जामीन घेणार नाही; न्यायालयीन जी शिक्षा देईल ती भोगण्यास तयार!


खा. हेमंत पाटील यांनी माध्यमांना दिली माहिती
नांदेड येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी टॉयलेट स्वच्छता प्रकरणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे विरोधात ऍट्रॉसिटी कायद्या व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या बद्दल पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर खा. हेमंत पाटील यांनी या प्रकरणी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे.
या वेळी बोलताना खा. हेमंत पाटील म्हणाले की, या प्रकरणी मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगण्यास मी तयार आहे असे त्यांनी सांगितले.


या संदर्भात अधिक विस्ताराने बोलतांना खा. हेमंत पाटील पुढे म्हणाले की, मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृत्यूंच्या तांडव प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अधिष्ठाता यांच्या कार्यालयात गेलो होतो. मला बाथरुमला जावयाचे असल्यामुळे मी स्वच्छतागृह उघडून देण्यास सांगितले. बाथरुम साठी टॉयलेट उघडल्यानंतर आतील दुर्गंधी आणि अस्वच्छता पासुन मी संतापले आणि हे टॉयलेट आपण दोघे साफ करु असे सांगत मी आणि अधिष्ठाता यांनी ते टॉयलेट स्वच्छ केले. या वेळेचे व्हिडिओ क्लिप ही आहेत, ज्यामध्ये मी ही टॉयलेट स्वच्छ करताना दिसत आहे. यावेळी मी अधिष्ठाता यांना कसल्याही प्रकारची वाईट वागणूक दिली नाही, त्यांना एकरी बोललो नाही, जातीबध्दल तर अवाक्षर ही काढले नाही. मी जेवढा वेळ अधिष्ठाता यांच्या कार्यालयात होतो त्या संपुर्ण संभाषणाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे उपलब्ध आहे. यात सगळे दिसून येईल.


एखाद्या लोकप्रतिनिधीने शासकीय अधिकारी यांना भेटायला जायचे असल्यास त्याची जात विचारुन जायचे का? असा सवाल ही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. कसल्याही प्रकारची वाईट वागणूक न देता एखाद्या लोकप्रतिनिधीविरुद्ध ऍट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करणे म्हणजे ही अधिकारशाहीची दादागिरी आहे असे मत खा. हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. या प्रकरणी मी जामीन साठी अर्ज करणार नाही, न्यायालयीन लढाई लढून न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगण्यास मी तयार आहे असे ही त्यांनी सांगितले.