्या साहसी पराक्रमाने लढलेला हा लढा जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घ्यावा असाच आहे. हा लढा लढला गेला. म्हणूनच निजामशाहीच्या गुलामगीरीतून हैदराबाद संस्थान मुक्त झाले आणि आजचा हा अखंड हिंदुस्थान अस्तित्वात आला. या मराठवाडा मुक्ती संग्रामातील जनतेच्या शौर्याच्या अनेक सुरस कथा आजही गावागावातून ऐकावयास मिळतात. अशाच प्रकारची शौर्य गाथा आपल्याला लातूर जिल्ह्यातील तांदुळजा गावात ऐकायला मिळते.

इतिहासात तांदुळजा येथील सरदार नाईकबावणे यांची गढी प्रसिद्ध आहे. मराठवाड्यावर आलेली अनेक संकटे या गढीने झेलली आहेत. मराठ्यांच्या इतिहासात प्रसिध्द असलेली मराठे व निझामचा याच्यात इ. स. 1760 साली झालेली उदगीरची लढाई प्रत्यक्षात तांदुळजाच्या शिवारातच लढल्या गेली होती. या लढाईत निझामचा पराभव झाला होता. यानंतर झालेल्या तहाच्या वाटाघाटी सरदार नाईक बावणे यांच्या गाडीतच झाल्या होत्या. या तहानुसार निझामाने गोदावरी, तुंगभुद्रा आणि सीना या नद्याच्यामध्ये येणारा मराठी बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश मराठवाडा मराठ्यांना दिला. यानंतर या प्रदेशास मराठी भाषिकांचा वाडा म्हणून ‘मराठवाडा’ असे नाव पडले. अशाप्रकारे मराठवाड्याचा जन्म ज्या गठीत झाला तीच सरदार नाईक बावणे यांची इतिहास प्रसिद्ध तांदुळजा येथील गढी होय.


तांदुळाच्या या गढीच्या माध्यमातून सरदार नाईक बावणे यांनी निजामशाहीच्या स्थापाने पासूनच निजामशाही प्रदेशात राहून निजामशहाला निकराचा लढा दिला. ज्यावेळी अनेक मराठा सरदार केवळ वतनासाठी जुलमी निजामाची हुजुरी करीत होते. त्यावेळी सरदार नाईक बावणे हे मात्र नेहमीसाठी छत्रपतींशी एकनिष्ठ राहिले. म्हणूनच छत्रपतींनी निजामशाही प्रदेशातील बफर स्टेट म्हणून महत्वाची असलेली तांदुळजा व गिरवली येथील जहागीर आपले विश्वसनीय सरदार नाईक बावणे यांना दिली असावी. यावरुन निजामशाही प्रदेशात स्थित सरदार नाईक बावणे यांच्या अनेक पिढ्यांनी मराठवाड्याला निजामशाही पासून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय चळवळ देशव्यापी स्वरूप धारण करत होती. त्याचवेळी हैदराबाद संस्थानातील जनता निजाम राजवटी विरोधात स्वतंत्र्य प्राप्तीसाठी विविध संघटना, चाळवळी, मोर्चे, उठाव व सत्याग्रह यांच्या माध्यमातून निजाम राजवटीस जमेल त्या मार्गाने प्रखर विरोध करीत होते. त्यामध्ये तांदुळजा येथील सरदार नाईक बावणे व त्यांचे सहकारी मागे कसे राहणार. सरदार नाईक बावणे तसेच तांदुळजा व परिसरातील त्यांच्या सहकार्यांमध्ये शौर्य व राष्ट्रप्रेम अनुवंशीकपनाणे सहज चालत आले आहे. इतिहास पाहता तांदूळज्यातील अठरा पगळ जातीतील लोकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता स्वराज्याच्या कार्यात नेहमीच आपले योगदान दिले आहे. त्याचाच परिणाम म्हणून सरदार नाईक बावणे यांच्या नेतृत्वात तांदुळजाच्या गढीच्या आश्रयाने मराठवाड्याच्या स्वतंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलन करण्यात आले. 15 ऑगस्ट 19147 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर कासीम रझवी याच्या रझाकार संघटनेचे कार्य लातूर परिसरामध्ये शिखरावर पोहोंच … कार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील हिंदू प्रजाजनांवर खुप अन्याय अत्याचार सुरु केले होते. तांदुळजा येथील सरदार नाईक बावणे यांच्या गढ़ीवर सुध्दा राझाकारांचे सतत लक्ष असे. कारण या काळात किल्ले आणि गड्या हेच क्रांतीकारकांची आश्रयस्थाने होती. या गढ़ीमध्ये आपल्याला शस्त्रसाठा, दारुगोळा उपलब्ध होईल या हेतूने या गावावर रझाकारांची नेहमी वक्र दृष्टी होती. हा शस्त्रसाठा मिळवण्यासाठी रझाकारांचे या गढीवर अनेकदा हल्ले पण झाले, ते सर्व हल्ले तांदुळज्याच्या जनतेने शौर्याने व धैर्याने परतून लावले. परंतु रझाकाराचा त्रास दिवसेंदिवस वाढतच राहिला. लातूर रझाकार संघटनेचे मुख्य केंद्र होते. त्यामुळे तांदुळज्या सारख्या छोट्या गावा स्वतंत्र आंदोलनाचे कार्य करणे खूप कठीण काम होते.

