जुन्या पिढीतील औषधी विक्रेते राजमलजी मुथा यांचे निधन


अंबाजोगाई शहरातील जुन्या पिढीतील प्रख्यात औषधी विक्रीचे केंद्र असलेल्या राज मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स चे चालक राजमलजी मुथा यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाच्या आजाराने आज १७ जून पहाटे सात वाजता निधन झाले.
अंबाजोगाई शहरातील व्यवसायात औषधी विक्री व्यवसायाची नवी पाऊलवाट सुरु करणा-या मोजक्या लोकांपैकी राजमलजी मुथा एक होते. शहरात शासकीय टी.बी. रुग्णालयाची ओळख संपुर्ण महाराष्ट्रात सांगितली जात असतांना होमिओपॅथी, ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक या तिन्ही पॅथींची दर्जैदार औषधी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणून राज मेडिकल ची ओळख निर्माण करण्यात राजमलजी यशस्वी झाले होते.
औषधी विक्री व्यवसायासोबतच जुन्या फाटक्या नोटा, जुनी बंद पडलेली नाणी, जुन्या सायकल खरेदी करण्याचे समाजपयोगी काम ही ते या व्यवसायासोबत अत्यंत प्रामाणिक पणे करीत असत.
व्यवसाय, समाजकारण आणि कुटुंब समर्थपणे सांभाळताना राजमलजी मुथा यांनी आपले संवेदनशील कविमन ही अत्यंत सशक्तपणे जोपासले होते. हिंदी आणि मराठी भाषेत अनेक दर्जेदार कविता त्यांनी लिहिलेल्या होत्या. या कवितांना स्थानिक व जिल्हा पातळीवरील अनेक दैनिकांनी प्रसिध्दी ही दिली होती. याच सोबत अनेक कविसंमेलनात हजेरी लावून आपल्या कविता त्यांनी उत्स्फूर्तपणे सादर ही केल्या होत्या.
एक संवेदनशील हळव्या मनाचे राजमलजी मुथा गेली अनेक दिवसांपासून वृध्दापकाळामुळे आपल्या घरीच आराम करीत होते. नियमित व्यायामाच्या माध्यमातून त्यांनी आपले शरीर बीपी, शुगर व इतर आजारांपासून कायम दुर ठेवले होते. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची स्मरणशक्ती आणि डोळ्यांची तीक्ष्ण नजर कायम होती.
काल १६ जून रोजी रात्री राजमलजी मुथा यांना अचानक -हदयविकाराचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान आज पहाटे सहा वाजता त्यांना पुन्हा -हदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
राजमलजी मुथा यांच्या पश्चात पत्नी, पुणे येथील प्रख्यात व्यावसायिक पुत्र दिलीप मुथा, स्नुषा श्रीमती मिना सुनील मुथा, नातु निर्मिती गिफ्ट आर्टिकल चे संचालक साहिल आणि सुमिज सुनील मुथा, तीन मुली, जावाई, नातवंडं पतवंड आदि मोठा परिवार आहे.
सायंकाळी ४ वाजता होणार अंत्यसंस्कार
राजमलजी मुथा यांच्या पार्थिवावर आज १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता राजस्थानी स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे.