काळरात्र…. ३ जून…. अचानक एक ब्रेकींग न्युज आली आणि काळजाचा ठोका चुकवून गेली.


साहेबांचा स्मृतीदिन, ३ जून २०१४ रोजी सकाळी आठच्या दरम्यान दुरदर्शनवर बातम्या पहात असतांना अचानक एक ब्रेकींग न्युज आली आणि काळजाचा ठोका चुकवून गेली. अर्ध्या तासातच दुरदर्शनवरील सर्व चँनलवर साहेब गेल्याच्या बातम्या सुरु झाल्या आणि संपुर्ण देशातील साहेबांच्या चाहत्यांचा बांध सुटला….
साहेबांची जयंती किंवा पुण्यतिथी आली की माझ्या मनाची अस्वस्थता अधिकच वाढत जाते. मन अगतीक होत जाते आणि ओठ निशब्ध होतात ….
मला आज ही साहेब गेल्याचा क्षण आठवतो. त्या दिवशी सकाळी इतर कामात व्यस्त असल्यामुळे मी टीव्ही लावला नव्हता. सकाळी माझा मित्र जगन सरवदे याचा फोन आला. “साहेब, टीव्ही पहाताय का?” असा प्रश्न त्याने मला केला. मी म्हणालो नाही. मग त्यांनेच सांगितले… “मुंडे साहेबांचा खुप मोठा अपघात झालाय… पटकन टिव्ही लावा”. टिव्ही लावून मी सर्व बातम्या पहात सोफ्यावर बसलो…आणि काय घडले असेल याची कल्पना मनाला शिवून गेली. काळजाचा थरकाप उडाला अशी जाणीवही झाली. आणि एका तासाच्या आतच नको ती बातमी कानी पडली.
“साहेब गेल्याची…”
माझा बाप… माझी माय.. गेल्यागत माझी अवस्था झाली. नकळत डोळ्यांमधून आसवांच्या धारा वाहू लागल्या. बायको मुलांच्या हे लक्षात येवू नये म्हणून माझी धडपड सुरु झाली. आणि माझ्याही नकळत मी ढसाढसा रडू लागलो… या सर्व गोष्टी आज ही प्रकर्षाने आठवतात. अगदी काल घडल्या प्रमाणे.
तसा मी साहेबांच्या अगदी फार जवळ ही नव्हतो आणि लांब ही नव्हतो. साहेब मोटार सायकलवर (एज्डी) फीरत होते तेंव्हा पासून मी त्यांना पहात होतो… पत्रकार म्हणून भेटत ही होती. परळी बसस्थानका समोर परमार यांच्या बंगल्यात माडीवर साहेब भाड्याने रहात तेंव्हा पहिली महिंद्रा गाडी साहेबांनी घेतली त्यावेळी मी अशोक गु़जाळ, अशोकराव देशमुख आणि इतरांसोबत त्यांना भेटायला गेल्याची आठवण अजूनही ताजीच आहे. साहेब जिल्हा परीषद सदस्य असल्यापासूनच्या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यापर्यंतच्या अनेक आठवणी आज ही माझ्या मनात घर करुन आहेत. साहेब आमदार झाले, विरोधीपक्षनेते झाले. साहेब विरोधीपक्षनेते असतांना शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. यावेळी विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी साहेबांनी शरद पवार सरकार विरोधात संपुर्ण महाराष्ट्रातुन संघर्ष यात्रा काढली होती आणि या संघर्ष यात्राचा समारोप त्यांनी शरद पवारांच्या जन्मभुमीत “बारामती”ला ठेवला होता. या संघर्ष यात्रेतील एक सभा अंबाजोगाई मध्ये आयोजित केली होती. यासभेमध्ये साहेबांनी पवार सरकार विरुद्ध आक्रमक भाषण केले होते. यासभेनंतरच्या पत्रकार परीषदेत मी साहेबांना “पवार साहेबांच्या गावातही असेच आक्रमक बोलणार का?” असा प्रश्न विचारला होता. वेळी साहेब म्हणाले होते, “पवार साहेबांच्या बारामती येथील समारोपीय सभेतील माझे भाषण ऐकायला मुद्दाम या.” साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी बारामतीला जाण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था ही केली होती. बारामती येथील तडाखेबाज भाषण ऐकल्यानंतरच साहेब पवारांची सत्ता घालवणार असे वाटले होते, आणि झाले ही तसेच.
शरद पवार सरकारचा या निवडणुकीत पराभव झाला आणि राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार आले. साहेब उपमुख्यमंत्री झाले. साहेब आता उपमुख्यमंत्री झाले… मोठे झाले आपल्याला आता तेवढा प्रतिसाद मिळणार नाही म्हणून मी कांही काळ थोडा बाजूला झालो. उपमुख्यमंत्र्यांपर्यंत काम घेऊन जाण्याइतपत आपण मोठे नाहीत, आपले ते काम ही नाही. अशी बुजरी भावना मनात निर्माण झाली आणि माझा नकळत संपर्क कमी झाला. एके दिवशी साहेबांचे पीए दिनकर गुरुजी गाडी घेऊन आँफीसलाच आले. चहा झाली. दिनकर गुरुजींनी मस्तपैकी सिगारेट ही ओढली. आणि मला म्हणाले, “मला साहेबांनी पाठवलय, तुला घेवून यायला सांगितलय. चला तुला सोडायला पुन्हा गाडी येईल.”