तरी स्वातंत्र्य सेनानी आण्णासाहेब बावणे यांनी कळंब तालुक्यातील ईट येथील संभाजीराव देशमुख यांच्या सहकार्याने रझाकारांशी संघर्ष सुरु केला. याचवेळी रझाकारांनी संभाजीराव देशमुख यांचे घरदार, धनधान्य लुटून नेले होते. तसेच ईट गावातील रघुनाथ किसन टेके यांचे आई व वडील यांचा रझाकारांनी गोळ्या घालून खून केला होता. या घटनेमुळे श्री. टेके रझाकारांच्या विरोधात प्रखरपणे कार्य करत होते
आबासाहेब बावणे यांनी श्री. टेके यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोलीकॅम्पमध्ये आश्रय घेवून स्वातंत्र्यसंग्रामाच्या कार्यास सुरुवात केली. कॅम्पमध्ये ठरल्याप्रमाणे सरकारीधान्य गोदामे, करोडगीरी नाके इ. लुटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. अशाचप्रकारची मोहिम त्यांना तांदुळजा परिसरामध्ये घडवून आणायची होती. त्यासाठी शस्त्रास्त्राची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ते शस्त्रास्त्रे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार श्री टेके यानी श्री. अण्णासाहेब यांना काही हातबॉम्ब दिले. ते हातबॉम्ब घेऊन अण्णासाहेब येडसी वरुन लातूरला रेल्वेने जाण्यासाठी निघाले. लातूर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर अण्णासाहेबांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून लातूर स्टेशनमध्ये बंद केले. पण अण्णासाहेबांनी शिताफीने आपल्या जवळ असलेली बॉम्बची पिशवी “ह्या खाण्याच्या दशम्या आहेत, असे पोलिसांना सांगून आपला सहप्रवासी बन्सीलाल जैन याच्याजवळ पिशवी देऊन त्याला तिथून पुढे पाठून दिले. त्याचवेळी तांदुळजाचा रहिवाशी असलेला बाबु पठाण हा राझाकाराचा कार्यकर्ता तेथे आला. त्याने अण्णासाहेबांना पाहिल्यानंतर त्याच्या ओळखीने अण्णासाहेबाची सुटका झाली. काही काळ भितीग्रस्त अवस्थेमध्ये काढून अण्णासाहेब तांदुळजाला परत आले.

