शेगाव येथून निघालेल्या संत गजानन महाराज पालखीचे आज दुपारी तीनच्या सुमारास आगम
न झाले. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी पालखीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करुन दर्शन घेतले.
बासष्ट वर्षाची परंपरा असलेल्या गजानन महाराज पालखीचे शहराच्या सीमेवर भाविकांनी गर्दी करीत मोठ्या भक्ती भावाने स्वागत करुन मनोभावे दर्शन घेतले. गजानन महाराजांच्या भक्तांनी मुख्य रस्त्यावर ठिकठिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या, तर योगेश्वरी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर गजानन महाराज भक्त महिला मंडळाने साड्यांच्या पायघड्या घालून पालखी मार्गस्थ केली. अनेक ठिकाणी भक्तांनी स्वागत फलकही लावले होत.
प्रारंभी भगवानबाबा चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार विलास तरंगे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी पालखीचे स्वागत करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शहरातील सर्व पक्षांच्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर पालखी अण्णाभाऊ साठे चौक – खडकपूरा -देशपांडे गल्ली – भट्ट गल्ली – मंडी बाजार – योगेश्वरी देवी मंदिर -गुरुवार पेठ – शिवाजी चौक – मोंढा मार्गे दत्त मंदिर येथे मुक्कामासाठी आली. याठिकाणी विश्रांती व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रसादाचा लाभ घेवून पालखी योगेश्वरी मातेचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेवून मुक्कामासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे प्रस्थान झाली.
विठू नामाचा गजर चालू होता . व्यापारी व नागरिकांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद केला होता .या भागात यात्रेचे स्वरूप आले होते . भाविकांची मोठी गर्दी होती . प्रसादाचे व खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली होती .
गजनान महाराजांची पालखी शहरातील मुख्य रस्त्यावर रुन जात असतांना शहरातील अनेक नागरीक, व्यापारी संघटना, वैयक्तिक प्रतिष्ठाने, मित्रांचे समुह, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आदींनी एकत्र येवून दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना फराळ, चहा-पाणी यांची मोफत व्यवस्था केले. पालखी मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्यामुळे जत्रेचे स्वरुप आले होते.
▪️ महसुल दिंडीचा सहभाग
यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार गजानन महाराज यांच्या दिंडी समवेत महसुली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने सर्वसामान्य माणसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध सोयी सवलती व सुविधांची माहिती नागरीकांचा व्हावी यासाठी या महसुल दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती व महसूल विभागाच्या इतर अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता.
▪️ यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात
पालखी मुक्कामाची जोरदार तयारी
संत गजानन महाराजांची जयंती पालखी शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पालखी मुक्काम करण्याचे हे दुसरे वर्षे आहे. याठिकाणी पालखी मुक्कामी सहभागी झालेल्या वारकऱ्यांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून महाविद्यालयाच्या स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष दात्ताआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी प्रयत्नरत आहेत. यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत. सायंकाळी गजानन महाराजांची सामुहिक आरती करुन येथे पालखी भाविकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. रात्री पालखी येथेच विश्रांती करेल.
▪️ सकाळी आरती व महाप्रसादाचे
आयोजन
संत गजानन महाराजांच्या पालखीची सकाळी विधीवत महापुजा करण्यात येवून महानैवेद्य दाखवण्यात येईल. यानंतर संत गजानन महाराजांच्या भक्त रमेश कापसे परिवाराकडुन गेली अनेक वर्षांच्या प्रथेनुसार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पालखीतील सहभागी वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेवून पालखी कळंब कडे मार्गस्थ होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.