अति.जिल्हा पोलीस मुख्यालयात रंगला मुस्लिम भगिणींचा इफ्तार कार्यक्रम
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_094030-1024x481.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230420_094030-1024x481.jpg)
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी घेतला पुढाकार!
सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी हिंदू आणि मुस्लिम महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली यावेळी हिंदू आणि मुस्लिम महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
इफ्तार पार्टीला पुरुषांचीच उपस्थिती आपण बघितलेली आहे. मग हिंदू-मुस्लिम असो की फक्त मुस्लिम, मात्र अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी नवीन पायंडा येथील अतिरिक्त जिल्हा पोलिस मुख्यालयात सुरु केला आहे. कविता नेरकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठीच्या इफ्तार पार्टीचे आयोजन बुधवार (दि. (१९) रोजी करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास मुस्लिम भगिणींचा मोठा प्रतिसाद मिळाला.
हिंदू आणि मुस्लिम धर्मियांत एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे, शहरातील जातीय सलोख्याने वृध्दी व्हावी म्हणून रमजान महिन्यातील रोजा इफ्तार कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/image_editor_output_image2100316570-1681965029726-300x132.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/image_editor_output_image2100316570-1681965029726-300x132.jpg)
रमझान महिन्यात साधारणतः पुरुषांचेच इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मागील आठवड्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार कार्यक्रमाचे नियोजन आणि तेथील उत्साह पाहून अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्र अशा रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस बोलुन दाखवला होता. आणि या इफ्तार कार्यक्रमाचे सुंदर नियोजन लागलीच कविता नेरकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास मुस्लिम महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या इफ्तार कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य मुस्लिम महीला़सह काजी मेराज, माजी नगर सेविका चौधरी भाभी, प्रा. डॉ. अखिला गौस, फरहा मुजीब काजी, प्रा. महजबीन फारूकी, अँड नीलोफर शेख, प्रा. डॉ. शैलजा बरुरे, प्रा . डॉ. अरुंधती लोहिया आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह अंबाजोगाई शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी-अधिकारी उपास्थित होत्या. आपले कर्तव्य सांभाळत असतांनाच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आयोजित केलेल्या मुस्लिम भगिणींसाठी रोजा इफ्तार कार्यक्रम या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.