ठळक बातम्या

कुल्फी आणि भज्जांचा अंबाजोगाई तील “ब्रॅण्ड” हरपला!

नारायण… नारायण जाधव.
नारायण कुल्फी वाला…
नारायण भजेवाला…!!
नारायण जाधव आणि माझ्या वयामध्ये जेमतेम पाच एक वर्षाचे अंतर असेल. नारायण माझ्यापेक्षा मोठा. माझी आणि नारायण ची ओळख झाली ती तो कुल्फीचा गाडा चालवायचा तेंव्हा! तब्बतीने धष्टपुष्ट असलेला नारायण कुल्फी ही तब्बतिनच बनवायचा! एकदम मस्त! संतोष डागा यांच्या किराणा दुकानाशेजारच्या गल्लीत राहणा-या नारायणाच्या कुल्फीचा गाडा तसा मोठाच असायचा! त्यांच्या तब्बयती सारखा.


बर्फाचा चुरा टाकलेल्या भल्या मोठ्या लोखंडी पेटीत लहान-मोठ्या नळ्यांमध्ये कुल्फीचे चविष्ट रहायचं टाकुन नारायण कुल्फी बनवायचा! एक पेटी २५, ५०, ७५ पैशांच्या कुल्फीची असायची तर दुसरी पेटी मग १, २, ५, १० रुपयांपर्यंतच्या महागड्या कुल्फीची असायची! तरुणपणी नारायण हा कुल्फीचा गाडा स्वतः शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन फिरवायचा! शहरातील प्रमुख भागातील प्रत्येक ठिकाणावर त्याची थांबायची वेळ ही निश्चित असायची. चविष्ट, लज्जातदार कुल्फी बनवण्याची त्यातुन ख्यासीयत होती. लोक अक्षरशः नारायणच्या कुल्फीच्या गाड्याची वाट पहात असायचे. सकाळी आठ नवू वाजता घरुन निघालेल्या नारायणाची कुल्फी दुपारनंतर संपुनही जायची! अतिशय मेहनती असणा-या नारायण ने कुल्फीचा हा व्यवसाय अनेक वर्षे केला. कुल्फीवाल नारायण ही ओळख त्याने निर्माण केली.


पुढे वय झाल्यावर नारायणने गाडा ओढण्यासाठी एक तरुण मुलगा ठेवला, तो स्वतः मात्र मग फक्त कुल्फी काढून देत व पैसे घेत असत. अडचणीच्या ठिकाणी गाडा ओढणा-या मुलास मदत करायचा, तु सरक बाजुला म्हणून गाडा काढुनही द्दायचा!
नारायण चे लग्न झाले. दोन मुल, एक मुलगी! घरचा सगळा खर्च. मुलांचे शिक्षण,कपडे खर्चाचे नियोजन कसे करणार? मग नारायण कुल्फीच्या व्यवसायासह भजे आणि वडापाव गाड्याकडे वळला! छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोस्ट ऑफिस समोरील मोकळ्या जागेत सायंकाळी चार नंतर त्या भजे आणि वडापावचा व्यवसाय सुरू व्हायचा! या ही व्यवसायात नारायण नंबर एक ठरला. गावातील सगळी तरुण पोरं सायंकाळी नारायणच्या गाड्यांवर भजी आणि वडापाव खायला यायची! शहाणी सुरती माणसं घरी भजी आणि वडापावच पार्सल आपल्या घरी न्यायची! सायंकाळी चारला सुरु केलेला गाडा रात्री दहा पर्यंत हाऊस फुल्ल!
आता नारायण हा कुल्फी आणि भजी यांचा ब्रॅण्ड बनला. अंबाजोगाई तु नाही तर शेजारील गावातही नारायणाच्या कुल्फी आणि भज्यांची चर्चा होवू लागली. गाव सोडून शिक्षण नौकरी साठी बाहेर गेलेली पोरं गावी आली की नारायणाच्या गाड्यांवर गर्दी करु लागली!


अलिकडील काही वर्षांपुर्वी नारायण थकला. तरुण वयात सुरु झालेल्या मधुमेहाने नारायण आतुन पोखरत गेला. वाढलेल वजन, खाणपाणावरील नियंत्रण कमी करण्यासाठी नारायण ने प्रयत्न केला, पण मधुमेहाने नारायण वरील आपली पकड वाढवली. मधुमेहामुळे नारायणला गॅगरींग चा त्रास सहन करावा लागला. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गणेशोत्सव कालावधीत उपचारासाठी नारायणला दाखल केले होते, तेंव्हा त्यांची भेट घेण्यासाठी मुद्दाम गेलो होतो. नारायण ला त्या स्थितीत पाहुन मला ही वेदना झाल्या. नारायण पुरता गळुन गेला होता, आतुन खचला असल्याचे ही मृतांच्या बोलण्यातुन जाणवत होते. शेवटी आज सकाळी माझा मित्र संतोष बागा यांची नारायण मामा गेल्याची पोस्ट फेसबुकवर वाचण्यास मिळाली आणि नारायणच्या जीवनाचा मी पाहिलेला पट माझ्या डोळ्यासमोरुन हलकासा तरळत गेला.
गरीब असून ही स्वभावाने श्रीमंत असलेला, आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना भजी, वडापाव, कुल्फी च्या माध्यमातून मदत करणारा, सतत हसत बोलत राहणारा, अंबाजोगाई शहरात कुल्फी आणि भज्जांचा ब्रॅण्ड म्हणून ओळखला जाणारा नारायण आज हरपला! पण त्यांच्या कुल्फी आणि भज्जांची चव मात्र अजून कित्येक वर्षे अंबाजोगाई करांच्या जीभेवर रेंगाळणार आहे.
गुड बाय नारायण!

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker