काय आहे इतिहास “परळीबीड-नगर” रेल्वे मार्गाचा!


कॉंग्रेस राजवटीत १९९६-९७ वर्षीच्या मंजूर झालेल्या परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गातील जवळपास ४० टक्के मार्गाचे उद्घाटन आज खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडले. अर्धवट झालेल्या या रेल्वे मार्गाचे उद्घाटन भाजपा ने इतक्या घाईत गडबडीत का केले असावे या प्रश्नांची चर्चा आता होवू लागली आहे.
याच अनुषंगाने परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गाचा नेमका काय इतिहास आहे, यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत.
परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गाचा इतिहास समजावून घेण्यापुर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्वी बीड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गाचा इतिहास समजावून घेवून. भारत स्वतंत्र होण्यापुर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे रेल्वे आणण्यासाठीची प्रक्रिया सर्व प्रथम १९४० च्या पुर्वी सुरु केली होती. निजाम सरकारचे महत्वाचे ठाणे अंबाजोगाई तत्कालीन मोमिनाबाद येथे होते म्हणून निजाम सरकार अंबाजोगाई पर्यंत रेल्वे आणण्यासाठी उत्सुक होता. १९४४ साली निजाम सरकारने हैद्राबाद येथून परळी पर्यंत रेल्वे आणली. परळी येथून अंबाजोगाई पर्यंत रेल्वे आणण्यासाठी साठी लागणा-या एकुण खर्चापैकी अल्पशी रक्कम निजाम सरकारने येथील एका राजाला मागितली होती, पण त्याने ती न दिल्यामुळे परळी येथून अंबाजोगाई ला रेल्वे मार्ग जोडण्याचा प्रयत्न मोडीत निघाला. पुढे निजाम सरकारने परळी-मोमिनाबाद-अंबाजोगाई हा रेल्वे मार्ग पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, पण ते ही शक्य झाले नाही.


या नंतर १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या बीड जिल्ह्यालगत असलेल्या कळंब येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी केलेल्या भाषणात कै. इंदिरा गांधी यांनी या प्रलंबित रेल्वे मार्गाला पुर्नजिवीत करुन अंबाजोगाई -बीड ही दोन गावे रेल्वेच्या नकाशावर उमटल्याचे स्वप्न दाखवले.
या नंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून काम करणाऱ्या तत्कालीन खा. सौ. केशरकाकु क्षिरसागर यांनी हा प्रश्न केंद्रात उचलुन धरला. १९९६-९७ चा काळ कॉंग्रेस पक्षाला खुप अस्थिरतेचा गेला. तत्कालीन कॉंग्रेस राजवटीतील लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकांच्या काळातील हे शेवटचे वर्षे होते. पुढील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणे हे कॉंग्रेस पक्षाचे लक्ष्य होते. या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्याच यावर कॉंग्रेस ने आपले लक्ष्य केंद्रित केले आणि केंद्र सरकारने देशात प्रलंबित असलेले अनेक रेल्वे मार्गांना मंजुरी देत ४० हजार कोटी रुपयांचे बजेट या प्रकल्पांसाठी जाहीर केले. तत्कालीन खा. सौ. केशरकाकु क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गाचा समावेश या नवीन प्रकल्पामध्ये झाला.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घोषीत केलेल्या या नवीन रेल्वे मार्गाच्या भुमीपुजनाचे सोहळे अनेक कॉंग्रेस प्रणित खासदारांनी यावेळी आपापल्या मतदारसंघात केले. “परळी-अंबाजोगाई-केज-नेकनुर-
मांजरसुंबा-बीड-नगर” या रेल्वे मार्गाचे भुमिपुजन ही तत्कालीन खासदार केशरकाकु क्षीरसागर यांनी मोठ्या उत्साहात अंबाजोगाई शहरालगत केले होते.
पुढे केंद्रातील राजकीय समिकरणे बदलली. कॉंग्रेसचे सरकार जावून त्याची जागा भाजपाचे नवे सरकार अस्तित्वात आले. कॉंग्रेस राजवटीत “परळी-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंबा-बीड-नगर” हा मंजुर असलेला रेल्वे मार्ग बदलुन “परळी-नागापुर-
शिरसाळा-तेलगाव-माजलगाव- बीड-नगर” हा नवा रेल्वेमार्ग केंद्रीय मंत्रालयाकडे प्रस्तावित केला. सदरील नवा रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या रेल्वे मंत्रालयाला सक्षम करणारा आहे की नाही याचे सर्वे करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने या विभागाच्या सर्व्हेक्षण विभागाला दिले. सर्व्हेक्षण विभागाने या नवीन रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करुन या मार्गावर प्रवासी अधिभार व मालवाहतुकीतुन मिळणारे उत्पन्न हे यापुर्वीच मंजूर करण्यात आलेल्या मार्गापेक्षा खुप कमी आहे असे अहवालात स्पष्ट नमुद करुन या नवीन मार्गास आपली अनुकुलता दर्शवली. या नवीन मार्गापेक्षा परळी-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंबा-बीड या मार्गावर प्रवासी अधिभार भरपुर मिळेल म्हणून याच मार्गास अनुकुल असलेला आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या सर्व्हेक्षण अहवालाकडे दुर्लक्ष करीत रेल्वे मंत्रालयाने केवळ राजकीय इच्छाशक्ती ला महत्व देत फारसा प्रवासी अधिभार नसलेल्या “परळी – नागापुर -शिरसाळा तेलगाव माजलगाव बीड” या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. आता या रेल्वे मार्गातील केवळ ४० टक्के काम पूर्ण झालेल्या अर्धवट रेल्वे मार्गाचे उद्घाटन खा. डॉ. प्रितम मुंडे आणि भाजपाच्या मान्यवर नेत्यांनी घाईगडबडीत उरकुन घेतले आहे.


१९९६-९७ घ्या काळात मंजुर झालेल्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पुर्ण करण्यास रेल्वे मंत्रालयास जवळपास २५ वर्षाचा कालावधी लागला आहे. हा रेल्वे मार्ग पुर्ण होण्यास आणखी किती वर्षांचा कालावधी लागणार आहे याचे निश्चित उत्तर कोणालाही देता येणार नाही. याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे “परळी-बीड-नगर” या नियोजित रेल्वे मार्गाच्या कामाची सुरुवात परळी येथून न करता ता ती नगर येथुन का करण्यात आली? नगर- आष्टी या अर्धवट रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्याचा घाट इतक्या घाईत गडबडीत का घेण्यात आला? राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार अस्तित्वात असले असते तर हे उद्घाटन इतक्या घाईत गडबडीत झाले असते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काही वेळ निश्चित वाट पहावी लागेल!
एकंदरीत “नगर बीड परळी” या नियोजित रेल्वे मार्गाच्या अर्ध्यापेक्षा कमी मार्गाच्या उद्घाटनाचा सोहळा हा बीड जिल्हृयाच्या विकासाच्या प्रगतीत किती हातभार लावेल यापेक्षा बीड जिल्ह्यातील विशेषतः अंबाजोगाई, केज, नेकनुर, मांजरसुंबा या नियोजित रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांना जखमेवर मीठ चोळणारा ठरणार आहे हे निश्चित!