जुनी पेन्शन जनतेच्या दारात का नापास झाली?
जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून सध्या राज्यातील लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांच्या संपाला कर्मचार्यांनी 100 टक्के प्रतिसाद दिला असला तरी जनतेच्या दारात मात्र या योजनेला सपशेल विरोध होताना दिसत आहे. उलट संपामुळे सामान्य नागरिकांची उरली सुरली सहानुभूती देखील कर्मचारी गमावून बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी संपाचे हत्यार फार वेळ न उगारता कामावर परत यायला हवे. संप न करता इतर मार्गाने कर्मचार्यांनी आपली मागणी पदरात पाडून घेतली तर ती अधिक सोईस्कर होईल.
मागणीवरुन कर्मचाऱ्यांमध्ये पडले दोन गट?
जुनी पेन्शनच्या मागणीवरून राज्यातील जनतेमध्ये सरळ सरळ दोन गट पडले आहेत. एक नोकरदारांचा अन् दुसरा बिना नोकरदारांचा. बिना नोकरदारांचा जो वर्ग आहे तो नोकरदार वर्गावर प्रचंड संतापलेला आहे. त्याला जुनी पेन्शन कारणीभूत आहे असे नाही. तर सरकारी नोकरदारांनी सामान्य नागरिकांना ज्या पध्दतीने वागणूक दिली ती त्याला कारणीभूत आहे. सामान्य माणूस आपलं एखादं काम घेऊन सरकारी कार्यालयात गेला की हे कर्मचारी त्या व्यक्तीच्या खिशाचं मोजमाप घ्यायला सुरुवात करतात. मग ते तलाठी असोत की महसूल विभागातील कुठलाही कर्मचारी किंवा मग पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकारी… कोणीच याला अपवाद नाही. या सरकारी कर्मचार्यांचा चेहरा बघीतला तरी असे वाटते की ह्याने कपड्यांसकट चेहर्यावर देखील कडक इस्त्री मारली की काय?
जुनी पेन्शन; सामान्य जनतेचा कडाडून विरोध
बरं हे कधीच म्हणजे कधीच वेळेत ऑफीसला येणार नाहीत. आले तरी त्यांच्या खुर्चीवर सापडणार नाहीत. सापडले तरी आज नाही उद्या या परवा या म्हणून सामान्य माणसांना विनाकारण चकरा मारायला लावणार. शनिवार, रविवार ह्यांना सुट्टी. या दोन वारा व्यतिरिक्त एखादी लाल तारीख चिटकून आली की हे सलग सुट्टीवर जाणार. त्यामुळे ह्यांना नेमकं काम किती अन् ह्यांचा पगार किती? वरतून पुन्हा पेन्शनची मागणी. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी नुसतं बघत नाही तर तिला जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती व्यक्त होते. आज तशीच संधी संपाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना मिळाली. त्यांनी कर्मचार्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीला सोशल मीडियावर कडाडून विरोध केला आहे.
कर्मचाऱ्यांनी आपली नैतिक पत निर्माण केली नाही?
मुळात या कर्मचार्यांनी आपली कुठलीही नैतिक पत गावाकडच्या सामान्य माणसांमध्ये, नातेवाईक, भाऊ, बहीणींमध्ये निर्माण केलेली नाही. ह्या कर्मचार्यांकडे पैसा आला की ह्यांनी भाऊ वाटणी केली. आई-वडील गावाकडच्या भावाच्या सांभाळी दिले. आजारी आई वडीलांना दवाखान्यासाठी पैसे द्यायचे झाले तरी ह्यांना आधी बायकोची परमिशन घ्यावी लागते. मोठ्या-छोट्या शेतकरी भावाला बी-भरणाला दोन पैसे लागत असतील तरी ह्यांनी पाच रुपये टक्क्याने वसुली करायला सुरुवात केली. गावचा सप्ताह असो की गणपतीची वर्गणी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ह्याची उपस्थिती नाही. गावाकडून आलेल्या माणसांना कधी चहापाणी विचारलं नाही. त्यामुळे कुठल्याही सामान्य नागरिकांमध्ये सरकारी कर्मचार्यांबद्दल काडीचीही सहानुभूती उरली नाही. शहरात आले अन् ह्यांचं माणूसपण हरवलं अशा पध्दतीने हे सामान्या माणसांसोबत वागू लागलेत.
गुरुजींनी दारु अन् राजकारण सोडावे
जिल्हा परिषदेचे शिक्षक असोत की खासगी शाळेतील शिक्षक त्यांचा चिरीमिरीशी फारसा संबंध येत नाही. परंतु सातव्या वेतन आयोगानुसार या शिक्षकांच्या पगारी भरमसाठ वाढल्या. त्यामुळे सरसकट नाही पण 70 ते 80 टक्के शिक्षक विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. शाळेत गुटखा, तंबाखू खाऊन मोबाईलवर बोलत शिकवणारे गुरूजी प्रत्येक शाळेत दिसत आहेत. शाळा सुटली की हे गुरूजी सरकारी तिजोरीला हातभार लावण्यासाठी कुठल्यातरी बिअर बार, हॉटेल, धाब्यावर टाईमपास करताना दिसतात.
सामान्य माणसाच्या मनात घर करायला हवे
सामान्य लोकांशी गुरूजींची गाठभेट मंदिरात, कापड दुकानावर, किराणा दुकानावर किंवा इतर ठिकाणी होण्याऐवजी ती बिअरबारच्या बाहेर, पानटपरीवर किंवा एखाद्या नेत्यांच्या घर, ऑफिसबाहेर होऊ लागली. गावच्या राजकारणात नको तेवढा हस्तक्षेप यामुळेही गुरूजींची प्रतिमा बदलत गेली. त्यामुळे आज गुरूजींचा कुठलाही प्रश्न समोर आला की लोक त्याचा संबंधी दारूशी जोडू लागले. म्हणून आता गुरूजींनी जुनी पेन्शन योजना घेण्यासाठी आधी सामान्य माणसांच्या मनात घर करायला हवे. मान्य आहे की गुरुजींना पेन्शन मिळायला हवी. परंतु त्यांना आपली मागणी वरील कुठल्याही कर्मचार्यांबरोबर न करता स्वतंत्रपणे लावून धरावी. सरकारी कार्यालयात सामान्य माणसांची झालेली पिळवणूक गुरुजींच्याच माथी जोरकसपणे बसली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सहानुभूतीने पहावे
बाकी एवढेच सांगणे आहे ज्यांना भरमसाठी पगारी आहेत त्यांनी आपल्या पगारातून भविष्यासाठीची गुंतवणूक करावी. जे कंत्राटी आहेत त्यांच्याकडे सहानुभूतीने बघायला हवे. या कंत्राटी कर्मचार्यांच्या पगारी सहा सहा महिने होत नाहीत. त्यांच्यापुढे सध्याचा प्रश्न बिकट आहे. खासगी असंघटीत क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांचं देखील भविष्य अंधःकारमय आहे. पेन्शनने प्रश्न सुटणार नसून नैतिकता बाळगून काम केल्यास बरेच प्रश्न सुटणार आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image662630851-1678982651404-280x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image662630851-1678982651404-280x300.jpg)
लेखक : बालाजी अण्णासाहेब मारगुडे
“जुनी पेन्शन जनतेच्या दारात का झाली नापास ” या लेखाचे लेखक हे बीड येथून प्रसिद्ध होणा-या “कार्यारंभ” या दैनिकाचे कार्यकारी संपादक आहेत. समाजात घडणाऱ्या घडामोडीवर आपले स्पष्ट मत नोंदवणा-या तरुण संपादकांमध्ये बालाजी मारगुडे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.