उच्च शिक्षण आणि विकासाची दृष्टी असणा-या तरुणांना राजकारणात चांगली संधी; माजीमंत्री पंडीतराव दौंड
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230212_173154-933x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230212_173154-933x1024.jpg)
आगामी काळात उच्च शिक्षण आणि विकासाची दृष्टी असणा-या तरुणांना राजकारणात चांगल्या संधी निर्माण होतील असे सांगत माजी राज्यमंत्री ऍड. पंडीतराव दौंड यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जुन्या काळातील जाणते राजकारणी तथा माजी राज्यमंत्री ऍड. पंडीतराव दौंड यांनी आज ८५ वे वर्ष संपवत ८६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच अनेक चाहत्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
रेणापूर विविध सभा मतदार संघाचे तत्कालीन आ. रघुनाथराव मुंडे यांच्या अकाली अपघाती निधन झाल्यानंतर १९८० साली झालेल्या निवडणुकी गोपिनाथराव मुंडे विजयी झाले. आ. गैपिनाथराव मुंडे यांच्या आमदारकीचा पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकां लागण्यापुर्वी या मतदारसंघातुन नवा उमेदवार देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने चाचपणी सुरु असतांनाच शिक्षकांची नौकरी सोडून देवून वकिली व्यवसायात जम बसवू पाहणाऱ्या ऍड. पंडीतराव दौंड यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालयातुन दुरध्वनी आला आणि त्यांना आ. गोपिनाथराव मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिल्यास गेली. बीड जिल्ह्याच्या तत्कालीन खा. सौ. केशरकाकु क्षीरसागर यांची त्यांना या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात खुप मदत झाली, आणि ते पहिल्याच प्रयत्नात विजयी सुध्दा झाले.
२.५ वर्षे आमदार; २.५ वर्षे राज्यमंत्री !
१९८५ ते १९९० असा सलग पाच वर्षाचा काळ त्यांना आमदार म्हणून उपभोगता आला. याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना जून १९८७ मध्ये राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. जवळपास अडीच वर्षे ऍड. पंडीत राव दौंड यांनी ग्रामीण विकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आदि विभागाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळला.
जलसिंचनाचे निर्माण केले जाळे
ऍड. पंडीतराव दौंड यांनी या राज्यमंत्री पदाचा उपयोग परळी-अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी सिंचनासाठी अनेक साठवण, मध्यम, लघु आणि पाझर तलावांच्या निर्मितीसाठी केला. बीड जिल्ह्यात हा मागास डोंगराळ भागातील अनेक नैसर्गिक साइडचा शोध घेत त्यांनी तलावांचे एक जाळे उभे केले आणि मोठ्या प्रमाणात ऊसतोडणीसाठी जाणारा शेतकरी किमी प्रमाणात आपल्या शेतात रमण्यास सुरुवात झाली. ऍड. पंडीतराव दौंड यांनी आमदार आणि राज्यमंत्री असताना केलेल्या अनेक कामांची आठवण आज ही अनेकजण काढतात.
स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणी
राजकारणात राहुनही आपल्या स्वच्छ आणि निश्कलंक चारित्र्यावर एवढासा ही ठपका पडु न देणाऱ्या ऍड. पंडीतराव दौंड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या पाच वर्षीच्या मंत्रालयातील अनेक आठवणींना आज मुक्त उजाळा दिला.अडीचवर्षे आमदार आणि अडीच वर्षे राज्य मंत्रीपद उपभोगणाऱ्या ऍड. पंडीतराव दौंड यांनी पाच वर्षाच्या राजकीय काळात एकदाही शासकीय विश्रामगृहावर जेवण केल्याचे ऐकिवात नाही.
मंत्री असतांनाही कपड्यात बांधलेले जेवणच असायचे सतत सोबत!
राज्यमंत्री असताना ऍड. पंडीतराव दौंड यांनी अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर राज्यातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिका-यांच्या बैठकीचा किस्सा मला आज ही आठवतो. बैठकीच्या संयोजक स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठकीची आणि बैठकीनंतर जेवणाची उत्तम व्यवस्था केली. बैठकीनंतर जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारची मासे, मटनाचे वेगवेगळे पदार्थ केले. राज्यमंत्री दौंड साहेब, वरीष्ठ अधिकारी आणि मोजके पत्रकार भोजन कक्षात गेले. जेवण वाढण्यासाठी अधिका-याची लगबग सुरु झाली. दौंड साहेबांच्या ड्रायव्हरने त्यांचा घरुन आणलेला जेवणाचा डब्बा त्यांच्या समोर ठेवला आणि सगळे अधिकारी अवाक झाले ! तुम्हाला लागेल, चालेल ते तुम्ही खा, मी घरुन आणलेल्या डब्या व्यतिरीक्त काहीही खात नाही म्हणत त्यांनी सर्व अधिका-यांसोबत आपला घरचा आणलेला डबा संपवला. दौंड साहेबांच्या अशा साधेपणाच्या कितीतरी आठवणी आज ही अनेकजण सांगतात!
येणारा काळ हा अतिशय वेगाने जाणारा काळ आहे. तेंव्हा राजकारणात विकासाची दृष्टी आणि उच्च शिक्षण असणा-या स्वच्छ चारित्र्याच्या तरुणांना चांगली संधी निर्माण होईल असा आशावाद ही माजी राज्यमंत्री ऍड. पंडीतराव दौंड यांनी व्यक्त केला.