केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी २२ पदांची निर्मिती


केज येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. गुरुवारी (दि.०२) राज्य शासनाने या संदर्भातील शासनादेश काढून निर्णयावर शिक्कामोर्तब केले. तसेच, केज सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पदासह एकूण २२ पदांच्या निर्मितीलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यानिमित्ताने केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे.
प्रलंबित खटले, प्रकरणांची संख्या वाढत गेल्याने केज येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होऊ लागली होती. केजला अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयाने देखील परवानगी दिली होती. या न्यायालायासाठीची इमारत पूर्ण होऊन मागील वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संभाजीराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, राज्य शासनाकडून या संदर्भात अधिसूचना न निघाल्याने हे काम प्रलंबित होते. गतवर्षी दिवाळीपूर्वी केज वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लाड यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या एका शिष्टमंडळाने खा. प्रीतम मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांची भेट घेऊन या प्रकरणी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
आ.नमिता मुंदडा यांनी केला पाठपुरावा


त्यानंतर आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी प्रधान सचिवांची मुंबईत भेट घेऊन सदरील न्यायालयासंदर्भात अधिसूचना काढावी अशी विनंती करून सतत पाठपुरावा सुरु ठेवला. त्यानंतर मागील महिन्यात सत्र न्यायालय संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येऊन मंजूरही झाला. त्यानंतर गुरुवारी केज येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मण्यात देण्यात आल्याचा शासनादेश निर्गमित करण्यात आला. तसेच न्यायालयासाठी २२ पदांची निर्मितीही करण्यात आली आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी मानले आभार!
दरम्यान, केजकरांच्या अनेक वर्षाच्या मागणीची पूर्तता केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

