कॉ. सुरेश धापेश्वरकर यांना श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार जाहीर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221122-WA0169.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221122-WA0169.jpg)
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेतृत्व, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक थोर विचारवंत कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कामगार चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्तिमत्वाला दिला जाणारा ‘कॉ. श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार’ यावर्षी बँक कर्मचारी चळवळीचे राष्ट्रीय नेते कॉ. सुरेश धोपेश्वरकर यांना जाहीर झाला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद या एआयबीईए या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न संघटनेतर्फे हा पुरस्कार १९९९ सालापासून संघटनेच्या प्रत्येक अधिवेशन प्रसंगी प्रदान करण्यात येतो.
संघटनेचे १३ वे अधिवेशन दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी हुतात्मा स्मृती मंदीर सोलापूर येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या दि. २६ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० वा. संपन्न होणाऱ्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशिलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
स्मृतीचिन्ह, रु.50000 ( पन्नास हजार) या स्वरूपात असणाच्या या पुरस्काराचे कॉ, धोपेश्वरकर हे नववे मानकरी आहेत. यापूर्वी हा पुरस्कार कॉ. अनंतराव नागापूरकर, आयटक चे कॉ. गंगाधर चिटणीस, गोदी कामगारांचे नेते श्री. शांती पटेल, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते श्री र. ग. कर्णिक, आयटक चे कॉ. राम रत्नाकर, थोर विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, को भालचन्द्र कानगो, सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या श्रीमती उल्का महाजन या मान्यवरांना प्रदान करण्यात आलेला आहे.
यावर्षीचे पुरस्कार मानकरी कॉ. सुरेश धोपेश्वरकर हे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकींग उद्योगातील सर्वात जुन्या व बहुमतातील संघटनेचे माजी अध्यक्ष होते. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अनेक वर्ष महासचिव होते. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटने बरोबरच एलआयसी जीआयसी, राज्य सरकारी कर्मचारी ग्रामिण बँक कर्मचारी, अशा अनेक संघटनांच्या उभारणीत वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांतील संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी संचालक नेमणूकीच्या निर्णयानूसार ते बँक ऑफ महाराष्ट्र च्या संचालक मंडळातील पहीले संचालक होते. संघटनेच्या सभासदांना वर्गीय भान देत असतानाच त्याला साहित्य- कला संस्कृती या विषयांसंबधीची जाणीव देण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सभासदांना कार्य संस्कृतीची शिकवण देण्याचे श्रेय हे निर्विवादपणे त्यांच्याकडेच जाते. स्वतःच्या हक्कासंबंधी कोणतीही तडजोड न स्विकारता संघर्षासाठीची त्यांची प्रेरणा यामुळेच महाराष्ट्रातील बँक कर्मचारी चळवळ ही ‘कार्यकर्त्यांचं मोहोळ’ होऊ शकली. आज ८१ व्या वर्षीही सतत कार्यमग्न असलेल्या कॉ, धोपेश्वरकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
सदरील पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद च्या वतीने देण्यात येत आहे असे संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.