Uncategorized

बारामतीच्या तरुणीवर अंबाजोगाईत सामुहिक अत्याचार; महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल


नृत्याची आवड असलेल्या मुलीला कला केंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे बारामती सह बीड जिल्हा हादरला असून, कलाकेंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक धंद्यांवर संताप व्यक्त होत आहे.
कन्हेरी (ता. बारामती) येथील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची मुलगी नृत्य आणि गायनाची आवड जोपासत होती. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादी शी संपर्क साधला. आपल्या कला केंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आ बदामबाई ने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी ने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ‘पायल कला केंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.
या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील ‘साई लॉज’वर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉज वर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करून तिचे अमानुष हाल केले. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कला केंद्र येथे आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला.
अत्याचारा नंतर पीडितेने कशीबशी आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकातील एपीआय जाधवर हे करत आहेत.

▪️अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची उदासीनता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठले होते. मात्र पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत गुन्हा नोंदवून घेतला नाही. अखेर पीडित मुलीच्या आईने बारामती पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा का दाखल करून घेतला नाही याबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button