राष्ट्रीय
“छावा”… मी अनुभवलेला!
दहावीची परीक्षा दिली तेंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांनी साहित्य निकेतन ग्रंथालयात खाते उघडून दिले आणि पुस्तकं वाचण्याची सवय लावली. तेंव्हा दोन-तीन दिवसांत एक पुस्तक वाचून व्हायचे. या काळात खुप पुस्तकं वाचून झाली. शिवाजी सावंत यांची “छावा” ही कादंबरी याच काळात माझ्या वाचनात आली. या कादंबरीत शिवाजी सावंत यांनी उतरवलेल्या संभाजी राजेंच्या भुमिकेने माझ्या मनामध्ये जे काही ममत्व निर्माण केले आणि जो काही प्रभाव टाकला त्यामध्ये आज ही काहीही तीळमात्र कमी झाले नाही.
“छावा” या कादंबरीच्या वाचनानंतर मी संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेली अनेक पुस्तकं, नाटकं मुद्दामहून वाचून काढली. संभाजी राजांचे जीवन, अवघ्या दोन वर्षांच्या वयापासून त्यांच्या वाट्याला आलेली दु:ख त्यांनी केलेला संघर्ष, स्वकीयांनी त्यांचा केलेला विश्वासघात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे यांच्या वाट्याला आलेलं दु:ख हा माझा वीक पॉइंट बनला असल्यामुळे हे सर्व वाचण्याची इच्छा माझ्या मनात त्याकाळी जागृत झाली असावी असे मला वाटते.
संभाजी राजे हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्रच नव्हते तर तर एक शुर लढवय्ये, उत्तम प्रशासक आणि स्वराज्याचा गड निधड्या छातीने राखणारे एक लढवय्ये राजे ही होते. याशिवाय संभाजे राजे एक उत्कृष्ट राजकीय कवी, लेखक आणि पाच भाषांचे उत्तम जाणकार ही होते. संभाजी राजे यांनी संस्कृत भाषेमध्ये “बुधभुषणम” हिंदुस्थानी भाषेमध्ये “नायिकाभेद”, “सातसतक”, “नखशिखा” ही ग्रंथ लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी मराठा न्याय शास्त्रावर “दंडनिती” ही लिहिली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर लक्ष्मण उतेकर यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दिग्दर्शित केलेला आणि अचानक चर्चेत आलेला “छावा” हा चित्रपट पहाण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली नसती तर नवलच!
अलिकडेच मी “छावा” हा चित्रपट पाहिला. “छावा” हा चित्रपट मुळत: शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित असल्यामुळे या कादंबरीत असलेल्या सर्व नाही तर किमान प्रमुख बारकाव्यांचा समावेश असेल अशी माझी धारणा होती. मात्र या चित्रपटात १७ व्या शतकातील १६८१ ते १६८९ या नवू वर्षाच्या कालावधीत छत्रपती संभाजीराजे यांनी दाखवलेल्या असामान्य कर्तृत्वाचेच चित्रिकरण करण्यात आले आहे. या नवू वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब आणि मुघल सत्तेसमोर अनेक आव्हाने उभे करण्याचा पराक्रम संभाजी महाराजांनी दाखवला आहे. याच कालखंडातील घटनाक्रम या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर उभा करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. या नवू वर्षातील छत्रपती संभाजी राजे यांचे असामान्य शौर्य आणि नंतरच्या काळात झालेला क्रूर छळ यांविषयीच्या वाचलेल्या कथा या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे चित्रीत करण्यात आल्या आहेत.
