औरंगाबाद

जायकवाडी ५०% भरले! २४ तासात १० टक्क्यांची वाढ

औरंगाबाद/ मराठवाड्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमतेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात ५० टक्के पाणी साठा जमा झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी व स्थानिक मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसाने ४ जुलै पर्यंत धरणात १,०५,१६४ (एकलाख पाच हजार एकशे चौसष्ट ) अशी विक्रमी आवक सुरू होती.

रात्री ६ वाजता धरणाचा जलसाठा ५०% पेक्षा जास्त झाला होता. गेल्या २४ तासात जलसाठ्यात १०% ने वाढ झाल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यासह विविध धरणातून होणारा विसर्ग बुधवारी घटविण्यात आल्याने गोदाकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायंकाळी दारणा ८८४६, कडवा २५९२, गंगापूर ८८८० तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ३५७५२ क्युसेक्स असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू होता. मोठ्या क्षमतेने आवक झाल्याने २४ तासात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत अडीच फूटाची वाढ झाली असून ७ टीएमसीने जलसाठ्यात वाढ झाल्याचे गणेश खराडकर यांनी सांगितले. धरणात उपयुक्त जलसाठा १०५७. ३०३ दलघमी झाला आहे.

१९७५ पासून विसर्ग…यंदाचे २२ वे वर्ष

जायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८” उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला.  १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला गोदावरीला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला. यानंतर सन २००० ते २००५ असे सलग चार वर्ष धरणातून पाणी सोडले नाही. मात्र २००५ ते २००८ या दरम्यान सलग चार वर्षे पाणी सोडावे लागले. यानंतर पुढील आठ वर्षे २००९ ते २०१६ मोठे बीकट गेले या दरम्यान अपेक्षित जलसाठा न झाल्याने पाणी जपून वापरावे लागले. पुन्हा २०१७ ला पाणी सोडावे लागले यानंतरचे २०१८ पुन्हा कोरडे गेले. यानंतर मात्र २०१९ ते २०२१ सलग तीन वर्षांपासून धरणातून विसर्ग होत आहे.

२००० नंतर धरण  भरण्याचे प्रमाण घटले…

सन २००० ते २०२१ या २२ वर्षाच्या काळात धरण ८ वेळेस भरले, दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या  १४  वर्षात  धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. २०२० ला तर धरणातून ८० टिएमसी पाणी सोडावे लागले.  यंदाची सुरवात ४७१६० क्युसेक्स क्षमतेने बुधवारी करण्यात आली आहे.

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर…

१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.  २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker