ओंकार रापतवार यांचा “रंगरेझा” जगभरातील रसीकांना घालणार भुरळ!


साऊथ आफ्रिका, इथोपिया, टांझानिया सह विविध ठिकाणी होणार “रंगरेझा” चे कार्यक्रम
अंबाजोगाई शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील उदयोन्मुख संगितकार ओंकार रापतवार यांचा “रंगरेजा” जगभरातील रसिकांना भुरळ घालणार असून आफ्रिका खंडातील साउथ वेस्ट तसेच इथोपिया टांझानिया इत्यादी देशात सलग चार महिने ओंकारचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहेत. अंबाजोगाईकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
अंबाजोगाईला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि हीच ओळख कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीतील युवा संगीतकार ओंकार रापतवार याने आपल्या कलेचा आविष्कार जगभरामध्ये पोहोचवून अंबाजोगाईकरांना सुखद अभिमानाचा क्षण निर्माण करून दिला आहे. अत्यंत कमी वयात आणि वेळेत एकाच वेळी अनेक वाद्य वाजवणारा, अत्यंत कमी वयात काही वर्षांपुर्वी “दि रेन” हा स्वतःचा संगीत अलबम काढून आपले सांगितीक करीयर सुरुवात करुन आंध्रप्रदेशातील दोन चित्रपटांना पार्श्वसंगीत देवून आंध्र चित्रपट सृष्टीत स्वतःची नवी ओळख निर्माण करणारा, मराठवाड्यातील अनेक नवोदित गायकांच्या गाण्यांना संगीतबद्ध करून प्रसिध्दीच्या झोतात आलेला ओंकार आता परदेशातील रसिकांना मोहित करण्यासाठी जातोय.


संगीत, साहित्य, क्रीडा या क्षेत्रामध्ये अंबाजोगाईकरांनी आपला स्वतंत्र ठसा निर्माण केलेलाच आहे. परंतु या सर्वांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा युवा संगीतकार ओंकार हा आगळावेगळाच म्हणावा लागेल. शास्त्रीय तबलावादनापासून आपल्या अध्ययनाला सुरुवात करणाऱ्या ओंकारने आज उत्तम कंपोजर आणि जगभरातील विख्यात गायकांना साथसंगत करणारा ड्रमर अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2024 या चार महिन्याच्या कालावधीमध्ये ओंकारच्या “रंगरेजा” हा ग्रुप तांझानिया इथोपिया तसेच आफ्रिका खंडातील साउथ आणि वेस्ट आफ्रिकेमध्ये आपला कलाविष्कार सादर करून जगभरातील रसिकांना भुरळ घालणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रंगरेजा ग्रुप इंडियन क्लासिकल, सुफी साँग, वेस्टर्न फ्युजन, सोलो, बॉलीवूड साँग त्याचबरोबर पाश्चात्य संगीत रसिकांसाठी इंग्लिश साँगही सादर करणार आहे.


ओंकार रापतवार याच्या नेतृत्वाखाली परदेशवारीवर निघालेल्या या “रंगरेजा” ग्रुपमध्ये रणबीर सिंग – गिटार, भैरवी पाटील शास्त्रीय गायिका, सौरभ बासरी, शाकीब – बेस गिटार यांची साथसंगत लाभणार आहे. सध्या नवीन पिढीमध्ये अनेक युवा संगीतकार नावारूपाला येत आहेत, प्रत्येकाची काही ना काही तरी वेगळी खासियत आहे. परंतु या प्रचंड स्पर्धेमध्ये सुध्दा ओंकार रापतवार याने आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. स्वतः संगीतकार आणि उत्तम कलावंत म्हणून प्रसिद्धीच्या वलयात असतानाच आपल्या कलेचा लाभ येणाऱ्या भावी पिढीला व्हावा यासाठी त्याने अंबाजोगाई मध्ये सत्येंदू फाउंडेशन संचलित बॉम् म्युझिक स्कूलची उभारणी केलेली असून या माध्यमातून शास्त्रीय उपशास्त्रीय पाश्चात्य लोकसंगीत या सर्वच कला प्रकारातील बारकावे लक्षात घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवले जात आहे.




ओंकारचा कलावंत म्हणून सादरीकरणासाठी हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यामध्ये हजारो पाश्चात्य रसिकांसमोर ओंकारला आपली कला सादर करण्याची उत्तम संधी या माध्यमातून मिळालेली आहे आणि हा फक्त ओंकारसाठीच नव्हे तर पूर्ण अंबाजोगाईकरांसाठी प्रचंड अभिमानाचा क्षण आहे. ओंकार रापतवार याने याच पद्धतीने कलाक्षेत्रामध्य यशाची शिखरे पदाकांत करावीत यासाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


यापूर्वीही अनेक कलावंतांनी सादरीकरणासाठी परदेश वाऱ्या केलेल्याच आहेत परंतु ओंकार आपल्या “रंगरेजा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लाखो पाश्चात्य रसिकांसमोर फक्त कलाच सादर करणार आहे असं नव्हे तर त्याची ज्या पद्धतीने जडणघडण झाली आहे त्या पद्धतीने तो तेथील लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल हे नक्की. आणि एक गुरु म्हणून या लाडक्या शिष्याचा मला सार्थ अभिमानाचा आहे.
ताल मार्तंड प्रकाश बोरगावकर