अवयव दानाची चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज; आ. नमिता मुंदडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150521-1024x420.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150521-1024x420.jpg)
अवयव दानाची चळवळ अधिक गतीमान आणि व्यापक होण्याची गरज असल्याचे मत आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या वतीने आज जागतिक अवयव दान दिनाच्या निमित्ताने येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. मुकुंद मोगरेकर तर प्रमुख अतिथी म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ सिध्देश्वर बिराजदार, उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, अधिसेविका उषा भताने व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात आ. नमिता मुंदडा पुढे म्हणाल्या की, भारतात अवयव दानाची आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया प्रत्यक्षात १९७१ साली सुरू झाली असली तरी अजूनही ही चळवळ सामान्य लोकांपर्यंत पोहोचली नाही. अवयव दानाच्या प्रक्रियेबद्दल सामान्य लोकांच्या मनात अनेक गैरसमज असून हे गैरसमज या अवयव दान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून दुर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150950-1024x467.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150950-1024x467.jpg)
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचेल व हे महाविद्यालय महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या मोहीमेअंतर्गत चांगले काम करुन एक नवा विक्रम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_151010-300x131.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_151010-300x131.jpg)
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अवयव दान जनजागृती अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. विनोद वेदपाठक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने आज जागतिक अवयव दान दिनाच्या निमित्ताने हे जनजागृती अभियान सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्याच्या सुचना या विभागाचे मंत्री गिरीष महाजन, सतीश डॉ. अश्विनी जोशी, आयुक्त डॉ. राजीव निवतकर आणि संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या वैद्यकीय महाविद्यालयात आज पासून न ते फेब्रुवारी महिन्यात येणा-या जागतिक विज्ञान दिनापर्यंत अवयव दान अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं आणि वैद्यकीय कर्मचारी हे प्रयत्न करीत आहेत. या अभियानांतर्गत आज पर्यंत २८० जणांनी अवयवदानाच्या संमंतीचे फॉर्म भरुन दिले असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230407-WA0191-1024x768.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230407-WA0191-1024x768.jpg)
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना अधिष्ठाता डॉ. मुकुंद मोगरेकर यांनी भारतात रस्ते अपघातात मृत पावणा-या लोकांची संख्या मोठी असून अशा अपघातात ब्रेन डेड झालेला रुग्ण हा आपले २ मुत्रपिंड, १ यकृत, १-हदय, २ फुफ्फुसे, १ स्वादुपिंड असे एकुण ७ अवयव दान करुन किमान ७ जणांचे प्राण वाचवू शकतो, मात्र अवयव दानाची संमती न दिल्यामुळे ही प्रक्रिया पुर्ण करता येत नाही. तेंव्हा ही प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यासाठी या अवयव दान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास डॉ. नितीन चाटे, डॉ. दिपक लामतुरे, डॉ. सुनिता बिराजदार, डॉ. दिपाली देशपांडे, डॉ. सतीष गिरेबोइनवाड, डॉ. अनिल मस्के, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. नामदेव जुने, डॉ. संजय चव्हाण यांच्या सह वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक सहयोगी प्राध्यापक, लेक्चर्स, हाऊसमन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230407-WA0193-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230407-WA0193-300x225.jpg)
प्रारंभी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना रुग्णालय विभागाचे उप अधीक्षक डॉ. विश्वजित पवार यांनी अवयव दान जनजागृती अभियानाचे महत्व सांगून भारतात तामिळनाडू हे राज्य अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्राचा या प्रक्रियेत ७ वा क्रमांक लागतो असे सांगत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने ही चळवळ गतीमान करण्यासाठी या अवयव दान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश अब्दागिरे यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या नाटीकेने वेधले लक्ष!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150700-1024x447.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_150700-1024x447.jpg)
जागतिक अवयव दान दिनाच्या निमित्ताने येथील शासकीय परिचारीका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एका सुंदर नाटिकेव्दारे अवयव दानाचे महत्व पटवून दिले. वैद्दकीय महाविद्यालय परीसरात अनेक ठिकाणी ही नाटिका सादर करण्यात आली. सदरील नाटीका तयार करण्यासाठी परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या व महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गांची परीश्रम घेतले.
जनजागृती रॅलीस मोठा प्रतिसाद
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_151059-300x166.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230407_151059-300x166.jpg)
जागतिक अवयव दान दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी रॅली या निमित्ताने काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाती अवयवदानाचे महत्व सांगणारे वेगवेगळे फ्लॅक्स हाती घेतले होते. या फ्लॅक्स ने व विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सामान्य लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.