नांदेड येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. अरुण मन्नीकर, स्त्री रैग तज्ञ डॉ. श्रीधर आलुरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच पुणे येथील मनिष निक्ते यांच्या संयोजना खाली व्हिएतनाम मधील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या वर्षा वनामध्ये आठ दिवस पक्षी निरीक्षण व छायाचित्रण केले. डॉ. अरुण मन्नीकर यांनी केलेले पक्षी छायाचित्रण सध्या चर्चेत आले आहे. त्याचा घेतलेला हा धांडोळा…
६० ते ७० फूट उंचीची झाडे असणाऱ्या दक्षिण व मध्य व्हिएतनाम मधील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या घनदाट वर्षांवनामध्ये आठ दिवसाच्या पक्षी निरीक्षण व भ्रमंती करण्यासाठी मराठवाड्यातील काही पक्षीप्रेमी व हौशी छायाचित्रकार गेले होते. पुणे येथील मनीष निक्ते यांच्या संयोजनाखाली नांदेड येथील सुप्रसिद्ध हृदयरोग शल्यचिकित्सक व छायाचित्रणाचा छंद जोपासणारे डॉ. अरुण मान्नीकर , नांदेड मधील हौशी छायाचित्रकार तथा प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीधर आलुरकर, छत्रपती संभाजीनगर येथील नमिता अत्रे, रत्नागिरी येथील तेजा मुळ्ये (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचा यामध्ये समावेश होता. हो ची मिन्ह शहराजवळ असणाऱ्या मा दा जंगल येथे इंडोचायनीज ग्रीन मॅग्पी, बार-बेलिड पिट्टा, ब्लू-रम्पड पिट्टा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात.
तसेच व्हिएतनामच्या सर्वात मोठ्या वर्षावनांपैकी एक वर्षांवन असणाऱ्या कॅट- टिएन राष्ट्रीय उद्यानात बार-बेलिड पिट्टा, ब्लू-रम्पड पिट्टा, ग्रीन पीफॉव्ल, ब्लॅक-शॅंक्ड डोक लंगूर, यलो-चीक गिब्बन पक्षी दा- लाट पठार या ठिकाणी व्हिएतनामी कटिया, लांगबियन सनबर्ड,कॉलर्ड लाफिंगथ्रश, रस्टि-नॅप्ड पिट्टा, डिओ नुई सॅन (दी लिन्ह). या जंगलामध्ये ब्लू पिट्टा, इंडोचायनीज ग्रीन मॅग्पी, ब्लॅक-हेडेड पॅरटबिल, सिल्व्हर-ब्रेस्टेड ब्रॉडबिल, व्हिएतनामी कटिया, बार-बेलिड पिट्टा, ब्लू पिट्टा, गेरमेनचा पीकॉक-फेसंट, सिल्व्हर-ब्रेस्टेड ब्रॉडबिल हे दुर्मिळ पक्षी मोठ्या प्रमाणावर छायाचित्रण करण्यासाठी उपलब्ध होतात.
परंतु या ठिकाणी जंगलामध्ये प्रकाश अत्यंत कमी असल्यामुळे पक्षांचे छायाचित्र टिपणे अत्यंत जिकिरीचे व कौशल्याचे काम असल्याचे हौशी छायाचित्रकार डॉ. अरुण मान्नीकर यांनी सांगितले. भारतीय पर्यटकांना या ठिकाणच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. ही जंगलभ्रमंती पक्षी निरीक्षण व हौशी छायाचित्रणासाठी योग्य असून, स्थानिक व दुर्मिळ पक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सतत पाऊस पडतो, परंतु हिवाळ्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस उघडतो व वातावरण कोरडे असल्यामुळे दुर्मिळ पशुपक्षांची छायाचित्रे टिपण्यासाठी जगभरातील छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. या ठिकाणी जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी दोनशे ते पाचशे मीटर डोंगरावर चढाई करावी लागते या ठिकाणी दुपारी तीन वाजता गडद अंधार पडतो.
