केज मधील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार एचव्हीडीएस अंतर्गत रोहित्र जोडणी;आ.नमिता मुंदडा यांची माहिती


मार्च-२२ अखेरपर्यंत उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेंतर्गत केज मतदार संघातील कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना रोहित्र देण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच एक शेतकरी एक रोहित्र वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी शेतकऱ्यांना महावितरण संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यावर विशेष भर दिला आहे. समतोल विद्युत पुरवठा झाला तर रोहित्र जळण्याचे आणि वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होतील हे लक्षात घेऊन आ. मुंदडा यांच्या प्रयत्नातून मतदार संघात नवीन सबस्टेशन, ठिकठिकाणी मोठे रोहित्र आणि कामे वेगाने सुरु आहेत. तसेच, उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) अंतर्गत कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना जलद गतीने वीज जोडणी देण्यासाठी आ. मुंदडा यांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
त्यानुसार, मार्च-२०२० अखेर पर्यंत कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांचे एचव्हीडीएस योजनेत एक शेतकरी एक रोहित्रचे काम सुरु आहे. नुकतेच याच योजनेत मार्च-२०२२ अखेर पर्यंत कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित्र जोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्यानंतर लागलीच कामे सुरु होणार आहेत अश माहिती आ. मुंदडा यांनी दिली.
याचा फायदा कोटेशन भरलेल्या जवळपास एक हजार शेतकऱ्यांना होणार आहे. याप्रक्रीयेनंतर सदरील शेतकऱ्यांचा विद्युत भार रेकॉर्डवर येणार असून त्यानंतर ५ एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र मिळण्यास सुलभ होईल. यामुळे भविष्यात रोहित्र जाळण्याचे प्रकार कमी होऊन कृषीपंपांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.