अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला आता पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अगदी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून अत्यंत कमी प्राध्यापकांच्या नियुक्त्यांवर चालत आलेले हे जगातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असावे.
दर पाच वर्षांनी येते महाविद्यालय चर्चेत !
हे वैद्यकीय महाविद्यालय सतत पाच वर्षानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून सतत चर्चेत येत असते. कधी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री केवळ तंत्रज्ञ येत नसल्यामुळे बंद पडते, तर कधी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णांचा मृत्यू घडल्या मुळे, तर कधी नातेवाईकांना आपल्या रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्याला केलेल्या मारहाणीमुळे हे वैद्यकीय महाविद्यालय सतत चर्चेत येत असते .
कोवीड महामारीत गाजला होता भ्रष्टाचार?
कोवीड सारख्या जागतिक महामारीच्या काळात तर मड्यावरच्या टाळुवरची लोणी खाण्याइतपत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या कथीत प्रकरणामुळे ही हे वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चर्चेत आले होते.
जिवंत बालकाला मृत घोषित केल्यामुळे आज पुन्हा चर्चेत!
आज हे वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा राज्यात चर्चेत येण्याचे कारण बनले आहे ते मृत्यू न झालेल्या बालकाला मृत घोषित करण्याच्या तुघलकी निर्णयामुळे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग हा सतत वर्दळीचा व भरमसाठ रुग्ण सेवा करण्याची संधी देणारा विभाग आहे. या स्त्री रोग विभागात काम करणाऱ्या डॉक्टर परिचारिका व इतर सर्वच यंत्रणेत काम करणाऱ्यांवर सतत मोठा ताण येत असतो हे सर्व श्रृत आहे.
लाखो रुपयांचा पगार; मग कर्तव्यात कसूर का?
याचा अर्थ अर्थ असा नाही की लाखो रुपयांचा पगार उचलणा-या अधिका-यांनी या विभागात बेधुंदपणे कारभार करावा. वेळोअवेळी यावे, बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासणीसाठी न बसावे, ऑपरेशन करणे ही आपली जबाबदारीच नाही म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये मध्ये केवळ ऍप्रन घालून मोबाईल बघत बसणे अथवा आपल्या खाजगी रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांची काळजी घेत बसणे. या सर्व गोष्टी गेली दहा वर्षांपासून खुलेआम राजरोस पणे करणारे सहायक प्राध्यापक हे या स्त्री रोग विभागाचे प्रमुख म्हणून काम सांभाळतात ही अत्यंत शरमेची बाब आहे.
विभाग प्रमुखांचे खाजगी रुग्णालयाशी कनेक्शन?
एवढेच नव्हे तर हे महोदय खाजगी रित्या शहरात सुरु करण्यात आलेल्या इनफल्ट्यारीटी युनिट मध्ये ही राजरोस काम करतात. या युनिट ची जाहिरात ते आपल्या खाजगी गाडीवर करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाची जबाबदारी कसल्याही प्रकारचे शासकीय कामकाज न करता अतिशय यशस्वीपणे सांभाळतात.
नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यायला हवा!
याच महाशयांच्या अधिपत्याखाली चालत असणा-या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात मृत न झालेल्या बाळाला मृत म्हणून घोषित केल्याची घटना घडली व या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. वास्तविक ही घटना घडल्यानंतर यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यमान मस्तवाल विभाग प्रमुखांनी आपल्या विभाग प्रमुख पदाचा तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता, पण अनाधिकृत पणे स्वतः च्या खाजगी रुग्णालयात व एका खाजगी इनफल्ट्यारीटी युनीट शी जोडल्या गेलेले हे महाशय आपल्या विभागात काहीही झाले नाही असा आव आणित सध्या शासकीय रुग्णालयात वावरत आहेत.
नेमकं काय घडलं ?
सखाराम घुले यांच्या मुलीला सोमवारी सायंकाळी प्रसुतीसाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागात डिलेव्हरी साठी दाखल करण्यात आले होते. याच रात्री त्यांची डिलेव्हरी झाली. मात्र डिलेव्हरी नंतर बाळाची कसलीही हालचाल होत नसल्याचे सांगत बाळ मृत झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. रात्र असल्याने सखाराम यांनी सकाळी बालकास गावाकडे नेतो असे सांगून ते गावाकडे परतले.
आजी ने पाहिले; अन् बाळ हसले!
दुसरे दिवशी बाळाचे आजोबा सकाळी बाळाला नेण्यासाठी रुग्णालयात आले. कपड्यात गुंडाळलेले बाळ एका पिशवीत टाकून त्यांनी ती पिशवी मोटार सायकल लावली व घर गाठले. बाळाला पुरण्यासाठी त्यांनी खड्डा खणण्याचे साहित्य गोळा करण्याची तयारी सुरु केली. कुदळ सापडत नाही म्हणून त्यांना थोडा वेळ लागला. एवढ्या वेळात बाळाच्या आजीने बाळाचे तोंड पहावे म्हणून त्याला गुंडाळलेल्या कपड्यातुन चेहरा बाहेर काढला तर बाळ हुकदन हसले व रडायला चालू केले.
▪️ अधिष्ठाता यांनी नियुक्त केली पाच सदस्यीय समिती
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग प्रसुती शास्त्र विभागात घडलेल्या या घटनेचे राज्य भर तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. हे लक्षात स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन करुन याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाच सदस्यीय समितीचा अहवाल अत्यंत पारदर्शक पद्धतीने समोर यावा म्हणून या समितीमध्ये स्त्री रोग व प्रसुती विभागातील एकाही सदस्यांचा समावेश करण्यात आला नाही.
▪️स्री रोग विभाग प्रमुखांकडुन मागवली माहिती
मृत न झालेल्या बाळाला मृत घोषित करणे ही हे अनैसर्गिक आहे. यामुळे हा कायदेशीर ठरु शकण्याची अथवा शासकीय कामात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा ठरु शक्यता अधिक आहे. या विभागाच्या प्रमुखाकडून या संदर्भात सविस्तर माहिती अधिष्ठाता यांनी मागितली आहे. मृत न झालेल्या बाळाला मृत म्हणून घोषित करणारा वैद्यकीय अधिकारी नेमका कोण आहे, तो कोणत्या पदावर कार्यरत आहे, सदरील बाळाला मृत घोषित करण्यापुर्वी त्याने आपल्या वरीष्ठ अधिका-याचे मत जाणून घेतले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे विभाग प्रमुखांच्या सविस्तर अहवालात मिळतील अशी अपेक्षा आहे. मुळात स्वतः वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात पुर्ण वेळ सतत कार्यरत न राहणारे हे विभाग प्रमुख आता या प्रकरणी नेमका काय अहवाल देतात याकडे लक्ष लागून आहे.
▪️ जबाबदार कोण; बालरोग तज्ञ की प्रसुती रोग तज्ञ?
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घडलेली घटना ही अत्यंत लांच्छनास्पद आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना ठरली आहे. मुळामध्ये स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात स्त्रीयांची बाळंतपण सुलभ करणे ही जबाबदारी असते. बाळ एकदा आईच्या उदरातून सुखरुप बाहेर निघाले की त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्याठिकाणी एखाद्या बाल रोग विभागातील तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या प्रकरणात बाळाला मृत घोषित करणारा डॉक्टर हा स्त्री रोग विभागाचा आहे की बाल रोग विभागाचा आहे? या ही अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर वैद्यकीय चौकशी अहवाल आल्यानंतरच मिळू शकेल.
▪️ वैद्यकीय महाविद्यालयात अनागोंदी?
मुळात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला गेली अनेक वर्षांपासून अधिकृत अधिष्ठाताच लाभलेला नाही. राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात ही स्थिती आहे. प्रभारी अधिष्ठातांवरच राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्यभार सुरु आहे. हे प्रभारी अधिष्ठाता नियुक्त करतांना शासनाने त्यांचा किमान प्रशासकीय कामाचा अनुभव आहे की नाही याची चाचपणी, खातरजमा करणे अधिष्ठाता पदाचा कार्यभार देण्याआधी करणे गरजेचे आहे. अकार्यक्षम, प्रशासनावर वचक ठेवण्याची, निर्णय घेण्याची क्षमता नसलेल्या माणसांकडे अधिष्ठाता पदाचा कार्यभार दिला की मग त्या संस्थेचे वाटोळे होण्यास वेळ लागत नाही. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्यभार ही आता असाच एका निष्क्रिय, कामचलाऊ “भर अब्दुल्ला ….. थैलीमे” या उक्तीप्रमाणे चालणा-या एका विभाग प्रमुखांकडे दिलेला असल्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड अनागोंदी माजली आहे. हे सर्व थांबवण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाला सक्षम, योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेला व कर्मचाऱ्यांवर वचक ठेवू शकणा-या अधिष्ठाता ची गरज आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.