कापुस दरात पुढील महिन्यात होणार वाढ !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/clipboarfadsd33_202209877800.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/clipboarfadsd33_202209877800.jpg)
यंदा कापसाच्या दरात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. खरीप हंगामातील एक मुख्य नगदी पीक म्हणून कापसाची ओळख. पण सध्या या नगदी पिकाच्या दरात घसरण होत आहे, यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदा देखील गेल्यावर्षी प्रमाणेचं परिस्थिती राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र चालू महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कापूस दरात जवळपास 900 रुपयांची घसरण झाली आहे. आता कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने बाजारात कापसाचीं आवक कमी आहे.
शेतकरी बांधवांच्या मते गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात कापसाला अधिक उत्पादन खर्च झाला आहे. वेचणीचा खर्च देखील आकाशाला गवसणी घालत आहेत. सध्या वेचणीला 12 ते 15 रुपये प्रति किलो खर्च येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कापूस दरवाढीचीं आशा आहे. सध्या कापसाला आठ हजार 200 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे.
या दरात कापसाची विक्री परवडत नसल्याचे कापूस उत्पादकांनी नमूद केले आहे. त्यामुळे बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे आणि हेच कारण आहे की कापसाच्या दरावर आवकेचा परिणाम दिसून येत नाहीये. मात्र उद्योगाकडून कापसावर असलेलं आयात शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली असल्याने याचा कापूस बाजारावर मानसिक दबाव पाहायला मिळत आहे.
यामुळे कापूस दरात 200 ते 300 रुपयांपर्यंतचीं घसरण झाली आहे. परंतु जाणकार लोकांनी सरकार कापसावरील आयात शुल्क रद्द करणार नसल्याचे सांगितले आहे. आणि जर आयात शुल्क रद्द केले तरीदेखील याचा दरावर विपरीत परिणाम होणार नाही. दरम्यान दरवाढीबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात कापूस दरात चढ-उतार पाहायला मिळणार आहे.
पुढील महिन्यापासून मात्र कापूस दरात थोडीशी सुधारणा होऊ शकते आणि कापसाला सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो. निश्चितच पुढील महिन्यापासून कापूस उत्पादकांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा अंदाज बांधत कापसाची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.