जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टरांचा ‘आयएमए’ने केला सन्मान
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0163-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0163-1024x576.jpg)
अंबाजोगाई येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे रुग्ण सेवा देणार्या महिला डॉक्टर भगिनींचा सन्मान आयएमए अंबाजोगाईच्या वतीने महिलादिनी करण्यात आला.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून कर्तृत्वसंपन्न महिला भगिनींचे मनोधैर्य वाढवून समर्पणाची भावना निर्माण होत असते. आयएमएचा उपक्रम हा कौतुकास्पद व अभिनंदनीय असल्याची भावना जेष्ठ महिला डॉक्टर भगिनींनी व्यक्त केली. आयएमए अंबाजोगाई ही संघटना सातत्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढीस लावून एक स्नेहाचे व आपुलकीचे नाते निर्माण करीत असते. शिवाय सामाजिक व वैद्यकिय उपक्रमांमध्ये या संघटनेचा सहभाग राहिलेला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ज्या महिला भगिनींनी गेली 40 ते 50 वर्ष वैद्यकिय सेवेसाठी समर्पित योगदान दिले आहे आणि ज्या डॉक्टर महिला भगिनी सक्रिय आहेत. त्यांचाही सन्मान करण्याची भुमिका घेण्यात आली आणि त्यानुसार त्याच दिवशी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
अंबाजोगाई शहरातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.मंदाकिनी वैद्य यांच्या निवासस्थानी जावून संपूर्ण कुटूंबियांसमवेत हद्यपूर्वक स्मृती चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. तसेच महिला फिजिशियन, लेखिका, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शुभदा लोहिया यांचाही त्यांच्या निवासस्थानी जावून सन्मान केला. तर जेष्ठ बालरोगतज्ञ डॉ.सौ.ज्योती देशपांडे यांचादेखील सन्मान करण्यात आला.
वैद्यकिय सेवेत ज्यांनी 50 वर्ष पूर्ण केले असे खेडगीकर दांम्पत्य यांचाही सन्मान यानिमित्ताने करण्यात आला. आयएमएचे जेष्ठ सदस्य तथा पहिले सर्जन डॉ.एस.यू.पाटील व त्यांच्या अर्धांगीनी डॉ.सौ.पाटील यांनी वैद्यकिय सेवेची 40 वर्ष पूर्ण करुन या गावाला व शहराला वैद्यकिय सेवा अखंडितपणे दिलेली आहे. या निमित्ताने त्यांच्या सेवेचा गौरव उपस्थितांनी केला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0164-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0164-1024x576.jpg)
अंबाजोगाईच्या गटविकास अधिकारी सौ.समृद्धी दिवाणे काळे यांचाही महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. आयएमए अंबाजोगाईने घेतलेल्या उपक्रमाचे सर्वच जेष्ठ महिला डॉक्टर व त्यांच्या कुटूंबियांनी कौतुक करत अशा उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे चीज झाल्याचे भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सौ.मंदाकिनी वैद्य बोलतानां म्हणाल्या की, ज्या काळात एवढी प्रगत साधनं आणि तंत्रज्ञान नसतानाही त्या काळात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहिला. तसेच या कामांमध्ये त्या काळात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले या बाबीलाही उजाळा देण्यात आला. डॉ.सौ.शुभदा लोहिया या सन्मानाने भारावून गेल्या आणि या उपक्रमाचे कौतुक करत आयएमएच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0162-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0162-1024x576.jpg)
बालरोगतज्ञ डॉ.सौ.ज्योती देशपांडे व त्यांचे पती डॉ.नंदकिशोर देशपांडे यांनी उपक्रमाबद्दल कौतुक करत आयएमएच्या पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0160-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0160-1024x576.jpg)
तर ज्यांनी वैद्यकिय सेवेची 50 वर्ष पूर्ण केली असे खेडगीकर दांम्पत्य यांनी 50 वर्षापूर्वी या शहरात एकाच ठिकाणी आणि एकाच जागेत आहे त्या उपलब्ध साहित्याद्वारे रुग्णसेवा केलेली आहे. 50 वर्षाच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास सांगताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. 50 वर्षापूर्वीचे अंबाजोगाई हे गाव आणि आजचे गाव यात मोठा बदल झाला आहे. तो बदल मानसिकतेचा असू शकतो किंवा एकूण गावातील व्यवस्थेचा असू शकतो.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0161-1024x576.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230311-WA0161-1024x576.jpg)
आयएमएचे जेष्ठ सदस्य व पहिले सर्जन डॉ.एस.यू पाटील व डॉ.सौ.पाटील यांनी 40 वर्षापूर्वी हे वैद्यकिय सेवेचा वेल लावला होता. आज तो आकाशाला गवसणी घालत आहे. त्या काळात रोग निदानाच्या कसल्याही सुविधा नसताना त्या काळात वैद्यकिय सेवा देवून रुग्णांना वेळेत उपचार दिल्या आहेत. डॉ.पाटील दांम्पत्याचा प्रवास हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला यावेळी डॉ.पाटील यांचे चिरंजीव डॉ.स्त्रीरोग तज्ञ डॉ.दिपक पाटील व डॉ.सौ.पुनम दिपक पाटील हे उपस्थित होते.
या सन्मानसोहळ्यासाठी आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, उपाध्यक्ष डॉ.अनिल भुतडा, सचिव डॉ.सचिन पोतदार, सहसचिव डॉ.निलेश तोष्णीवाल, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर धर्मपात्रे, आयएमए महिला संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सौ.अरुणाताई केंद्रे, उपाध्यक्षा डॉ.सौ.स्नेहल होळंबे, क्रिडा सचिव डॉ.अतुल शिंदे, सांस्कृतिक सचिव डॉ.योगेश मुळे, डॉ.हनुमंत चाफेकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित सर्व महिला डॉक्टरांच्या चेहर्यावर समाधानाची लकेर दिसत होती. या उपक्रमाचे जेष्ठ महिला डॉक्टर व त्यांच्या कुटूंबियांनी कौतुक केले.