या चित्रपटाची मांडणी तशी सरळ आहे. दरबारातील प्रसंग वगळता लहान-मोठ्या स्वरूपांच्या लढायांचे प्रसंग एकापाठोपाठ एक दाखवले गेले असल्यामुळे हे प्रसंग हाच चित्रपटाच्या पटकथेचा ढोबळ ढाचा बनला असल्याचे तर इतर प्रसंग त्यांच्या अवतीभोवती रचलेले असल्याचे जाणवत राहते. अशा इतिहासकालीन प्रदीर्घ चित्रपटात काही गोष्टी मांडत असताना त्यात नाट्यमयता आणण्यासाठी असे करणे गरजेचे ही असू शकते. मात्र हे करीत असताना, त्या कथनाकातील व्यक्तिरेखांची चरित्रे समोर मांडत असताना इतिहासाची मोडतोड करण्यात आले असल्याचे ही जाणवते. अशा पात्रात जसा सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक इतिहास समाविष्ट असतो, तितकाच वैयक्तिक इतिहासही समाविष्ट असतो, याचा विसर दिग्दर्शकाना पडलेलो दिसतो किंवा तो जाणीवपूर्वक टाळलेला ही असू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर सरदार असतील, ते अभेद्य आहेत, हे ठासवत असतानाच त्यांच्या व्यक्तिरेखांना त्याही पलीकडे इतर काही छटा असू शकतात, याचा विसर दिग्दर्शकांना आणि चित्रपट पाहणाऱ्यांना पडलेला दिसतो. त्यामुळेच आपण जेव्हा ऐतिहासिक चित्रपट पहातो, तेव्हा आपण खऱ्या-खोट्या पद्धतीच्या पात्रांची निर्मिती आणि काही वेळा तर इतिहासाची मोडतोड करून पुनर्लेखनदेखील झालेले पाहत असतो.
छत्रपती संभाजी महाराजां सारख्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटात हिंसा पुरेपूर झिरपली नसती तर नवलच! याही चित्रपटात हिंसा पुरेपुर ठासून भरलेली आहे. इतर ऐतिहासिक चित्रपटात आपण ‘रक्ताचे पाट वाहिलेले’ पाहीले, पण इथे तर तुम्हाला अक्षरशः ‘रक्ताच्या नद्या’ वाहनांना पाहायला मिळतात!
मुघलांचे क्रौर्य थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपट पुर्णतः यशस्वी झाला आहे. मन आणि मेंदू सुन्न व्हावा अशी अनेक प्रसंग या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटात क्रोध, हिंसा, आक्रोश नि ओरडणे या बाबी अनेक महत्त्वाच्या पात्रांचे गुणधर्मच होऊन गेल्यासारखे दिसतात.
या चित्रपटात तीन महत्त्वाच्या भुमिका आहेत. यापैकी विकी कौशल्य याने छत्रपती संभाजी राजे यांची भुमिका अप्रतिमरित्या साकारली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वभावातील नेमकं गुणधर्म आणि वैशिष्ट्य विकी कौशल्य याने आपल्या अभिनयातुन अतिशय ताकदीने आणि चांगल्या पद्धतीने साकार केले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यातील शेवटचे प्रसंग तर अक्षरशः डोळ्यातुन पाणी आणणारे आणि औरंगझेब यांच्या व्यक्तीमत्वाबध्दल घृणा निर्माण करणारेच आहेत. हे संपुर्ण प्रसंग विकी कौशल्य याने अफलातुनरित्या सादर केले आहेत.
या चित्रपटात अक्षय खन्ना याने आपल्या दमदार अभिनयातुन उभा केलेला औरंगजेब ही लाजवाबच आहे. अत्यंत कमी वेळा बोललेला व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल मनात ओतप्रोत व्देष भरलेला औरंगजेब चित्रपटात दिसतो.

हा चित्रपट पहाताना औरंगजेब आपल्याला विशिष्ठ अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अक्षय खन्ना यशस्वी झाला आहे. या चित्रपटात हंबीरराव यांची भुमिका आशुतोष राणा याने दमदार पध्दतीने साकारली आहे. हिंदवी स्वराज्याचे ओतप्रोत प्रेम आणि छत्रपती घरण्याशी असलेली निष्ठा अत्यंत दमदार पद्धतीने त्यांनी आपल्या भुमिकेतून साकार केली आहे. यासोबतच कवी कलश यांची भुमिका सादर करताना विनीत कुमार सिंग
यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.