अंबाजोगाईच्या सिताफळाची चव न्यारी दररोज होतेय १० टनाची विक्री!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221012_161824.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221012_161824.jpg)
अंबाजोगाई शहराची सीताफळाचे आगार म्हणून सर्वत्र ओळख आहे. बालाघाटाच्या डोंगरदऱ्यात असलेल्या अंबाजोगाई, धारूर व केज तालुक्यातील सिताफळांची चवच न्यारी आहे. अत्यंत गोड, चविष्ट आणि भरपुर गर असलेल्या या सिताफळांची इतरत्र भरपुर मागणी असुन सुमारे आठ ते दहा टन सिताफळे मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरात विक्री साठी जातात.
बराच भाग हा डोंगर पट्ट्याचा आहे आहे. या डोंगर पट्ट्यामध्ये यावर्षी अनेक वर्षांच्या तुलनेत दमदार पावसामुळे सीताफळांच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. अंबाजोगाई शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज आठ ते दहा टन कच्च्या सीताफळांची विक्री होत आहे. किरकोळ व घाऊक विक्रेत्यांना सीताफळाच्या विक्रीचा व्यवसाय करण्याची मोठी संधी मिळाली आहे. सीताफळे खरेदी करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत आद्यकवी मुकुंदराज स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीताफळ चाहत्यांची खूप गर्दी असते.
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, येल्डा, चिचखंडी, वरवटी, चनई, सोनहिवरा, राक्षसवाडी, कुरणवाडी, धावडी त्याचप्रमाणे धारूर तालुक्यातील मोहा, पाथरूड, दिंद्रुड परळी तालुक्यातल्या नागापुर पट्ट्यातील मांडेखेल, बोधेगाव शिवारामध्ये सिताफळांचे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झाडे आहेत. आद्यकवी मुकुंदराज स्वामी तसेच बुट्टेनाथ परिसरात सीताफळांच्या झाडाची मोठी संख्या आहे. यावर्षी सरासरीच्या अडीचपट पर्जन्यमान झाल्याकारणाने डोंगराळ भागातील सर्व वनस्पतींना व झाडांना मुबलक पाणी मिळाले. त्यामुळे झाडाला लागणारी सिताफळे मोठमोठी व २०० ग्रॅमहून अधिक वजनाची असल्या कारणाने बाजारात ग्राहकाकडून खूप मागणी आहे. या सीताफळांची विक्री किलो ग्रॅम प्रमाणे न होता टोपल्यावर होत आहे. एका टोपल्यांमध्ये साधारण ५० ते ६० सीताफळे बसतात. टोपलंभर सीताफळे दीडशे ते दोनशे रुपये प्रमाणे विक्री केली जात आहेत.
अंबाजोगाई, धारूर, केज व परळी तालुक्यातल्या डोंगर पट्ट्यामध्ये नैसर्गिकरीत्या उगवलेले सीताफळांची झाडे हे इतर ठिकाणच्या झाडांपेक्षा अगदी वेगळी आहेत. या सीताफळांची गोडी अगदी सरस आहे. या सीताफळांच्या बिया इतर जिल्ह्यांमध्ये नव्हे तर पर राज्यांमध्ये नेऊन लागवड करण्यात आल्या आहेत. तरी परंतु त्या सीताफळांची गोडी व त्यामधला गर हा कमी प्रमाणात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सीताफळांची विक्री करण्यासाठी मुख्य बाजारपेठ जवळपास नसल्याच्या कारणाने शेतकरी लागवडीसाठी मोठ्या संख्येने करण्यासाठी तयार होत नाहीत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221012_161707.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221012_161707.jpg)
आज सिताफळ खायला सुरुवात केली.एका सिताफळात किमान 42 बिया निघाल्या आहेत जपून ठेवल्या आहेत. आपणास सर्वांना विनंती करण्यात येते की, आपणही सीताफळ खाल्ल्याच्यानंतर बिया जपून ठेवाव्यात. पुढे त्या निसर्गशाळे कडे पाठवाव्यात. आपण त्याचा उपयोग करू.
कवि राजेश रेवले, संयोजक निसर्गाची शाळा, अंबाजोगाई.