दिनकर गुरुजी माझी नेहमी प्रमाणे माझी थट्टा करताहेत असे समजून मी फारसा प्रतिसाद न देता इतर गप्पा मारत बसलो. अर्धा तास होवून गेला तशी दिनकर गुरुजींची अस्वस्था वाढली. उशीर होताय याची त्यांना जाणीव होत असावी. त्यांनी अखेर मला सोबत घेतले आणि परळीला नेलेच.
साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तसा पहिल्यांदाच मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. आजचे चित्र खुपच निराळे होते. पोलिसांच्या दोन-तीन व्हँन, पाच-सहा जीप, आणि इतर अनेक गाड्यांची गर्दी पाहून मी थबकलोच. गाडीतून उतरल्यानंतर गुरुजींनी गर्दीतून वाट काढत मला साहेबांच्या समोर नेवून उभे केले. साहेबांनी माझी व्यवस्था पाठीमागे गार्डनमध्ये करायला सांगितली. गार्डन मधील खुर्चीवर मी बसलो. लगोलल चार पोलीस चार
कोप-यात येवून उभे टाकले. साहेब येईपर्यंत नाष्टा-चहा आला. थोड्या वेळेने साहेब ही आले. मी आणि साहेब फक्त आमच्या दोघांमध्ये अर्धातास विविध विषयांवर बोलणे झाले. माझ्या मनातील न्युनगंड काढून टाकण्यास व सतत संपर्कात राहण्यास साहेबांनी सांगितले. साहेबांनी दिनकर गुरुजींना बोलावून घेतले आणि माझी अंबाजोगाईला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.
साहेब उपमुख्यमंत्री असतांना अनेकदा मुंबईला जाण्याचा योग आला. मी आणि जगन सरवदे पहिल्यांदाच साहेबांच्या भेटीसाठी मुंबईला गेलो होतो. आमदार निवासात आ. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या रुमवर उतरुन आंघोळ नाष्टा करुन आम्ही साहेबांच्या शासकीय “रामटेक” बंगल्यावर भेटण्यासाठी गेलो. साहेब “रामटेके” मधील आँफीस मध्ये आलेच होते. मी पीए कडे कार्ड दीले, साहेबांनी लगेच आत बोलावून घेतले. पीएं ची ओळख करुन दिली. यापुढे कोण्याही आमदारांच्या रुमवर थांबण्याची गरज नाही, मंत्रालयात स्वतंत्र रुमची व्यवस्था होईल, असे ही सांगितले. मंत्रालयात जातांना साहेबांनी स्वतः च्या गाडीत आम्हाला मंत्रालयात नेले. मंत्रालयातील ते वातावरण व साहेबांचा रुबाब पाहून मला मीच खुप मोठा झाल्याचा भास होवू लागला. आम्ही साहेबांच्या कँबीन मध्ये आलो. साहेबांच्या समोर मी बसलो. पीएं ची लगबग सुरु झाली. व्हिजीटर्स साहेबांची वाट पहात थांबले होते. पीए
एक-एकाला आत सोडत होता. आम्हाला बोलण्याची संधीच भेटत नव्हती. साहेबांनी पीएं ना बोलावून घेतले. ते त्यांना म्हणाले, “संजय… हमे फस्कालस दो काँफी भेज दो…, हम अँटी चेंबर में बैठ रहे है… और हाँ, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. हम बाहर आने तक, कोईभी डिस्टर्ब नही चाहीए…” मी आणि साहेब… आम्ही अर्धातास विविध विषयांवर बोललो. साहेबांचा जास्तवेळ घेणे नक्य नव्हते. बाहेर येवून आँफीस मध्ये बसलेल्या जगन सरवदे यांना सोबत घेवून मी मंत्रालया बाहेर पडलो.
साहेब उपमुख्यमंत्री असतांना पुढे अनेकवेळा मुबंई ला जाण्याचा योग आला. याच काळात साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी, जगन सरवदे, चंद्रशेखर वडमारे आणि अँड. किशोर गिरवलकर असे चौघे मुंबईला गेले होतो. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर साहेबांच्या हेलिकॉप्टरच्या खिडकीचा काच फुटून हवा आत गेल्यामुळे अपघात झाला होता, या अपघातात सुदैवाने साहेब सुखरुप बचावले होते. दुसऱ्या दिवशीच वाढदिवस असल्यामुळे आम्ही तीघे सकाळीच “रामटेक” वर हजर झालो. साहेब अपघातातून सुखरुप बचावल्यामुळे वहिनीसाहेबांसोबत “सिध्दीविनायकाच्या” दर्शनासाठी निघाले होते. तेवढ्या गडबडीत ही साहेब आमच्या जवळ आले. “अगोदर सिध्दिविनायकाचे दर्शन आणि नंतर भेट” असे सांगून ते लगेच दर्शनासाठी निघून गेले. जातांना आमच्या बसण्याची विशेष सोय करण्याचे सांगण्यासही साहेब विसरले नाहीत. दर्शनाहुन परत येताच आमची भेट घेतली. बंगल्याच्या पाठीमागे समुद्रकिनारी बसण्याची आमची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. आम्ही पाठीमागे लाँन्सवर बसलोत. आपली प्रसन्नमुद्रा आणि सुमुद्रकिना-याची प्रसन्न हवा आमचे मन प्रफुल्लित करुन गेले. तुम्ही बाहेर आलेल्या निवडक व्यक्तींच्या भेटी घेवून आत आलात. वहिणीसाहेबांना बोलावलेत, आणि म्हणालात, “बघ, सारखे म्हणत होतीस, माहेरहुन, अंबाजोगाईहून कोणी आले नाही, हे आलेत. आमच्या ओळखीही आपण करुन दिल्यात.” माझे वडील वहिणीसाहेबांच्या वडीलांसोबतच जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षक होते. वहिनीसाहेबांचे वडील महाजन गुरुजी मुख्याध्यापक आणि माझे वडील सहशिक्षक. शिवाय त्याकाळी ते सदरबाजार विभागातच रहात असल्यामुळे त्यांच्या घरी आमच्याच घरातील म्हशीच्या दुधाचा रतीब असल्यामुळे तशी चांगली ओळख होती. हा धागा पकडून मी वहिणीसाहेबांना माझी ओळख सांगितली. वहिणीसाहेबांनाही ही ओळख पटली. पुन्हा साहेबांना ही हा संदर्भ सांगताच साहेब हसले. आत साहेबांसोबत नाष्टा… वहिणीसाहेबांचा आग्रह… किती अभिमान वाटला होता म्हणून सांगू…
पुढे साहेब राज्यातून केंद्रात गेले. पण राज्यातील त्यांचा दरारा कायमच होता. याच कालावधीत येथील ग्रामदेवता योगेश्वरी मातेच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणात पोलिस तपास योग्य दिशेने चालत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही साहेबांची भेट घेवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती साहेबांना केली. साहेबांनी या प्रकरणी लक्ष घालून सुध्दा तपास राजकीय दबावाखाली होतो आहे हे लक्षात आल्यावर साहेबांनी योगेश्वरी मातेचे चोरीला गेलेले दिगीने नवीन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी परडी मोर्चा काढून शहरातील नागरीकांकडून दागिण्यांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे ठरले. या मोर्चाच्या संयोजकांमध्ये साहेबांनी माझे नांव घेतले. परडी मोर्चा काढण्यापुर्वी आम्ही सर्वजण राम कुलकर्णी यांच्या घरी जमलो. साहेब आले. चर्चा झाली… आम्ही मोर्चा साठी निघालो. साहेबांच्या गाडीत प्रमुख नेते बसले. गाडीत बसण्यापुर्वी साहेबांनी विचारले, “रापतवार बसले का?” मी गाडी शेजारीच उभा होतो. मी म्हणालो, “साहेब, मी मागच्या गाडीत बसतो, येथे अडचण होईल.” साहेब लगेच म्हणाले, “आम्ही हेडगेवारांचे पाईक आहोत, रापतवारांची आम्हाला कसली अडचण.” आणि मला गाडीत बसण्याचे आदेश दिले. साहेबांच्या गाडीत मी मोर्चा निघणाऱ्या स्थळापर्यंत गेलो. मोर्चा मध्ये साहेबांनी सतत सोबत ठेवले. पुढे या मोर्चामुळे साहेबांसोबत आमच्यावरही गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी पुढे जामीन करुन घेण्यासाठी पोलीस माझ्यासह इतरांवर दबाव आणू लागले. साहेबांना मी हे सर्व सांगितले. साहेबांनी लगेच जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन लावून त्याची खरडपट्टी केली. यापुढे मोर्चातील कोणालाही फोन केला तर याद राखा, असा दम देवून तुम्हाला या प्रकरणात अटक करायची असेल तर अगोदर मला अटक करा आणि नंतर दुसऱ्या कडे जा असा सज्जड दम देवून साहेबांनी मोबाईल त्यांच्या विशिष्ठ स्टाइलने फेकून दिला.
एक ना अनेक…. साहेबांच्या अशा किती तरी आठवणी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी दिनी आठवून येतात. या दोन्ही दिवशी सोशल मेडियावर साहेबांना विनम्र अभिवादन करणा-या अनेक पोस्ट पावूस पडल्यासारख्या पडतात. मी मात्र या पावसात न भिजता एकटाच अश्रूंच्या थेंबात भिजण्याचा प्रयत्न करतो….