काही ठिकाणी पर्यटकांना चहा, कॉफी व अन्न उपलब्ध होत नाही. जे अन्न उपलब्ध होते त्याला अजिबात चव( मीठ, मसाले व तिखट नसल्यामुळे) भारतीय पर्यटकांचा पोटमारा होतो. या ठिकाणी भारतीय पर्यटकांना केवळ ब्रेड, आम्लेट खाऊन पोट भरावे लागते. परंतु या ठिकाणी पर्यावरण अतिशय शुद्ध असून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण या ठिकाणी नसते. व्हिएतनाम मधील मोठ्या शहरातील पर्यटनस्थळी पाणी उकळून तयार करण्यात येणारे पोहे, उपमा, मिसळपाव, पावभाजी यासारखे इन्स्टंट पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध होतात. या देशातील रस्ते खूप छान व खड्डेरहीत आहेत. या देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न भात व बीफ आहे. त्या ठिकाणी गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त करता येत नाही. या ठिकाणी ट्रॅफिक नियंत्रीत करण्यासाठी रस्त्यावर पोलीस नसतात. या देशाचे नागरिक स्वयंशिस्त पाळतात. या देशाचे नागरिक अतिशय सहकार्याची भावना पर्यटकांबरोबर ठेवतात. भारतातील पर्यटकांच्या मदतीसाठी या ठिकाणचे गाईड व जंगल सफरी करण्यासाठी मिळणाऱ्या गाड्यांचे चालक तत्पर असतात. मैत्रीची भावना ठेवतात. क्विन -ली व ट्रॅम या दोघांनी या आठ दिवसाच्या भ्रमंतीसाठी या ग्रुपला गाईड म्हणून मदत केली.
या वर्षांवनातील दुर्मिळ पक्षांचे छायाचित्र मिळविण्यासाठी तासनतास बसावे लागते. या देशातील उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी ठेवण्यात येणारे स्टूल अत्यंत कमी उंचीचे असतात. त्यामुळे भारतीय छायाचित्रकारांना या ठिकाणी डोंगर उतारावर बसण्यासाठी अत्यंत काळजी घ्यावी लागते व पाय आखडून थंडीमध्ये बसावे लागते. पक्षी छायाचित्र टिपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या थ्रिलिंगचा अनुभव घेणे ही एक वेगळीच अनुभूती असल्याचे डॉ. मान्नीकर यांनी सांगितले. यासाठी मात्र पर्यटकांना सहनशीलता ठेवावी लागते. पाच ते सहा तास एकाच ठिकाणी बसून राहावे लागते.जंगलातले पिट्टा, मॅग्पी आणि सनबर्ड यांचं छायाचित्र टिपण्यासाठी डॉ. मान्नीकर आणि त्यांचे सहकारी जेव्हा कॅमेऱ्यात डोकावत होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्या थकव्यावर मात करत होता. निसर्गाशी जोडलेला हा ऋणानुबंध त्यांना कायमच प्रेरणा देत राहील.
“झाडांच्या गाठीशी बांधून ठेवलेलं स्वप्न पाहिलं,
त्या पक्षांच्या पंखांत लपलेलं गाणं टिपलं…”
व्हिएतनामच्या जंगलांचं वर्णन करताना हे शब्द नक्की आठवतात. डॉ. मान्नीकर आणि त्यांचा ग्रुप निसर्गप्रेमींसाठी नांदेडकरांसाठी एक प्रेरणास्त्रोत व मार्गदर्शक ठरणारा आहे.शहरातील हौशी निसर्ग व जंगलातील पक्षीचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांसाठी डॉ. अरुण मान्नीकर ‘आयकॉन ‘ ठरले आहेत. त्यांच्या या कामांमध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी तथा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ माधुरी, त्यांचे कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य मिळते.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.