इ.स. 1948 मध्ये तांदुळजा, सारसा व देवळा या गावच्या लोकांवर रझाकारांनी अत्याचार सुरु केला. तेव्हा तांदुळजाच्या सरदार नाईक बावणे यांच्या गढीतून लोकांनी रझाकारांशी अनेक वेळा लढा दिला. तांदुळाची गढी लढवून लोकांना संरक्षण देणारे प्रमुख व्यक्ती जगजीवन उर्फ युवराव नाईक बावणे, बापूराव बंडेराव शिंदे वगैरे मंडळी होती. याच शूरवीरांनी 40 रझाकारी पठाणांना मांजरा नदीत जलसमाधी दिली. बन्सीलाल मारवाडी व याच्या मुलाचा वध करून त्यांच्या घ सोने, नाणे लूट घेवून पठाण पानगावला निघाले होते.
त्याचवेळी मांजरा नदीला पूर आलेला होता. मांजरा नदी कशी पार करायची हा प्रश्न त्यांना पडला होता. पुरामुळे त्यावेळी लोक काढाईतून नदीवरुन जाणे येणे करीत असत. त्यावेळी नदीकिनारी फक्त दोन काढाई होत्या. त्यामुळे 40 पठाण व त्यांचे सोने नाणे व त्यांची शस्त्रास्त्रे या दोन काढाईतून जाणार नव्हते. त्यावेळी तांदुळजा, नायगांव, सारसा व देवळा या गावच्या लोकांनी पठाणांना एक योजना सांगितली कि, एका काढाईत सर्व हत्यारे व लुटीचा माल ठेवायचा व दुसऱ्या काढाईतून दहा दहा पठाणांनी नदीपार करायची. त्याप्रमाणे सर्व हत्यारे एका काढाईत टाकून दुसऱ्या काढाईतून पठाण पूर आलेल्या मांजरा नदीतून निघाले. ही संधी साधून लोकांनी निःशस्त्र झालेल्या पठाणांनवर हल्ला केला. आणि त्यांच्याच लुंगीने एकेकाचे हात पाय घट्ट आवळून सर्व पठाणांना मांजरा नदीत फेकून दिले. अशाप्रकारे कोणत्याही हत्याराशिवाय या देशभक्तांनी गनिमी काव्याने पठाणांचा प्रतिकार केला.
भारतीय फौजा हैद्राबाद राज्य मुक्त करण्यासाठी येत आहेतअशा बातम्या कानावर येऊ लागल्या. असे सैन्य आले तर त्यामध्ये आपणही सामील व्हावे, या दृष्टीने अण्णासाहेब यांनी तांदुळजा येथे तरुणांची संघटना निर्माण केली होती. तसेच भारतीय फौजा हैद्राबाद राज्याच्या सरहद्दीवर आल्याची बातमी मिळाली. त्यामुळे रझाकाराचे व मुसलमानी जनतेचे लोंढेच्या लोंढे सायगांव व मोमिनाबाद (अंबाजोगाई) येथे जाण्यास सुरुवात झाली. पळून जाण्यापेक्षा तांदुळजा येथील मजबूत अशी गढी ताब्यात घेवून, तेथूनच भारतीय सैन्याशी मुकाबला करावा अशी एक योजना रझाकारांनी आखली. ही बातमी तांदुळजाला समजताच परिसरातील पिंपळगाव, भोसे, मुरुड, गादवड या गावातील सर्व तरुण तरुण मंडळी तांदूळजा येथे एकत्र आली. याचवेळी अंबाजोगाईला पळून जात असलेले रझाकार लूटमार करीत आहेत अशी बातमी मिळाली. स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब बावणे यांच्या नेतृत्वात तांदूळजाला जमा झालेली सर्व तरुण मंडळी राझाकारांचा पाठलाग करीत राडी येथे पोहचली. या देशभक्त तरुणांनी बंदुका, तलवारी तसेच हाती पडेल ती हत्यारी घेवून, रजाकाराच्या टोळीचा मुकाबला झाला, ज्यामध्ये तांदूळजाच्या गढीवर उपलब्ध असलेल्या तोफेचा पण उपयोग झाला. रझाकार जीव वाचवण्याकरीता सैरावैरा पळून गेले. अशाप्रकारे तांदूळज्याच्या या तरुण देशभक्त विरांचा येथे विजय झाला. हा विजय प्राप्त झाल्याच्या आनंदात रस्त्यात असलेल्या गावातील जनतेने दुध व चहापाणी देऊन त्या शुर विरांचा सत्कार केला. हे सर्वजण विजयानंदामध्ये तांदुळजा येथे पोहोचले असतांनाच जवळ असलेल्या या गावात 100 ते 150 रझाकार परत तांदुळज्याच्या गढीचा कब्जा घेण्याच्या हेतुने जमले आहेत. अशी बातमी तांदुळजा येथे जमलेल्या या तरुण मंडळीस समजली. अण्णासाहेब यांच्या नेतृत्वाखालील ही सर्व मंडळी रझाकारांना पकडण्याकरीता रांजणी
येथे हि घटना घडत असतांनाच हैद्राबादचा निझाम सरदारवल्लभभाई पटेल यांना शरण आला आहे. तसेच हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले आहे. असे घोषीत करण्यात आले. ही बातमी मिळताच दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी तांदुळजाच्या गढीवर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सर्व कर्तबगारीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र सेनानी अण्णासाहेब नाईक बावणे यांना 25.11.1992 रोजी स्वातंत्र्यसैनिकाचे प्रमाणपत्र देवून स्वतंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव केला आहे.

लेखक :

प्रा. डॉ. अनंत मरकाळे, इतिहास विभाग प्रमुख,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker