जोगाई सभामंडप लेणी साठी २कोटी ४९ लक्ष रुपयांची तरतूद


राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढले आदेश
अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक भावनांशी जोडल्या गेलेल्या जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने २कोटी ४९ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या संदर्भात शासन निर्णय क्र. स्मारक-२०२४/प्र.क्र.२४/सां.का.३ दि. ५ फेब्रुवारी २०२४ अन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत. या शासन निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, मराठवाडा प्रलंबित विकास कामाबाबत राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे दि.१६.०९.२०२३ रोजी पार पडली होती.


त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये मराठवाडा विभागातील ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन करण्याचा समावेश करण्यात आला असून विशेषतः अंबाजोगाई येथील प्राचीन वास्तुस्थळाचा विकास करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंबाजोगाई येथील जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरस्ती कामाचे परिचय आर्किटेक्टस्, अंबाजोगाई यांनी तयार केलेले सविस्तर अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरीता संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी सादर केले आहे. त्यानुसार जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


सदरील प्रस्तावानुसार जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अंबाजोगाई, जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या रु.२,४९,८४,४६५/- (अक्षरी रुपये दोन कोटी एकोणपन्नास लक्ष चौन्याऐंशी हजार चारशे पासष्ट मात्र) (वस्तु व सेवाकरासह) या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
सदर निधी मागणी क्र. झेडडी-०२, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, २२०५ कला व संस्कृती (००) १०३, पुरातत्वशास्त्र, (०१) (०६) राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले व धार्मिक स्थळे यांची जपणूक संरक्षण (कार्यक्रम) (२२०५ १३०२) २७ लहान बांधकामे या लेखाशिर्षातील त्या त्या आर्थिक वर्षातील मंजूर अनुदानातून उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा,
संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यासक्रमांक: स्मारक-२०२४/प्र.क्र.२४/सां.का.3 संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच सदर काम हे पुरातत्वीय निकषानुसार/मानकानुसार पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय व संबंधित संवर्धन वास्तुविशारद यांची राहील. असे या आदेशात म्हटले आहे.
सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निगर्मित करण्यात आला असून या आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचीव नंदा मारोती राऊत यांची स्वाक्षरी आहे.


आ.नमिता मुंदडा यांचे विशेष प्रयत्न
सदरील निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आ. नमिता मुंदडा या स्वतः एक आर्किटेक्ट असून केज विधानसभा मतदारसंघातील पुरातत्व काळातील वास्तु आणि मंदिरे जतन करून त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. याच माध्यमातून त्यांनी जोगाई सभामंडप दुरुस्ती साठी विशेष निधी मिळवून देण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सतत पाठपुरावा केला होता.
जोगाई सभामंडप लेणी चे धार्मिक महत्व!
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या हत्तीखाना लेण्यांमधील जोगाई सभामंडपाला विशेष महत्त्व आहे. या विभागाची ग्रामदेवता आणि कोकणस्थांची कुलदेवता माता योगेश्वरी आणि परळी वैजनाथ येथील पाचवे जोर्तिलिंग प्रभु वैद्यनाथ यांचा विवाह याच सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. सदरील विवाहाच्या प्रसंगाचा उल्लेख माता योगेश्वरी यांच्या पुरातन काळातील अनेक संदर्भीय ग्रंथात आहे. सदरील विवाह मोडल्यानंतर याच सभामंडपात शेजारी असलेल्या गुहेतुन प्रभु वैद्यनाथ परळी कडे रवाना झाले व परळीत त्यांनी आपले अधिष्ठान निर्माण केल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांत आहे.