आष्टी-नगर शटल रेल्वेला दररोज ४ लाखांचा तोटा; ७०० प्रवासी क्षमतेच्या रेल्वेत दररोज फक्त ४ च प्रवासी!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221001_230724.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221001_230724.jpg)
अत्यंत प्रतिष्ठेचा मार्ग करीत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेले बहुचर्चित नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील पहिला ६० किमी च्या मार्गावर सुरु करण्यात आलेली आष्टी नगर ही रेल्वे सुरुवातीलाच दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका रेल्वे प्रशासनाला देत आहे. साधारणपणे दररोज ४ लाखांचा तोटा रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
१९९६-९७ साली कॉंग्रेस राजवटीत मंजुर करण्यात आलेल्या परळी-बीड-नगर या नियोजित रेल्वे मार्गावरील ६० कीमी च्या “नगर-आष्टी” पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने या महत्वकांक्षी रेल्वेमार्गावर “आष्टी-नगर-पुणे” या शटल रेल्वेचा शुभारंभ गेल्या आठवड्यात भाजपाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या धुमधडाक्यात सुरु करण्यात आला.
आठ दिवसांत या रेल्वे मार्गावरील प्रवासी अधिभारा संबंधीची व या नवीन रेल्वे मार्गावरुन किती प्रवाश्यांनी आजपर्यंत अधिकृत प्रवास केला याची माहिती थक्क करुन सोडणारी आहे.
या विभागाच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी या अर्धवट रेल्वे मार्गावर आष्टी नगर पुणे ही शटल रेल्वे दररोज सुरु केली आहे. ७०० प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे दररोज आष्टी नगर पुणे आणि पुणे नगर आष्टी अशी शटल सेवा देत आहे. या नवीन रेल्वे मार्गावर गेली आठ दिवसांत किती प्रवाशांनी अधिकृत प्रवास केला याची माहिती या रेल्वेमार्गावर शटल सेवा सुरू करण्यासाठी आग्रह धरणारे नागरीक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळ यांनी नगर रेल्वे स्टेशनवरील तिकीट सुप्रिटेंडेंट प्रसाद उम यांना अधिकृत माहिती विचारली असता त्यांनी सांगितलेली माहिती थक्क करुन सोडणारी आहे. प्रसाद उम यांनी सांगितले की, या नवीन रेल्वे मार्गावरुन रेल्वे सुरु झाली तेंव्हापासून दररोज फक्त ३ ते ४ च प्रवासी प्रवास करतात. आष्टी नगर चे तिकीट ४० रु. असून आष्टी ते पुणे हे तिकीट १६० रुपयांचे आहे. या नवीन रेल्वे मार्गावरुन रेल्वे सुरु झाली तशी फक्त १,२००/- रुपयांचा उत्पन्न रेल्वे ला मिळाले आहे तर याउलट रेल्वेला दररोज ४ लाखांचा तोटा सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
▪️त्यांचा अंदाज खरा ठरला!
मुळात १९९६-९७ साली मंजूर करण्यात आलेला रेल्वे मार्ग हा परळी अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा बीड जामखेड नगर असा होता. मात्र हा मार्ग बदलुन परळी नागापुर शिरसाळा तेलगाव माजलगाव बीड आष्टी नगर असा करण्यात आला. हा नवीन रेल्वे मार्ग प्रवासी अधिभार न देणारा व रेल्वेचे उत्पन्न न वाढवणारा असल्याचा अहवाल त्यावेळी या रेल्वे मार्गाचा सर्वे करणा-या अधिका-यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला होता. मात्र राजकीय शक्ती चा वापर करून हा नवीन रेल्वेमार्ग मंजूर करून घेण्यात आला.
आता या नवीन रेल्वे मार्गावरील ६० किमी अंतर असलेल्या आष्टी नगर रेल्वे मार्गावर मागील आठ दिवसांपुर्वी रेल्वे सुरु करण्यात आली. त्यानंतर त्या अधिका-यांनी दिलेल्या अहवालात म्हटलेलं तंतोतंत खरे असल्याचे दिसून येते आहे.