महाराष्ट्र

कसा आहे केज विधानसभा मतदारसंघ?

राज्याच्या १६ व्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण उभे आहोत. दोन दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाने राज्य विधानसभा सदस्य निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वच मतदार संघात इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी आपली राजकीय शक्ती व डावपेच वापरत आहेत.
विधानसभा निवडणुकीची लगबग राज्यात सर्वत्र सुरु झाली आहे, मग केज मतदार संघात ही लगबग चालू न झाली तर नवलच! ही लगबग सुरु असतांनाच नवीन आमदार निवडण्यापुर्वी केज विधानसभा मतदार संघाचा थोडा भौगोलिक अभ्यास आपण करु या.
२००९ साली १३ व्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यातील विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना करण्यात येवून बहुतांश मतदार संघाच्या भौगोलिक कक्षांमध्ये बदल करण्यात आले. राज्यातील सर्वच मतदार संघातील अनेक गावांची मोडतोड करुन ते इतर मतदार संघात जोडण्यात आले आणि कांही नवीन मतदार संघाची निर्मिती ही करण्यात आली. परळी मतदार संघाची निर्मिती याच काळात झाली.

याच प्रक्रियेत पुर्वीच्या केज विधानसभा मतदार संघाच्या भौगोलिक क्षेत्रात फारमोठे बदल करण्यात येवून अंबाजोगाई तालुक्याच्या एका टोकापासून सुरु झालेला हा मतदार संघ अंबाजोगाई, केज, चौसाळा तालुक्याच्या सीमा ओलांडत चक्क बीड तालुक्या पर्यंत नेवून ठेवला, आणि या मतदार संघात अनुसूचित मतदारांची संख्या अधिक आहे अशी मतदारांची आकडेबेरीज करीत हा मतदार संघ (अनुसूचित जमाती SC) प्रवर्गासाठीचे आरक्षण पुन्हा एकदा मतदार संघाची पुर्नरचना होईपर्यंत कायम ठेवले.
२००९ साली झालेल्या १३ व्या विधानसभा निवडणुकीपुर्वी केज विधानसभा मतदार संघाच्या पुर्नरचनेत केज विधानसभा मतदार संघातील धारुर तालुक्यातील १६ गावातील १५,३५० मतदारांचा समावेश माजलगाव विधानसभा मतदार संघात तर अंबाजोगाई तालुक्यातील २१ गावामधील २९,८३४ मतदारांचा समावेश नव्यानेच निर्माण झालेल्या परळी विधानसभा मतदार संघात करण्यात आला. म्हणजेच केज विधानसभा मतदारसंघातील ४५, १८५ मतदार माजलगाव आणि परळी मतदार संघात समाविष्ट करण्यात आले.
तर दुसऱ्या बाजूला केज विधानसभा मतदारसंघात जुन्या चौसाळा मतदार संघातील नांदुरघाट, वीडा, येवता, चिंचोळीमाळी या जिल्हा परीषद मतदार संघातील ६१,३३९ तर बीड तालुक्यातील नेकनुर जिल्हा परिषद मतदार संघातील २५,३०९ असे एकूण ८६,६४८ नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. या मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर केज विधानसभा मतदार संघाची एकुण मतदार संख्या २ लाख ८३ हजार ७५३ एवढी झाली होती. यात केज तालुक्यातील १,५७,६३३ अंबाजोगाई तालुक्यातील १,००,८११ तर बीड तालुक्यातील २५,३०९ मतदारांचा समावेश होता.

केज विधानसभा मतदार संघात १९९० साली विद्दमान आमदार बी.एन. सातपुते यांचा ९,२२१ मतांनी पराभव करुन सतत या मतदारसंघात वाढत्या मतांनी विजयी होणाऱ्या तत्कालीन आमदार डॉ. सौ. विमल मुंदडा यांना या मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीतही मतदारांनी ४० हजारांचे विक्रमी मताधिक्य देत विजयी केले होते.
मतदार संघाच्या पुर्नरचनेच्यावेळी २ लाख ८३ हजार ७५३ एवढी मतदार संख्या आसलेल्या या मतदारसंघातील मतदार संख्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदान यादीनुसार आता ३ लाख ८५ हजार ०८१ वर जावून पोहंचली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे केज तालुक्यातील २ लाख ११ हजार ४८९ एवढे आहे. या मध्ये पुरुष मतदार पुरुष १ लाख १० हजार ९७०, महिला मतदार १.००.५१८ तर इतर १ एवढ्या आहेत. त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात १ लाख ३८ हजार ७३१ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ७२,०३०, महिला मतदार ६६,६९६ तर इतर ५ मतदार आहेत. बीड तालुक्यात ३४ हजार ८६१ एवढे मतदान आहे. यामध्ये पुरुष मतदार १८,६३२ तर महिला मतदार १६,२२९ एवढे आहे. अर्थात मतदार संघाची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत यामध्ये थोडा बदल होवू शकतो.
या नव्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण करण्यात आलेल्या केज विधानसभा मतदार संघाची ही निवडुक आहे. त्यामुळे या मतदारसंघातुन निवडणूक लढवणा-या इच्छुक उमेदवारांचा या मतदारसंघातील गावांचा चांगला अभ्यास झाला असेल असे गृहीत धरायला काहीही हरकत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात बदललेल्या राजकीय समिकरणाचे गणित लक्षात घेता वरवर सोपी वाटणारी केज विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक क्लिष्ट बनत चालली आहे. नवीन राजकीय बदललेली समीकरणे, त्या त्या विभागातील नवे प्रश्न आणि बदलत्या राजकारणातील बदलते संदर्भ या सर्व पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणुक आज तरी विद्यमान आ. नमिता अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे आणि प्रा. संगिता ठोंबरे यांच्या मध्ये तिरंगी लढत होईल असे वाटते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker