खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नातून केज मतदार संघासाठी १८ कोटींचा निधी


– बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून केज विधानसभा मतदार संघातील चार रस्त्यांसाठी जवळपास १८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी खा. मुंडे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.
मागील काही काळात केज मतदार संघातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. धूळ, खड्डेयुक्त रस्ते यामुळे विद्यार्थी, आबालवृद्ध नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे धुळीचे प्रदूषण, वाहने खिळखिळे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, अनेकदा लहानमोठे अपघात होत आहेत. आ. नमिता मुंदडा यांनी रस्त्यांची दुरावस्था खा. प्रीतमताई मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली आणि रस्तेकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मानले आभार!


खा. मुंडे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत केंद्र शासनाकडे रस्ते विकासासाठी पाठपुरावा सुरु केला. अखेर त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून केज विधानसभा मतदार संघातील चार रस्त्यांसाठी तब्बल १८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात जवळबन – लाडेगाव रस्त्यासाठी ४ कोटी २४ लाख रुपये, बनसारोळा – सौन्दना रस्त्यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये, धानोरा – तट बोरगाव रस्त्यासाठी ३ कोटी ४६ लाख रुपये आणि पाटोदा – अंजनपूर रस्त्यासाठी ४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांची रस्त्याअभावी होणारी ससेहोलपट थांबणार आहे. दरम्यान, मागणीला प्राधान्य देत प्रयत्नपूर्वक केज मतदार संघातील रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी खा. प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन या चारही रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.