एकामतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गंभीर गुन्हे दाखल
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
ऍड. माधव जाधव यांना परळीत मारहाण
प्रत्येक निवडणुकीत परळी मतदार संघ कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही परळी मतदार संघात राडा झाला. महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले.
बन्सीधर सिरसाठ यांच्या गाडीची तोडफोड!
परळी विधानसभा मतदारसंघातील परळी शहरातील बॅंक कॉलनी विभागातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते ऍड. माधव जाधव यांना मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घाटनांदुर येथे ना. धनंजय मुंडे यांचे समर्थक बीड जिल्हा मंजूर सहकारी संघाचे अध्यक्ष बन्सीधर सिरसाठ यांच्या गाडीची तोडफोड करुन त्यां मारहाण करण्याची घटना घडली.
पोलीस शिपाई धुमाळ यांची फिर्याद
घाटनांदूर येथील पोलीस चौकीतील पोलीस शिपाई नानासाहेब धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.20) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जि. प. प्राथमिक शाळा, जि.प. कन्या शाळा, सोमेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रात अचानक 50 ते 60 लोक एमएच 06 एझेड 4208, एमएच 14 एवाय 35 आणि एमएच 44 एस 7716 या वाहनातून घातक हत्यारे, लाकडी दंडुके घेऊन आले. ऍड. माधव जाधव यांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
पोलीस – होमगार्ड व केंद्राध्यक्ष यांना जीवे मारण्याचा फिर्यादीत उल्लेख !
पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस, होमगार्ड आणि केंद्राध्यक्ष यांना घातक हत्यारे आणि दंडुक्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी, केंद्राध्यक्ष जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी ईव्हीएम मशीन आदळून नुकसान केले.
गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद
सदर फिर्यादीवरून अक्षय कमलाकर मोरे, सुरज अशोक निंबाळकर (दोन्ही रा. मोरेवाडी), शंभूराजे संजय देशमुख (माकेगाव), यशोदीप कल्याण किर्दंत, ओम प्रवीण किर्दत, वैभव रमेश किर्दत (सर्व रा. सातेफळ), अभिजीत कल्याण देशमुख (नांदडी), सिद्धेश्वर जाधव, सुनील देशमुख, वसंत मारोती करजाळकर बलांडे, नानासाहेब पूसकर देशमुख, विशाल जाधव, गणेश जाधव, विजय जाधव, अजय जाधव, संजय अनंत जाधव, गोट्या जाधव, उमाकांत जाधव (सर्व रा. घाटनांदूर) व इतर 15 ते 20 जण असे एकूण जवळपास 40 जणांवर कलम बीएनएस 109, 118(1), 132, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 324(5), मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
एका अल्पवयीन मुलांसह सात जण ताब्यात
दरम्यान, गुन्हे दाखल होताच पोलिसांनी एका अल्पवयीन सह सात आरोपींना ताब्यात घेतले. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास एपीआय राजेंद्र घुगे करीत आहेत.अल्पवयीन मुलांसह सात जण ताब्यात घेतले आहे.
आज घाटनांदुर बंद !
दरम्यान या सर्व घटनांचे पडसाद घाटनांदुर शहरात काल पासून उमटत आहेत. काल मतदानाचे दिवशी मारहाण करण्यात आलेले ऍड. माधव जाधव हे घाटनांदुर चे रहावासी असल्यामुळे या गावात कालपासून तणाव आहे. पोलिसांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त घाटनांदुर शहरात बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आज घाटनांदुर बंद ठेवण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी विधानसभा निकाल जाहीर होईपर्यंत (२३ नोव्हेंबर) पर्यंत हा बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.