राष्ट्रीय

चिमणी उडाली भुर्रर…! इटालियन तंत्रज्ञानाचा वापर; वय अवघे ५० वर्षे!

प्रा. रविंद्र जोशी…..

काही वस्तू, काही व्यक्ती, काही इमारती, काही जागा, काही प्राणी, काही पक्षी, काही पदार्थ, काही कला, काही परंपरा, काही रस्ते, काही चौक, या त्या भागाच्या- त्या त्या गावाच्या- त्या त्या परिसराच्या प्रतिनिधिक प्रतीक बनलेल्या असतात.

परळी व परिसराचे एक ऊर्जावान प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिरानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे. परंतु परळी औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे नेमके कोणते चित्र डोळ्यासमोर येणार तर सर्वांच्याच मनामनात आणि डोळ्यात साठवलेले प्रतीक म्हणजे थर्मलच्या धूर निघणाऱ्या तीन चिमण्या. आज या तीन चिमण्यांपैकी एक चिमणी आपल्यातून भूर उडून निघून गेली.
खरंतर ही निर्जीव वस्तू परंतु प्रत्येक परळीकर आला आणि परळीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हुरहुर वाटली आणि मन काही काळासाठी का होईना विषन्न झालं प्रत्येकाची भावना आणि प्रतिक्रिया ही शोकयुक्त आणि हळवी होती यातच या निर्जीव चिमणीने प्रत्येकाशी आपले घट्ट नाते गेल्या पन्नास वर्षात कसे निर्माण केले होते याची प्रचिती येते.

इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा झाली आहे. कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन नंबरची चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे.
मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्री सुद्धा भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व परिचित चिमणी पाडण्यात आली आहे. या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा.

प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते. तशी प्रतीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.


मराठवाड्यातील एकमेव विद्युत निर्मिती करणारे हे केंद्र आहे. 1971 साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या.

मागच्या काही दिवसापासूनच कालावधी संपलेल्या संचातील साधन सामग्री बाजूला करण्याचे काम चालू आहे. यातच ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात संच क्रमांक तीनची धुरवाहक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन एप्रिल 1979 मध्ये सुरू करण्यात आला होता.

2010 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 3 चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅप मध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर सन 2019 पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक उद्योग केंद्रातील 30 मेगावॅटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच 2019 पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक तीनची 120 मिटर उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.
परळीत स्थायिक झालेली – इटालियन कुळातील सर्वांना आपली वाटणारी – “चिमणी” ऐन पन्नाशीत भुर्रऽऽऽ उडाली. परंतु यातूनही तमाम परळी व परिसरातील नागरिकांची संवेदनशील भावना या चिमनी सोबत असल्याचे क्रिया प्रतिक्रिया करून दिसून आले ही चिमणी यापुढे दिसणार नसली तरी आजपर्यंतच्या पिढ्यांसाठी हा एक मोठा आठवणीचा ठेवा असणार आहे.

येणाऱ्या नव्या पिढ्यांना ज्या ज्या वेळी परळीचा इतिहास सांगितला जाईल त्यावेळी या ठिकाणी तीन चिमण्या होत्या त्यातून धूर निघायचा अशा प्रकारच्या आठवणी सांगण्याची व थर्मल चा इतिहास नव्या पिढीला वारंवार सांगण्याची संधी मात्र आत्ताच्या पिढीला मिळणार आहे त्यामुळे आपलीशी झालेली चिमणी प्रत्यक्षात दुर ओळखताना दिसणार नसली तरी ती प्रत्येकाच्या मनात नक्कीच साठवलेली राहणार आहे.

प्रा. रविंद्र जोशी

प्रा. रविंद्र जोशी हे परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत. सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी आजपर्यंत अनेक विषय हाताळले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण करणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

4 Comments

  1. सर खुप खुप धन्यवाद! माझ्या लेखाला आपल्या लोकप्रिय माध्यमात न्याय दिला..thanks

  2. 2011 पासून 2015 पर्यंत ४ वर्ष मी २१० मेगावॅट संचाच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात सेवा केली आहे. त्यानंतर एक वर्ष कोराडी येथे 660 मेगावॅटच्या 8, 9 व 10 या संच्यासाठी 2015 ते 2016 साली सेवा दिली. नंतर 2016 ते 2017 परळीच्या नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्र. 8 ला काही काळ काम केल्यानंतर आता २५० मेगावॅटच्या संच क्र. 6 व 7 येथे कार्यरत आहे. जेव्हा संच क्रमांक 3 ची चिमणी पाडण्यात आली तेव्हा हृदयात गलबलून आले. परळीची खास ओळख असलेल्या औष्णिक विद्युत केंद्राची चिमणी (धुराडे) संच स्क्रॅपमध्ये काढल्यामुळे पाडावी लागली. दुरून कुठूनही थर्मलची चिमणी दिसली की परळीविषयी चर्चा व्हायची. आता हळूहळू एक एक चिमणी पाडण्यात येईल आणि आमचे हृदय काढून घेतल्यासारखेच होईल. ज्येष्ठ पत्रकार मा. प्रशांत जोशी सरांनी त्यांच्या ‘चिमणी उडाली भूर्र’ या लेखातून परळी विद्युत केंद्राच्या चिमणीविषयी भावनिकता दाखवली आहे; यामुळे या संचाविषयी व औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीविषयी आमचे भावनिक नाते जुळलेले आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही चिमणी पाडल्यानंतर औष्णिक विद्युत केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह परळीच्या जनतेच्या मनातही अस्वस्थता दिसून आली; हेही खरेच आहे!
    – केशव कुकडे (कवी मुक्तविहारी)

    1. प्रशांत जोशी ऐवजी रवींद्र जोशी असे वाचावे.

  3. 2011 पासून 2015 पर्यंत ४ वर्ष मी २१० मेगावॅट संचाच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात सेवा केली आहे. त्यानंतर एक वर्ष कोराडी येथे 660 मेगावॅटच्या 8, 9 व 10 या संच्यासाठी 2015 ते 2016 साली सेवा दिली. नंतर 2016 ते 2017 परळीच्या नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्र. 8 ला काही काळ काम केल्यानंतर आता २५० मेगावॅटच्या संच क्र. 6 व 7 येथे कार्यरत आहे. जेव्हा संच क्रमांक 3 ची चिमणी पाडण्यात आली तेव्हा हृदयात गलबलून आले. परळीची खास ओळख असलेल्या औष्णिक विद्युत केंद्राची चिमणी (धुराडे) संच स्क्रॅपमध्ये काढल्यामुळे पाडावी लागली. दुरून कुठूनही थर्मलची चिमणी दिसली की परळीविषयी चर्चा व्हायची. आता हळूहळू एक एक चिमणी पाडण्यात येईल आणि आमचे हृदय काढून घेतल्यासारखेच होईल. ज्येष्ठ पत्रकार मा. रवींद्र जोशी सरांनी त्यांच्या ‘चिमणी उडाली भूर्र’ या लेखातून परळी विद्युत केंद्राच्या चिमणीविषयी भावनिकता दाखवली आहे; यामुळे या संचाविषयी व औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीविषयी आमचे भावनिक नाते जुळलेले आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही चिमणी पाडल्यानंतर औष्णिक विद्युत केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह परळीच्या जनतेच्या मनातही अस्वस्थता दिसून आली; हेही खरेच आहे!
    – केशव कुकडे (कवी मुक्तविहारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker