अंबाजोगाई आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेले प्रेम विसरणे अशक्य ; अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे


आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवा काळात अंबाजोगाई शहरातील माणसांनी आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेले प्रेम विसरणे शक्य नाही असे मत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सेवापुर्ती निमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिसेविका कार्यालय परिसरातील सभागृहात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या सेवापुर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील पद्मश्री डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख होते. व्यासपीठावर हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुगल, डॉ. भास्कर खैरे यांच्या सुविध्द पत्नी तथा औरंगाबाद येथील बालरोग विभाग प्रमुख डॉ. प्रभा खैरे, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.


आपल्या विस्तारीत मनोगतात बोलताना अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे पुढे म्हणाले की, माझ्या एकुण ३४ वर्षाच्या शासकीय सेवा काळापैकी जवळपास २० वर्षांचा सेवाकाळ हा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांवर काम करतांना गेला आहे. वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९३ मध्ये आपण सहयोगी प्राध्यापक म्हणून येथे रुजू झालो आणि विभागप्रमुख व अधिष्ठाता पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. शासकीय सेवेत काम करतांना अंबाजोगाई शहरातील माणसांनी आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मला जे प्रेम दिले, माझ्यावर जो विश्वास दर्शवला तो विसरणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. भास्कर खैरे यांचा विस्तृत असा परिचय नेत्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. एकनाथ शेळके यांनी करुन दिला. आपल्या परिचयात डॉ. शेळके यांनी डॉ. भास्कर खैरे यांच्या अनेक बाबींना स्पर्श करीत त्यांच्या वेगवेगळ्या पैलुंची माहिती दिली.


यावेळी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, कास्ट्राइब कर्मचारी प्रतिनिधी, के. डॉ. बावळे, सहकारी पतसंस्था, परिचारिका फेडरेशन, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या वतीने शाल, सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह भेटवस्तू, बुके, हार देवून सत्कार करण्यात आला. तर डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. विश्वजित पवार, डॉ. शंकर धपाटे, डॉ. मुकुंद मोगरीकर, अधिसेविका कुरतडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना सेवापुर्तीच्या व भावी उज्वल आरोग्य, आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय समारोप पद्मश्री डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करीत एकाच कॅम्प मध्ये ३,३०० नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम डॉ. भास्कर खैरे यांनी अंबाजोगाई येथील कै. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात केला असल्याची आठवण करून देवून प्रशासकीय कामकाज करण्याच्या त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीची प्रशंसा केली.


या कार्यक्रमास औरंगाबाद, लातुर, नांदेड, हिंगोली, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले विविध विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, परिचारिका, विद्दार्थी, सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद वेदपाठक यांनी केले तर आभार रुग्णालय विभागाचे अधिक्षक डॉ. राकेश जाधव यांनी मानले.